‘ईडीने झोपलेल्या राष्ट्रवादीला जागं केलं’

वृत्तसंस्था
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

शिवसेना प्रवक्त संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना पाठिंबा दर्शविला आहे. दिल्लीत त्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमांशी संवाद साधला. 

नवी दिल्ली : शरद पवार हे महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ नेत आहेत. आमचे त्यांच्याशी मतभेद असले तरी, राज्याच्या राजकारणात काही चुकीचं घडत असेल तर, आम्ही कोणाच्याही पाठिशी उभे राहतो, असे सांगत शिवसेना प्रवक्त संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना पाठिंबा दर्शविला आहे. दिल्लीत त्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमांशी संवाद साधला. 

‘मतभेद पण, आम्ही पाठिशी’
संजय राऊत म्हणाले, ‘शरद पवार यांच्याशी आमचे वैचारिक मतभेद आहेत. अगदी बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून आम्ही पवारांवर टीका करत होतो. पण, चुकीचं काही घडलं तर, सगळ्यांच्या पाठिशी उभे राहतो. राज ठाकरेंना जेव्हा ईडीने चौकशीसाठी बोलले होते. त्यावेळी त्यातून काही निष्पन्न होणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. राज्य सहकारी बँकेत पवार यांच्या विचारांची माणसं आहेत म्हणून गैरव्यवहाराचे सूत्रधार पवार, असे म्हणणे चुकीचे ठरते. मुळात पवार कोणत्याही जिल्हा बँकेचे संचालकही नाहीत. पवारांचे कट्टर विरोधक ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही त्यांना क्लीन चीट दिलीय.’ 

‘ईडीने राष्ट्रवादीला जागं केलं’
राऊत म्हणाले, ‘या प्रकरणात सरकारचा काही संबंध नाही. हायकोर्टाच्या आदेशाने तापस सुरू आहे. पण, तपास यंत्रणांनी घाई घाईने हे काम केले आहे. याचा राजकीय फायदा राष्ट्रवादीला होईल की नाही, याचा विचार करावा लागेल. आपल्या देशात कोणत्याही गोष्टीचं राजकारण होतं. आता महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस झोपलेला पक्ष होता. या घटनेमुळे तो खडबडून जागा झाला. कार्यकर्ते जागे झाले. यामुळं राष्ट्रवादीला जीवदान मिळालं.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena Leader Sanjay Raut support to sharad pawar