

सोलापूर : वॉकिंग करताना रात्री साडेआठ वाजता चौघांनी आपल्यावर सामूहिक अत्याचार केल्याची फिर्याद महिलेने विजापूर नाका पोलिसांत दिली होती. मात्र, महिलेने सांगितलेला घटनाक्रम आणि प्रत्यक्ष हकीकत वेगळी असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी सखोल तपास केला आणि त्या महिलेची बनवेगिरी समोर आली. चार वर्षांपासून प्रेमसंबंध असलेल्या प्रियकराला एका गुन्ह्यातून वाचविण्यासाठी तिने हा बनाव रचल्याचे उघड झाले. खोटी फिर्याद देणाऱ्या त्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
सोलापूर शहरातील समीर शेख या तरुणाविरुद्ध पहिल्या प्रेयसीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. आत्महत्या केलेल्या तरुणीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून समीर व त्याच्या मित्राला अटक झाली. गुन्ह्यातील समीरचा मित्र अजूनही कोठडीतच आहे; मात्र समीरला उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमधून जामीन मिळाला होता. मुख्य आरोपी बाहेर आणि मित्र कोठडीत कसा, यावरून त्या तरुणीच्या वडिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने समीरचा जामीन रद्द केला होता. आता पोलिस समीरला अटक करणार होते. प्रियकर पुन्हा कोठडीत जाणार असल्याने महिलेने आपल्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा बनाव रचला.
धक्कादायक बाब म्हणजे महिलेने आरोप केलेले चौघेजण समीरवर पूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यातील साक्षीदार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. पोलिस आयुक्तांच्या पत्रकार परिषदेत उपायुक्त विजय कबाडे, सहायक पोलिस आयुक्त दिलीप पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादासाहेब गायकवाड, पोलिस निरीक्षक सुशांत वरळे, सहायक पोलिस आयुक्त शीतलकुमार गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक सविता मोरे पाटील उपस्थित होते.
पोलिसांना असा आला संशय, अन्...
वॉकिंगसाठी गेल्यावर १८ मार्च रोजी रात्री साडेआठच्या सुमारास चारजण आले. त्यांनी गळ्याला चाकू लावून तिला अंधारात नेऊन टिकेकरवाडीजवळील (कुमठेजवळ) रेल्वे ट्रॅकशेजारी अत्याचार केल्याचे त्या महिलेने मैत्रिणीला फोनवरून सांगितले. ‘तू आता लगेच नाही आलीस, तर मी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या करीन,’ असे ती मैत्रिणीला म्हणाली. मैत्रीण लगेच तेथे गेली आणि तिला समजावून स्वतःच्या घरी आणले. मैत्रिणीने ‘डायल ११२’ वर फोन करून पोलिसांना याची माहिती दिली. पोलिस तत्काळ त्या ठिकाणी पोहोचले. महिलेच्या अंगावर कोणतेही व्रण नव्हते; तसेच सामूहिक अत्याचार झाल्याचेही वाटत नव्हते. पोलिसांनी तिला वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले. दुसरीकडे, पोलिसांनी तिच्या सांगण्यावरून चार संशयितांना पकडून ठाण्यात आणले. त्यांच्या हावभावावरून त्यांनी गुन्हा केल्याचे वाटत नव्हते. या संशयातून पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज पडताळले. त्यावेळी महिलेच्या म्हणण्यानुसार घटना रात्री ८.३० वाजता घडली होती; मात्र ती रात्री ८.५६ वाजेपर्यंत वॉकिंग करत असल्याचे दिसले. त्याचवेळी तिने मैत्रिणीला कॉल केल्याचेही फुटेजमध्ये आढळले. यावरून पोलिसांचा संशय अधिकच बळावला. वैद्यकीय अहवाल आल्यानंतर सामूहिक अत्याचाराचा महिलेचा बनाव उघड झाला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्या चार तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.