भाजपचा डाव उधळून लावण्याची तयारी 

congress-ncp-shivsena
congress-ncp-shivsena

मुंबई - राज्यातील नाट्यमय घडामोडींनंतर भाजपचा संभाव्य डाव उधळून लावण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकार स्थापन करण्याच्या जोरदार हालचाली सुरू केल्या असून, आज (ता. 25) शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते संख्याबळाचे पत्र राजभवनला देणार असल्याचे समजते. 

गेले दहा दिवस बैठकांचा रतीब लावल्यानंतर सत्तास्थापनेचा महाविकास आघाडीचा हातातोंडाशी आलेला घास अजित पवार यांच्या बंडामुळे हिरावला गेला आहे. त्यामुळे या तीन पक्षांचे नेते कमालीचे सावध झाले आहेत. याचाच एक भाग म्हणून सर्वोच्च न्यायालयात राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह उमटवत भाजपने बहुमत लगेच सिद्ध करावे, अशी मागणी करण्याची याचिका दाखल केली आहे. यावर सोमवारी निकाल अपेक्षित असला, तरीही भाजपचे संभाव्य डाव उधळून लावण्यासाठी या तीनही पक्षांच्या नेत्यांना कोणताही धोका पत्कारायचा नाही, असे दिसते. 

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली असल्यामुळे सरकार स्थापन झाले आहे. हा शपथविधी अत्यंत चतुराईने केला असून, राष्ट्रपती राजवट रातोरात उठविली गेली. याचा विचार केला तर विधिमंडळात भाजप बहुमताचा आकडा पार करू शकले नाही, तर केंद्र सरकार ही विधानसभा बरखास्त करू शकेल अथवा पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू करण्याची तडकाफडकी शिफारस करण्याची शक्‍यता नाकारता येत नाही, असे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात येते. तसेच, राज्यपालांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला सरकार स्थापन करण्यासाठी स्वतंत्रपणे बोलावले होते. त्यांना त्यासाठी अत्यंत कमी वेळ दिला होता. ही बाब लक्षात घेता, सरकार स्थापन झाले नाही तर भाजप कोणत्याही थराला जाऊन इतर कोणाचे सरकार होऊ देणार नाही, असेही शिवसेनेच्या नेत्यांना वाटते. यामुळे कोणत्याही परिस्थितीत या तीन पक्षांच्या आमदारांच्या सह्यांचे वेगवेगळे तसेच संयुक्‍त पत्र राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांना उद्याच सुपूर्त करण्याची तयारी केल्याचे सांगण्यात येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com