संजय राऊंतांनी अजित पवारांना केला 'हा' मेसेज

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 3 November 2019

संजय राऊत यांनीे अजित पवार यांना केला 'जय महाराष्ट्र'

मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा वाढत असतानाच शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पक्षाची बैठक सुरु असतानाच एसएमएस केला असल्याचे खुद्द अजित पवार यांनी सांगितले आहे. 

अजित पवार पुढे म्हणाले की, मला संजय राऊत यांनी मेसेज का केला हे माहित नाही पण मेसेजमध्ये त्यांनी साहेब, जय महाराष्ट्र मी संजय राऊत असा मेसेज केला असल्याचे सांगितले आहे. त्यांना मी नंतर फोन करुन मेसेज का केला ते विचारणार असल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

दरम्यान,  अजित पवारांनी संजय राऊत यांनी पाठवलेला मेसेज वाचून दाखवला असून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार मुख्यमंत्री होण्याची सुतराम शक्यता नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे. संजय राऊत यांच्याकडे 175 चे संख्याबळ असून ते कसे आहे हे त्यांनाच माहित असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.

आमच्याकडे 175 चा आकडा, भाजपचे राजकारण घाणेरडं : राऊत

आमच्याकडे 170 पेक्षा जास्त 175 पर्यंत आमदारांचे समर्थन आहे. ईडी, सीबीआयसारख्या सरकारी यंत्रणांचा वापर केला जात आहे. कर्नाटकाप्रमाणे ऑपरेशन कमळ महाराष्ट्रात चालणार नाही. भाजपाचं राजकारण गुंडांच्या टोळ्यांपेक्षाही घाणेरडं झाले आहे. भाजपकडून गेल्या काही दिवसात सत्तेचा दुरुपयोग करण्यात आला असून आमदारांच्या संपर्कासाठी गुंडागर्दी करण्यात येत आहे, असे संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हटले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena MP Sanjay Raut message to NCP leader Ajit Pawar