
Shivsena : 'धनुष्यबाणा'वर याआधी अनेकांनी सांगितला होता दावा; जाणून घ्या इतिहास
शिवसेना कुणाची हा मागच्या अनेक दिवसांपासून अडकून राहिलेला प्रश्न आता मार्गी लागला असून केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदे गटाला सुपूर्द केलं आहे. त्यामुळे आता शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या हातून गेली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.
एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड हे शिवसेनेच्या इतिहासातील सर्वांत मोठे बंड आहे. तब्बल ४० आमदारांसहित शिंदे यांनी शिवसेनेशी बंड केलं अन् अखेर आज शिवसेना ठाकरे यांच्या हातून गेली आहे. पण याआधीही शिवसेना नावावर आणि धनुष्यबाणावर अनेकांनी दावा सांगितला होता. जाणून घेऊया धनुष्यबाणाचा इतिहास...
हा धनुष्यबाण शिवसेनेसाठी लकी मानला जातो. हे चिन्ह मिळण्याच्या आधीही इतर चिन्हांवर शिवसेना निवडणुका लढली पण तिथे हार मानावी लागली होती. १९ जून १९६६ रोजी बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली. शिवसेना पूर्वी एक संघटना होती, जी सामाजिक कार्यामध्ये, सामाजिक उद्देशाने स्थापन करण्यात आली. त्यावेळी शिवसेना राजकारणात अगदी २० टक्केच सक्रिय होती. पण त्यानंतर या संघटनेने १९६८ मध्ये राजकीय पक्ष म्हणून नोंदणी केली आणि शिवसेना राजकारणात पूर्णपणे सक्रिय झाली.
या आधी सेनेला निवडणुकांचा कसा अनुभव आला?
शिवसेनेने पहिली निवडणूक १९७१ साली लढली होती. पण त्यावेळी तिथे त्यांना यश मिळालं नाही. १९८९ साली लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच शिवसेनेचा खासदार निवडून आला. या मधल्या काळात म्हणजे १९७१ ते १९८४ या दरम्यान शिवसेनेने अनेक चिन्हे बदलली. खजुराचं झाड, ढाल तलवार, रेल्वे इंजिन अशी अनेक चिन्हे शिवसेनेने आधी वापरली होती. १९८४ साली भाजपाच्या 'कमळा'वरही शिवसेनेने निवडणूक लढवल्याच्या काही नोंदी आढळतात. १९८५ मध्ये शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढली, त्यावेळी त्यांनी धनुष्यबाण हे चिन्ह स्विकारलं आणि काँग्रेसच्या मदतीने शिवसेना सत्तेत आली.
१९८९ मध्ये शिवसेनेचे चार खासदार धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आले. डरकाळी फोडणारा वाघ हा तर सेनेच्या प्रत्येक पोस्टरवर, झेंड्यावर पूर्वीपासूनच होता. पण आता धनुष्यबाण हे अधिकृत पक्षचिन्ह बनलं होतं. त्यानंतर आजपर्यंत पक्षाने हेच चिन्ह कायम ठेवलं होतं.
यापूर्वीही धनुष्यबाणावर दावा सांगण्यात आला होता...
यापूर्वीही शिवसेनेच्या धनुष्यबाणावर दावा सांगण्यात आला होता. झारखंड मुक्ति मोर्चाने याआधी धनुष्यबाण या चिन्हाची मागणी केली होती. त्यावेळी आयोगाने स्थानिक आणि जुना पक्ष असल्याने झारखंड मुक्ति मोर्चाला हे चिन्ह दिलं होतं. त्यामुळे तुतारी वाजवणारा व्यक्ती या चिन्हावर शिवसेनेला त्या वर्षी निवडणूक लढवावी लागली होती. त्यावर्षी सेनेचा एकही उमेदवार जिंकू शकला नव्हता. त्यानंतर १९८९ मध्ये शिवसेनेने सामना या मुखपत्राची सुरुवात केली आणि याच वर्षीपासून शिवसेनेने धनुष्यबाण हे आपलं चिन्ह निश्चित केलं. पुढच्या सगळ्या निवडणुका याच चिन्हावर लढवण्यात आल्या.