संजय राऊत म्हणतात, 'महाराष्ट्राची कुंडली आम्हीच ठरविणार'

टीम ई-सकाळ
Wednesday, 30 October 2019

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जी काही भूमिका मांडली ती आम्ही पाळणार

सगळं ठरल्याप्रमाणे होईल 

- युतीत राहणं हेच राज्याचे भलं

मुंबई : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जी काही भूमिका मांडली ती आम्ही पाळणार आहोत. जोपर्यंत सरकार स्थापन होत नाही तोपर्यंत यावर बोलता येत नाही, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज (बुधवार) सांगितले. तसेच महाराष्ट्राची कुंडली आम्हीच ठरविणार आहोत. इतकी ताकद शिवसेनेत आहे, असेही ते म्हणाले.

भाजपने गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड केली. त्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत यावर आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, शिवसेना-भाजपची युती राज्यात आहे. युती होण्यापूर्वी ज्या काही गोष्टी झाल्या त्यानुसार महायुतीचे सरकार स्थापन व्हावे. आम्हीही त्यासाठी तयारीत आहोत. शिवसेनेत खूप मोठी ताकद आहे. महाराष्ट्राची कुंडली आम्हीच ठरविणार आहोत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे स्वागत करणं आमचं काम आहे. शिवसेनेचा कोणताही निर्णय पक्षप्रमुखांशिवाय होत नाही. व्यक्ती महत्त्वाची नसून, राज्य आणि सरकार महत्त्वाचे आहे. 

युतीत राहणं हेच राज्याचे भलं

युतीत राहणं हेच राज्याचे भलं आहे. सरकार स्थापनेबाबत घाई करून चालणार नाही. महाराष्ट्राच्या भल्याचे, हिताचे निर्णय घ्यायचे आहेत.

सगळं ठरल्याप्रमाणे होईल 

सगळं ठरल्याप्रमाणे होईल. पाच वर्षे राज्यात येणारे सरकार स्थिर असेल. इथले प्रश्न सोडविण्यासाठी एका स्थिर आणि मजबूत सरकारची गरज आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena Leader Sanjay Raut says about Government Formation Issue