esakal | श्री विठ्ठलाची महापूजा करणारे उद्धव ठाकरे शिवसेनेचे तिसरे मुख्यमंत्री 
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena third Chief Minister Uddhav Thackeray who worship Vitthal Rukmini

कोरोना महामारीमुळे यंदाचा आषाढी पालखी आणि यात्रेचा सोहळा रद्द करण्यात आला आहे. तरीही परंपरा कायम राखत आषाढी एकादशीची विठ्ठल-रुक्‍मिणीची शासकीय महापूजा करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. उद्या पहाटे अडीच वाजता सपत्नीक ते विठ्ठल-रुक्‍मिणीची महापूजा करणार आहेत. शिवसेनेचे तिसरे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना मान मिळाला आहे. शिवाय ठाकरे घराण्यात त्यांनाच पहिला मान मिळाला आहे. 

श्री विठ्ठलाची महापूजा करणारे उद्धव ठाकरे शिवसेनेचे तिसरे मुख्यमंत्री 

sakal_logo
By
भारत नागणे

पंढरपूर : कोरोना महामारीमुळे यंदाचा आषाढी पालखी आणि यात्रेचा सोहळा रद्द करण्यात आला आहे. तरीही परंपरा कायम राखत आषाढी एकादशीची विठ्ठल-रुक्‍मिणीची शासकीय महापूजा करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. उद्या पहाटे अडीच वाजता सपत्नीक ते विठ्ठल-रुक्‍मिणीची महापूजा करणार आहेत. शिवसेनेचे तिसरे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना मान मिळाला आहे. शिवाय ठाकरे घराण्यात त्यांनाच पहिला मान मिळाला आहे. 
यापूर्वी शासकीय महापूजा करण्याचा पहिला मान शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी आणि नारायण राणे यांना मिळाला होता. त्यानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना तिसऱ्यांदा हा मान मिळाला आहे. राज्यात 1995 मध्ये सत्तांतर झाले. शिवसेना-भाजपची सत्ता आली. शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी यांना विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्याचा मान मिळाला होता. त्यांनीच पंढरपूर येथील संत तनपुरे महाराज मठात पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासाला चालना मिळावी म्हणून राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती. मुख्यमंत्री असताना मनोहर जोशी यांनीच वाखरी ते पंढरपूर अशी पाच किलोमीटर पायी वारी करण्याची प्रथा सुरू केली होती. त्यानंतर ही प्रथा बंद झाली. मनोहर जोशी यांनी राजीनामा दिल्यानंतर दोन वर्षांसाठी नारायण राणे यांना मुख्यमंत्रिपदासाठी संधी मिळाली होती. 1998 मध्ये मुख्यमंत्री राणे यांना विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्याची शेवटची संधी मिळाली. त्यानंतर 1999 मध्ये मुदतपूर्व निवडणूक झाली. त्यात राज्यात सत्तांतर झाले. राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार आले. त्यानंतर तब्बल 20 ते 22 वर्षांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रूपाने शिवसेनेला विठ्ठलाची शासकीय महापूजा कऱण्याचा मान मिळाला आहे. 2014 मध्ये पुन्हा राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार आले. देवेंद्र फडणवीस यांना सलग चार वर्षे विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्याची संधी मिळाली. 
2018 मध्ये मराठा आंदोलकांनी देवेंद्र फडणवीस यांना आषाढी पूजेसाठी विरोध केला होता. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शासकीय वर्षा या निवासस्थानी आषाढी एकादशीदिवशी विठ्ठल-रुक्‍मिणीची महापूजा केली होती. 
2019 मध्ये पुन्हा राज्यात शिवसेना आणि भाजप बहुमताने निवडून आले. परंतु मख्यमंत्री पदावरून दोन्ही पक्षांतील वाद विकोपाला गेला. परिणामी शिवसेनेने मुख्यमंत्रीसाठी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसला सोबत घेऊन उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद मिळाले. विरोधी विचारधार असलेल्या दोन्ही पक्षांना सोबत घेऊन सत्ता चालवणारे हिंदुत्ववादी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून देखील पहिल्यांदाच विठ्ठलाची शासकीय महापूजा करणार आहेत. 

विठ्ठलाच्या शासकीय महापूजेची परंपरा 
विठ्ठलाची महापूजा ही छत्रपती शिवाजी महाजारांच्या काळापासून सुरू आहे. इंग्रजांच्या काळात हिंदू कलेक्‍टर, प्रांत, मामलेदार शासकीय पूजा करत असे. 1970 मध्ये समाजवादी लोकांनी सरकारच्या वतीने पूजाअर्चा करणे योग्य नाही असे म्हणत आंदोलन केले होते. त्यामुळे 1971 मध्ये शासकीय महापूजा झाली नाही. 1973 पासून 2019 पर्यंत शासकीय महापूजा अखंडपणे सुरू होती. 2019 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा आरक्षण प्रश्‍नी पुकारलेल्या आंदोलनामुळे महापूजा करता आली नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर राजाराम बापू पाटील महसूलमंत्री असताना पूजेसाठी आले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा करण्याची प्रथा सुरू झाली. ती आजपर्यंत सुरू आहे.