

Solapur district murder cases
sakal
सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात १ जानेवारी ते ३ मे २०२६ या काळात तब्बल २८ खून झाल्याची माहिती समोर आली आहे. चारित्र्यावर संशय, प्रॉपर्टीचा वाद, पैसे, दारू, अशा कारणातून या खुनाच्या घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
संसारात संशयातून वाद होऊ लागले आणि त्यातूनही खून झाले आहेत. पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याचेही गुन्हे पोलिसांत दाखल आहेत. पत्नी नांदायला येत नाही म्हणून देखील एकाने पत्नीचा तर दुसऱ्याने सासऱ्याचा खून केल्याचेही गुन्हे घडले आहेत. दारूच्या व्यसनातून शहर-ग्रामीणमध्ये खून झाल्याचीही उदाहरणे आहेत. सोलापूर शहर पोलिसांत मागील चार महिन्यांत खुनाचे पाच गुन्हे दाखल आहेत. दुसरीकडे सोलापूर ग्रामीण पोलिसांत १ जानेवारीपासून २ मेपर्यंत तब्बल खुनाचे २३ गुन्हे घडले आहेत. विशेष बाब म्हणजे पोलिसांनी सखोल तपास करून संशयित आरोपींना काही तासांतच जेरबंद केले.
ठळक घटना...
१) सोलापूर जिल्ह्यातील इंगळगी (ता. दक्षिण सोलापूर) येथे जावयानेच सिकंदर मुलका शेख या सासऱ्याची निर्घृण हत्या केली. विवाहानंतर पत्नी आणि पतीत भांडण सुरू होते. पत्नी नांदायला येत नसल्याने फेब्रुवारी २०२६ मध्ये जावयाने टोकाचे पाऊल उचलले. यात वळसंग पोलिसांत गुन्हा दाखल होऊन जावयाला पेालिसांनी अटक केली आहे.
२) ५ एप्रिल रोजी पंढरपूर तालुक्यातील सुगाव भोसे येथील सोनाली नेताजी जाधव (वय ३०) यांचा खून झाला. रोपळे हद्दीतील उजनी कॅनॉलजवळ त्यांचा मृतदेह पोलिसांना मिळाला. यात पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे.
३) ११ एप्रिल रोजी नातवानेच ८२ वर्षीय आजी जनाबाई सुरवसे (रा. विहाळ, ता. करमाळा) यांना दगडावर आपटून जीवे मारले. नातवाविरुद्ध करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल असून पोलिसांनी त्याला जेरबंद केले आहे.
४) १५ एप्रिल रोजी पतीने पत्नी नर्गिस शेख (वय ३२) हिच्या घरी जाऊन पेट्रोल टाकून तिला जाळले. नर्गिस ही विवाहानंतर काही दिवसांतच माहेरी राहायला आली होती. शहरातील विजापूर नाका पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
५) २७ एप्रिल रोजी वडदेगाव (ता. मोहोळ) येथे मित्राने पैशाच्या वादातून दत्ता बागल (वय ३८) यांचा खून केला. यात खून करणाऱ्या मित्राविरुद्ध कामती पोलिसांत गुन्हा दाखल असून संशयित आरोपी सध्या जेरबंद आहे.
६) बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथे दिरानेच भावजय व तिच्या दोन मुलांना तलवारीने वार करुन झोपेतच संपविले. २ मे रोजी हा प्रकार समोर आला. भावाच्या मृत्यूनंतर भावजय व दिरात प्रॉपर्टीचा वाद सुरू होता. त्यातून हे हत्याकांड घडल्याचे सोलापूर तालुका पोलिसांनी सांगितले.
७) मारहाणीच्या घटनेत मृत व संशयित आरोपींनी एकमेकांविरुद्ध पोलिसांत फिर्यादी दिल्या होत्या. संशयितांविरुद्ध दाखल कलम ३०७ च्या (हत्येचा प्रयत्न) गुन्हा बोर्डावर आला होता, ती केस मागे घेत नसल्याच्या रागातून सहा जणांनी सोलापूर शहरातील ७० फूट रोडवर भर रस्त्यात तरुणाचा खून केला.
रागावर नाही ताबा, आता आयुष्य तुरुंगात
भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (आता नवीन कायद्यानुसार बीएनएस कलम १०३) नुसार खुनाच्या गुन्ह्यासाठी मृत्यूदंड (फाशीची शिक्षा) किंवा जन्मठेपेची (आजीवन कारावास) तरतूद आहे. गुन्हा सिद्ध झाल्यावर आरोपींना त्यांचे उर्वरित आयुष्य तुरुंगातच काढावे लागते. नागरिकांनी टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी त्यांचे कुटुंब, मुलाबाळांचा विचार करावा, असे आवाहन सहायक पोलिस आयुक्त राजन माने यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.