शिवसेनेला भाजपच्या कर्नाटक पॅटर्नची धास्ती; आमदारांवर विशेष लक्ष

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज (गुरुवार) मातोश्रीवर नवनिर्वाचित आमदारांची बैठक घेणार आहेत. या बैठकीनंतर सेनेच्या सर्व आमदारांना एकत्र हलवण्यात येणार आहे. सरकार येण्यासाठी आतूर असलेल्या आमदारांनी भाजपपासून दूर रहावे यासाठी शिवसेनेकडून हालचाली करण्यात येत आहे.

मुंबई : भाजपने कर्नाटकात वापरलेला ऑपरेशन कमळ पॅटर्न महाराष्ट्रातही वापरला जाऊ नये यासाठी शिवसेना सतर्क झाली आहे. शिवसेनेने आपल्या आमदारांवर विशेष लक्ष ठेवले असून, आमदारांना एकाच हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. 

शिवसेनेचं आज ठरणार; शिवसेनेच्या 'वाघां'ची मातोश्रीवर बैठक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज (गुरुवार) मातोश्रीवर नवनिर्वाचित आमदारांची बैठक घेणार आहेत. या बैठकीनंतर सेनेच्या सर्व आमदारांना एकत्र हलवण्यात येणार आहे. सरकार येण्यासाठी आतूर असलेल्या आमदारांनी भाजपपासून दूर रहावे यासाठी शिवसेनेकडून हालचाली करण्यात येत आहे. शिवसेनेच्या सर्व आमदारांना ट्रायडंट हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व आमदारांवर लक्ष ठेवता येणार आहे.

भाजपचं ठरलं! शिवसेनेशिवाय करणार सत्तास्थापनेचा दावा 

भाजपला स्वबळावर सत्ता स्थापनेसाठी सुमारे 25 आमदारांची गरज आहे. आपले आमदार फुटू नये, यासाठी सर्वच पक्ष सतर्क झाले आहेत. युतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेकडून आपल्या आमदारांची जास्त काळजी घेण्यात येत आहे. कर्नाटकात भाजपने काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांना फोडले होते. त्यांना मुंबईत ठेवले होते. त्यामुळे कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळले होते. त्यानंतर येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार स्थापन झाले होते. आता असाच पॅटर्न महाराष्ट्रातही पाहायला नको मिळायला म्हणून शिवसेना अलर्ट झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena specially watch newly elected MLAs in Mumbai because of BJP