सत्तेच्या कॅनव्हासचा ब्रश उद्धव ठाकरे यांच्या हातात : संजय राऊत

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 October 2019

अपक्ष आमदार आपल्या संपर्कात असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवरील दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला. यानंतर लगेचच शिवसेनेने काही अपक्षांना आपल्या गळाला लावले.

मुंबई : मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार की भाजपचा, अशी चर्चा सध्या राज्यात रंगली असताना "महाराष्ट्राच्या कॅनव्हासवर शिवसेना रंग भरणार आणि त्याचा ब्रश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातात असेल,' असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत केले आहे. 

अपक्ष आमदार आपल्या संपर्कात असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवरील दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला. यानंतर लगेचच शिवसेनेने काही अपक्षांना आपल्या गळाला लावले. प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला तसेच आणखी चार अपक्ष आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्यामुळे सध्या शिवसेनेच्या आमदारांची संख्या वाढत असून, येत्या काळात अजून बरेच जण "मातोश्री'वर दिसतील, असे वक्तव्य देखील संजय राऊत यांनी यावेळी केले आहे.

एवढेच नाही तर, शिवसेनेला सध्या कोणतीच अडचण नसल्याचे सांगत संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्रीपदावरही दावा केला. राऊत यांनी शरद पवार आणि बारामतीच्या विकासाचे कौतुक करत मी बारामतीला जात असतो, नवीन आमदारांनी देखील बारामतीमध्ये जावे असे सांगत भाजपवरील दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena MP Sanjay Raut talked about Uddhav Thackeray political decision