
Shivsena Row : 'शिवसेनाप्रमुख गेले तेव्हा होता तसा हा प्रसंग'; उद्धव ठाकरे भावूक
शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला गेलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत, सल्लागार आणि वकिलांसोबत बैठकांचा धडाकाच लावला आहे. आजही शिवसैनिकांसोबत एक बैठक झाली. य़ा बैठकीदरम्यान, उद्धव ठाकरे भावूक झालेले पाहायला मिळाले.
या बैठकीमध्ये आपल्यावर उद्भवलेला प्रसंग हा अत्यंत कठीण प्रसंग असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. तसंच ते बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणीने भावूक झाले. उद्धव ठाकरे म्हणाले, "सध्या सर्वात कठीण प्रसंग आहे. शिवसेनाप्रमुख गेले तेव्हा जसा प्रसंग होता, तसा प्रसंग आहे. सुपारी देऊन शिवसेनेची हत्या करण्याचा प्रयत्न आहे."
उद्धव ठाकरे या बैठकीदरम्यान पुढे म्हणाले, "भाजपाचे तळवे चाटण्यासाठी शिवसेनेचा जन्म झालेला नाही. बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर शिवसेना टिकणार नाही, असं बोललं जात होतं. पण आपण टिकलो. आता जागे झालो नाही तर २०२४ मध्ये हुकुमशाही येईल. कालांतराने जुन्या केसेस उघडणे आणि शिवसेना संपवण्याचा सध्या प्लॅन आहे."
ठाकरे गटाचं आता चिन्ह कोणतं? याबद्दलही उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाकडे दिलं आहे. यानंतर उद्धव ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना म्हणाले, "२८ तारखेपर्यंत मशाल हे चिन्ह आपण वापरू शकतो. इतर चिन्हे सध्या मनात आहेत. "