श्री विठ्ठल-रुक्मिणी नित्य पूजेचे बुकिंग सुरू...

अभय जोशी
शुक्रवार, 17 मे 2019

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूर्वी भाविकांना सकाळी महापूजा करता येत असत. महापूजेच्या वेळी गरम व गार पाणी, दही, दूध, मध यांचा अभिषेक मूर्तीवरून अनेक वेळा केला जाई.

पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची झीज होते या कारणामुळे गेल्या काही वर्षापासून महापूजा बंद करण्यात आलेल्या आहेत. तेव्हापासून दररोज पहाटे होणारी एकमेव नित्य पूजा, रात्री होणार्‍या पाद्यपूजा आणि उन्हाळ्यात होणाऱ्या चंदन उटी पूजेला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. यावर्षीच्या नित्य पूजेचे बुकिंग फूल झाले असून, आता पुढच्या वर्षीच्या (2020)च्या नित्य पूजांचे बुकिंग सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले आणि पूजा व्यवस्था पाहणारे हनुमंत ताठे यांनी आज (शुक्रवार) 'सकाळ'शी बोलताना दिली.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूर्वी भाविकांना सकाळी महापूजा करता येत असत. महापूजेच्या वेळी गरम व गार पाणी, दही, दूध, मध यांचा अभिषेक मूर्तीवरून अनेक वेळा केला जाई. अशा पद्धतीने एकापाठोपाठ दररोज पाच ते सहा पूजा दररोज होत असत. अशा महापूजा मुळे मूर्तीची झीज होऊ लागल्याने गेल्या काही वर्षांपासून महापूजा पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. आता दररोज पहाटे होणारी एकमेव नित्य पूजा, रात्री अकरा ते बारा या वेळात होणाऱ्या पाद्यपूजा आणि उन्हाळ्यात होणाऱ्या चंदन उटी पूजा भाविकांना मंदिर समितीकडे बुकिंग करून करता येतात.

नित्य पूजा...
दररोज पहाटे चार ते सव्वा पाच या वेळात श्री विठ्ठल-रुक्मिणीची नित्य पूजा केली जाते. भाविकांना मंदिर समितीकडे तारखेचे बुकिंग करून श्रीविठ्ठलाच्या नित्य पूजेसाठी 25 हजार तर श्री रुक्मिणी मातेच्या नित्य पूजेसाठी 11हजार रुपये भरावे लागतात. ठरलेल्या दिवशी संबंधित भाविक आणि त्याच्या सोबतचे अन्य अशा एकूण दहा लोकांना पूजेसाठी मंदिरात प्रवेश दिला जातो. मंदिराच्या पुजाराकडून नित्य पूजा केली जात असताना देवाच्या मूर्तीवर केशर पाणी घालण्याची संधी भाविकांना दिली जाते. देवाला हळद, कुंकू लावून पेढे आणि फळांचा प्रसाद दाखवला जातो. ही पूजा करताना महिलांना सहावार किंवा नऊवार साडी आणि पुरुषांना सोहळे उपरणे नेसावे लागते.

पाद्यपूजा...
पाद्यपूजा दररोज रात्री अकरा ते बारा या वेळात केल्या जातात. दररोज दहा जोडप्यांना पाद्यपूजेची संधी दिली जाते. श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणी मातेच्या पाद्यपूजा साठी एकूण चार हजार रुपये मंदिर समितीकडे भरावे लागतात. प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला त्या महिन्यातील पाद्यपूजेसाठी बुकिंग केले जाते. एखाद्या दिवशी दहापैकी काही पूजा शिल्लक असल्या तरच भाविकांना ऐनवेळी पाद्य पूजेची संधी मिळू शकते.

देवाच्या चरणांवर चांदीचे कवच ठेवले जाते. त्यावर दही, दूध, मध, साखर भाविकाच्या हस्ते वाहिली जाते. पाण्याने अभिषेक केला जातो आणि मग धूप-दीप ओवाळून प्रसाद दाखवला जातो. आरती ओवाळली जाते आणि भाविकांना नारळ व अन्य प्रसाद दिला जातो. एका पूजेसाठी साधारण पाच मिनिटे लागतात. पाद्यपूजा यात्रा कालावधी तसेच दशमी, एकादशी, द्वादशी, शनिवार, रविवार या दिवशी गर्दीमुळे केल्या जात नाहीत.

चंदन उटी पूजा...
चैत्र शुद्ध प्रतिपदा ते मृग नक्षत्र (7 जून) या काळातील सुमारे 42 ते 46 दिवस श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला चंदन उगाळून त्याचा लेप लावला जातो. श्रीविठ्ठलाच्या चंदन उटी पूजेसाठी 17 हजार तर श्री रुक्मिणी मातेच्या चंदन उटी पूजेसाठी 9 हजार रुपये देणगी मंदिर समितीकडे भरावी लागते. दररोज तीन जोडप्यांच्या हस्ते चंदन उटी पूजा केल्या जातात. दररोज सायंकाळी साडेचार ते साडेपाच या वेळात या पूजा केल्या जातात. भाविकांना पेढे बर्फी फळे सुकामेवा सरबत असा प्रसाद दिला जातो.

या पूजेसाठी दहा लोकांना मंदिरात परवानगी दिली जाते. पुजाराकडून देवाच्या मूर्तीला चंदनाचा लेप लावला जात असताना एका जोडप्याच्या हस्ते देवाला चंदनाचा टिळा लावला जातो. देवाचे पाय धुऊन हळद-कुंकू वाहून धूपदीप दाखवला जातो. पेढे, बर्फी, फळे तसेच सुकामेवा शिरा आणि लिंबू सरबत प्रसाद दाखवला जातो व तोच भाविकांना प्रसाद म्हणून दिला जातो.

Web Title: shri vitthal rukmini mandir pooja booking start at pandharpur