Election: 'तर शिवसेनेचं निवडणूक चिन्ह गोठवलं जाईल'; सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचं मोठं वक्तव्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Election: 'तर शिवसेनेचं निवडणूक चिन्ह गोठवलं जाईल'; सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचं मोठं वक्तव्य

Election: 'तर शिवसेनेचं निवडणूक चिन्ह गोठवलं जाईल'; सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचं मोठं वक्तव्य

मुंबई अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक काल जाहीर करण्यात आली. तेथील शिवसेना आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या जागेसाठी ही निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर ही निवडणुक अटीतटीची असणार आहे. या जागेसाठी भाजपा आणि शिवसेना यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. पण शिवसेनेच्या दोन्ही गटापैकी कोणत्या गटाकडून उमेदवार उभा केला जाईल त्याचबरोबर ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह कोणाला मिळणार? हा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. या निवडणुकीत धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह वापरता येईल का? किंवा चिन्ह नसताना निवडणूक कशी लढवणार असा पेच सेनेसमोर असेल. दरम्यान याच पार्श्वभूमीवर सरकारी वकील आणि कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी सेनेच्या धनुष्यबाण निवडणूक चिन्हाबाबत मोठं विधान केलं आहे.

अंधेरी (पूर्व) पोटनिवडणुकीसाठी भाजप तसेच शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून उमेदवार जाहीर केल्यास निवडणूक आयोगासमोर मोठा पेच निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर अंधेरी पोटनिवडणुकीच्या तारखेच्या आधी हा पेच मिटवता आला नाही. तर निवडणूक आयोगाकडून शिवसेनेचे निवडणूक चिन्ह (धनुष्यबाण) गोठवलं जाऊ शकतं, अशी माहिती सरकारी वकील आणि कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी दिली आहे.

हेही वाचा: 'धनुष्यबाण' गोठवल्यास पुढे काय, दसरा मेळाव्यात ठरणार दिशा! ३२०० बसगाड्या बुकिंग

सेनेच्या निवडणूक चिन्हाबद्दल बोलताना उज्ज्वल निकम म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालपत्रात ही बाब स्पष्ट सांगितली आहे की, निवडणूक चिन्ह किंवा राजकीय पक्षाची मान्यता हा विषय केंद्रीय निवडणूक आयोगाने सोडवायचा आहे. या कारणांमुळे अंधेरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत कोणते पक्ष उभे राहणार आहेत? ते बघावं लागेल. परंतु दोन्ही गटांकडून निवडणुकीत आपले उमेदवार जाहीर केले तर निवडणूक चिन्ह कोणाला द्यायचं? याचा निर्णय निवडणूक आयोगाला घ्यावा लागेल. त्यासाठी दोन्ही गटाकडून निवडणूक आयोगासमोर पुरावे सादर करावे लागतील. ही प्रक्रिया किती दिवस चालेल, याबाबत स्पष्टपणे सांगता येणार नाही.

या पोटनिवडणुकीच्या आधी दोन्ही गटांना निवडणूक आयोगासमोर पुरावे सादर करता आले नाहीत. तर आयोगापुढेच एकच पर्याय उरतो, तो म्हणजे निवडणूक चिन्ह गोठवणे. त्यानुसार निवडणूक चिन्ह गोठवलं जाऊ शकतं, असं वक्तव्य कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी केलं आहे.