शिवशक्ती-भीमशक्तीसोबत लवकरच 'लहूशक्ती' दिसणार; काय म्हणाले उद्धव ठाकरे? Uddhav Thackeray | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray Prakash Ambedkar

एकीकडं भाजप आणि शिंदे गटाची मनसेसोबत जवळीक वाढताना दिसत आहे.

Uddhav Thackeray : शिवशक्ती-भीमशक्तीसोबत लवकरच 'लहूशक्ती' दिसणार; काय म्हणाले उद्धव ठाकरे?

एकीकडं भाजप (BJP) आणि शिंदे गटाची मनसेसोबत (MNS) जवळीक वाढताना दिसत आहे, त्यामुळं या तिन्ही पक्षांची महायुती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच आता वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाची शिवसेना यांची आघाडी होण्याची शक्यताही आहे. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी उद्धव ठाकरे यांना आधीच युतीचा प्रस्ताव दिलाय, त्यामुळं ही युती होणार की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

या युतीची चर्चा सुरु असतानाच उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मोठी घोषणा केलीय. शिवशक्ती-भीमशक्ती आणि लहूशक्ती ही एकाच शक्तीची रूपे आहेत. या तिन्ही शक्ती एकत्र आल्या तर महाराष्ट्रात नव्हे, तर देशात एक प्रचंड ताकद निर्माण होईल. म्हणूनच शिवशक्ती-भीमशक्ती व लहूशक्तीचा लवकरच मेळावा घेणार आहे, अशी घोषणा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

हेही वाचा: Gujarat Election : प्रचारादरम्यान भाजप उमेदवारावर प्राणघातक हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत, कारची तोडफोड

आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या 228 व्या जयंतीनिमित्त मातंग समाजाच्या वतीनं वांद्रे येथील शासकीय वसाहतीमधील कम्युनिटी हॉलमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आज लहूशक्ती माझ्यासोबत आहे. तुम्ही माझ्याकडं काही मागण्या केल्या नाहीत, पण हा समाज आतापर्यंत दुर्लक्षित राहिला हे मीही मान्य करतो. मात्र, या समाजाला मी वेगळं कधीच मानलं नाही. नेहमी आपलंच मानलं. आज आपण लहुजी साळवे व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जयजयकार करतो. पण, अण्णाभाऊ साठेंनी मर्दुमकीनं शाहिरी केली तेव्हा अण्णाभाऊ साठे यांनी गिरणी कामगारांना चेतवले आणि पेटवले. मग संघर्ष उभा राहिला. तो संघर्ष तेव्हा उभा राहिला नसता तर आपली मुंबई आपली राहिली नसती, असंही ठाकरेंनी स्पष्ट केलं.