Shivsena Row : "चिन्ह व नाव मिळवण्यासाठी २००० कोटी"; राऊतांच्या आरोपांनंतर 'भाजपा'ला आठवले टिळक

बेताल बडबड करून इतकही हसं करून घेऊ नका, असा सल्लाही भाजपाने राऊतांना दिला आहे.
Sanjay Raut
Sanjay Rautesakal

शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळवण्यासाठी दोन हजार कोटींचा सौदा झाल्याचा गंभीर आरोप आज सकाळी खासदार संजय राऊत यांनी केला. यावरुनच आता भाजपाने प्रत्युत्तर दिलं आहे. बेताल बडबड करून इतकही हसं करून घेऊ नका, असा सल्लाही भाजपाने राऊतांना दिला आहे.

संजय राऊतांच्या आरोपावर बोलताना भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले, "किती घसरणार संजय राऊत? गेल्या दोन अडीच वर्षांत नुसती बेछुट आरोपांची राळ उडवली. एक आरोप ठोस सिद्ध करू शकला नाहीत. नैराश्यातून माणूस बेताल बडबड करु चेष्टेचा विषय होतो. म्हणून इतकंही हसं करून घेऊ नका. संघर्ष करणारे अण्णाभाऊ साठे कुठे आणि आरामात जगणारे तुमचे नेते कुठे?"

काय म्हणाले होते संजय राऊत?

संजय राऊत यांनी आज सकाळीच एक ट्वीट करत गंभीर आरोप केला होता. आपल्या ट्वीटमध्ये राऊत म्हणतात, "माझी खात्रीची माहिती आहे. चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आत्तापर्यंत २००० कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत. हा प्राथमिक आकडा आहे आणि १०० टक्के सत्य आहे. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील. देशाच्या इतिहासात असं कधीच घडलं नव्हतं."

तर मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनीही संजय राऊतांवर टीका केली आहे. आपल्या ट्वीटमध्ये आशिष शेलार म्हणाले, "लोकमान्य टिळकांनी केसरीतील 'आधी कोणते राजकीय की सामाजिक' या अग्रलेखात म्हटले आहे की,"विचारशक्तीस अनावर सोडून जे जे तरंग निघतील ते लेखणीने अगर तोंडाने सांगणाऱ्या गृहस्थात आणि वेड लागून किंवा गांजाची चिलीम ओढून बडबडणाऱ्या गृहस्थात काही विशेष फरक आहे, असे आम्ही मानत नाही." रोज सकाळी टिव्हीवर वेगवेगळे हावभाव करुन बोलणाऱ्या एका गृहस्थास महाराष्ट्र पाहू लागला की, लोकमान्य टिळकांनी लिहिलेल्या वरिल वाक्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आज संपूर्ण महाराष्ट्राचा सकाळचा ताजा अनुभव ही असाच होता!"

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com