"वडील कडकलक्ष्मी आहेत. पण मी शिकून मोठा होणार आहे'

श्रीराम ग. पचिंद्रे
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

"माझं नाव आकाश कोळी. माझं वडील कडकलक्ष्मी आहेत. आई आणि वडील दोघंही असंच फिरतात. मी शाळा शिकतो. सातवीत आहे. शाया गावातच आहे. वडलांचं नाव विलास कोळी. सांगली जिल्ह्याजवळच आमचं गाव आहे. दुष्काळी गाव. शाळेला सुट्टी पडली की मी आई- बापाबरोबर कोल्हापुरात येतो. पण मी शिकणार आहे. शिकून मोठा होणार आहे. बापासारखा जन्मभर हेच करणार नाही."

"माझं नाव आकाश कोळी. माझं वडील कडकलक्ष्मी आहेत. आई आणि वडील दोघंही असंच फिरतात. मी शाळा शिकतो. सातवीत आहे. शाया गावातच आहे. वडलांचं नाव विलास कोळी. सांगली जिल्ह्याजवळच आमचं गाव आहे. दुष्काळी गाव. शाळेला सुट्टी पडली की मी आई- बापाबरोबर कोल्हापुरात येतो. पण मी शिकणार आहे. शिकून मोठा होणार आहे. बापासारखा जन्मभर हेच करणार नाही."

बऱ्याच वर्षापूर्वी पार्थ पोळके यांचं आभरान हे आत्मचरित्र प्रसिद्ध झालं होतं. त्या काळात बलुतं, उपरा, उचल्या यासारख्या दलित - शोषितांच्या आत्मचरित्रांना वाचकांचा प्रचंड- अगदी धो धो प्रतिसाद मिळत होता. पांढरपेशा मानसिकतेच्या समाजाला माहीत नसलेलं शोषितांचं, दीनदलितांचं विदारक विश्व पहिल्यांदाच उघड होऊन समोर आलं होतं. एकामागोमाग एका दलित आत्मकथनं बाहेर येत होती. आत्मचरित्र नव्हे, तर आत्मकथन- आत्मकथन हा नवा शब्द तेव्हा मराठी वाङ्‌मय विश्‍वात रूढ झाला होता. अशातच आभरानचं आगमन झालं. हे पोतराज नावाच्या एका जमातीचं आत्मकथन होतं. त्या प्रकाशन समारंभाला उपस्थित राहिलो होतो. तिथं लेखक पार्थ पोळके यांनी पोतराज समाजातील अनिष्ट रूढी- परंपरांची माहिती सांगणारं, त्यांचं आपल्या समाजव्यवस्थेनं कसं शोषण केलं हे सांगणारं अतिशय परिणामकारक भाषण केलं होतं. ते स्वतः पोतराज समाजाचे, ते ह्या सगळ्या दाहक अनुभवातून गेलेले. पोतराज म्हणजे स्वतःच्या उघड्या अंगावर चाबकाचे फटकारे मारत रस्त्यावर भीक मागत फिरणारी जमात. एक जोडी असते. त्यातली बाई हलगीवर टाक डुई डुई डुई डुई असा आवाज करत जाते आणि पुरुष उघड्या अंगावर लांबलचक अशा आसूडाचे फटके मारत फिरतो. या जमातीला लोकांच्या भाषेत कडकलक्ष्मी असं म्हणतात. सुगीच्या दिवसात खेडोपाड्यात आणि गावाशहरात कडकलक्ष्मी फिरते. यातल्या बाईला की पुरुषाला कडकलक्ष्मी म्हणतात कुणास ठाऊक. पण बहुधा पुरुषालाच म्हणतात. तो आपल्याच अंगावर आसूड ओढून घेताना पाहून लहानपणी माझ्या- किंबहुना साऱ्याच मुलांच्या अंगावर काटा उभा राहात असे. मोठ्या माणसांनं त्या गोष्टीचं फारसं काही वाटत नसे, कारण ते वर्षानुवर्षं ते दृश्‍य पहात आलेले असत. कडकलक्ष्मीच्या आसूडाचा कडाड कडा असा आवाजही आम्हाला फार भयानक वाटत असे. आजही तो आवाज ऐकताना माझ्या अंगावर काटा येतो. तो पुरुष दिसायलाही उग्र असे. काही जोड्यांच्या बरोबर त्यांची मुलंही कडकलक्ष्मीच्या पोशाखात असायची. तीही आपल्या अंगावर आसूड ओढून वळ उठवून घ्यायची. मी कडकलक्ष्मीच्या अंगावर - विशेषतः पाठीवर- मोठमोठाले वळ उठलेले पाहिले आहेत. त्याचं त्यांना काही वाटत होतं की नाही? वेदना होत होत्या की नाही? वेदना होत असल्या तरी त्याच वळावर पुनःपुन्हा फटके मारून घेताना ते जराही कचरत नव्हते.

हे कडकलक्ष्मी जमातीचे लोक येतात कुठून? एरवी राहतात कुठं? जातात कुठं? काहीही कळत नव्हतं. मी अगदी अलीकडे- चार पाच वर्षापूर्वी पोतराज जमातीचे काही लोक कुठं राहतात याचा शोध घ्यावा म्हणून थोडा फिरलो होतो. कडकलक्ष्मी - पोतराज जमात ही भटकी असल्याचं मला समजलं. त्यांचा एक काही ठावठिकाणा नसतो. महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यातलं कुंडल हे क्रांतीकारकांचं गाव. कवी गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी) यांची कृष्णाकाठी कुंडल ही गाजलेली कविता आहे. कुंडल गावात काही घरं पोतराजाची आहेत असं समजलं म्हणून मी गेलो. रा. प. महामंडळाच्या हिरकणी निमआरा बसनं पुण्याहून कराडला गेलो, तिथं उतरून तिथून लाल बसमधून कुंडलला पोहोचलो. पत्ता विचारत विचारत गेलो. सकाळचा कुंडलचा बातमीदार आणि वृत्तपत्र विक्रेता धनंजय दौंडे याला गाठलं. त्याला घेऊन पोतराज जमातीची घरं असलेल्या एका वस्तीवर गेलो. कडकलक्ष्मी ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत असते, अशी माझी समजूत; आणि ते खरं आहे. पण सगळीच परिस्थिती आणि सगळ्यांच्याच बाबतीत ते खरं नसतं हे तिथं गेल्यावर मला समजलं. पण प्रत्यक्ष पोतराजाची घरं गाठली, तेव्हा एक आणखी एक सत्य समोर आलं.

लक्ष्मण किसन सोळवंडे हा पोतराज भेटला. त्यानं आणखी काही जणांना हाक मारली. त्याच्या लहान घराच्या बाहेरच्या बाजूला त्यानं सतरंजी टाकली, तिथं आम्ही बसलो. त्यानं सांगायाला सुरुवात केली,
आमच्यात कडकलक्ष्मीचा वारसा नाही. आमच्या आईची जवळ जवळ दहा पोरं पाठोपाठ कसल्या कसल्या रोगानं मेली. मंग मी झालो, काही दिवसांतच मीही आजारी पडलो. काही केल्या डोळंच उघडनात. दवाखानं केलं, अंगारं-धुपारं केलं, खरं गुण काय यीना. आमची वस्ती म्हंजी सोळवंडी मांगवाडा. आम्ही मांगाचं. कोल्हापूरची लक्ष्मी आमच्यात हाय. आमच्या आईनं मला लक्ष्मीम्होरं नीऊन टाकलं. तिला दंडवत घालून नवस केला, ह्यो वळू तुला सोडला, ह्येला बरा कर. आन्‌ चमत्कार झाला. मी तिथंच डोळं उघाडलं. मंग मला वळू म्हणून सोडलं. तिथनं फुडं भक्ती, पूजाअर्चा हे सगळं चालू झालं. मी पोतराज झालो.

एक गोष्ट समजली नाही; कोल्हापूरची लक्ष्मी म्हणजे कुठली? कारण एक तर करवीर निवासिनी अंबाबाई आहे आणि तिलाच महालक्ष्मी म्हणतात. तिथं असलं काही नसतं. मग लक्ष्मण सोळवंडे म्हणाला ती देवी कुठची? तो सांगायला लागला, आमच्यात कडकलक्ष्मीची म्हणा की पोतराजाची म्हणा, परंपरा अशी न्हाई. मला देवाला सोडलं म्हणून मी पोतराजाची कामं करायला लागलो. पण कडकलक्ष्मी असलो तरी उघडं अंग टाकणारी जमात येगळी आमी येगळं. आमी अंग उघडं ठेवत नाही. त्याचं लांबलचक केस बघून मी त्याबाबत विचारलं, तर तो म्हणाला, केसं मरस्तोवर कापायची न्हाईत. वाडतील तशी वाडवायची. शाळेत जात हुतो, पन पोरं केस वडाय लागली, म्हणून मग शाळाच सोडली.

बाळासाहेब दत्तू मोहिते हा आणखी एक पोतराज म्हणाला, ""पोतराज म्हणजे सोडलेला वळू. आमच्यात असते. मलापन, पोरं जगत नाहीत म्हून आमच्या आईनं देवीला सोडलं. आमी गावोगाव कार्यक्रम करतो. नाच, गाणी हलगी वाजवणं असलं कार्यक्रम लोकांच्या घरोघर करतो.''
बाळासाहेबाच्या बोलण्यातनं लक्ष्मी म्हणजे कोण याचा खुलासा झाला.
अंबाबाई- महालक्ष्मी येगळी, आमची लक्ष्मी येगळी. आमच्या लक्ष्मीला बकरं कापाय लागतंय. पूर्वी नागठाण्यात रेडा सोडायचे. त्यो रेडा कापायची पद्धत होती. आमी देवाचं काम करतो. आमच्यात सातजणी सवाष्णी, आठवा पोतराज, नववा डफकरी असतो.
जेला गावली तेला पावली,
बाकीच्यास्नी भूल दिली,
आदिमाय शक्ती ही दोपारची आरती
येवडी आरती सपली
शंकर पुजेला दुरडी चढली बेलाच्या पानांची
लक्ष्मीआईच्या नावानं चांगलं भलं....

ही प्रार्थना बाळासाहेबानं चालीत म्हणून दाखवली.

हे गुरूकडनं शिकलो. पोतराज बोलवायचा, पट्टी बसवायची, गुरू कान फुकतो. मंत्र असतो, त्यो म्हनायचा. शंभो कैलासपती, शिव हरहर.. पूजा केली की सगळ्यांना पैसे मिळतात. आमी परंपरेतनं आल्यालो न्हाई, म्हून मग आमच्यातला गुरू होत न्हाई. परंपरेतनं येतो, त्याच गुरू हुतो. बलवडीजवळ आळसुंद नावाचं गाव हाय. तिथं गुरू व्हते, आकाराम पोतराज नावाचं. ते वारले. आता नामदेव पोतराज ऱ्हातो. तो गुरू म्हून शिकीवतो. आमी नवसाचं. परंपरेचं येगळं, नवसाचं येगळं.

तिथल्या बाकीच्यांशीही बोललो.

आता कडकलक्ष्मीच्या जमातीतली पोरंही शाळेला जातात. आणि सुट्टीच्या काळात परंपरागत कडकलक्ष्मी म्हणून हिंडत राहतात. परवाच, दिवाळीच्या सुट्टीच्या काळात कडकलक्ष्मी म्हणून अंगावर आसूड ओढत भीक मागणारा एक पोरगा भेटला.

माझं नाव आकाश कोळी. माझं वडील कडकलक्ष्मी आहेत. आई आणि वडील दोघंही असंच फिरतात. मी शाळा शिकतो. सातवीत आहे. शाया गावातच आहे. वडलांचं नाव विलास कोळी. सांगली जिल्ह्याजवळच आमचं गाव आहे. दुष्काळी गाव. शाळेला सुट्टी पडली की मी आई- बापाबरोबर कोल्हापुरात येतो. पण मी शिकणार आहे. शिकून मोठा होणार आहे. बापासारखा जन्मभर हेच करणार नाही.
हा उघड्या अंगाचा बाल कडकलक्ष्मी झालेला, भटक्‍या जमातीतला आकाश नावाचा पोरगा शाळेत जातो, स्थिरावू पाहतो, ही आशादायक गोष्ट आहे. त्यानं जर घराण्याची परंपरा जपायची असं ठरवलं किंवा त्याच्या बापानं त्याला तसं करायला लावलं, तर तो जन्मभर कडकलक्ष्मी म्हणूनच भटकत राहील. मोठेपणी पोतराजाचा गुरूसुद्धा होईल. तसे होऊ नयेच. पण आज तरी परंपरा जपायची म्हणून आणि शिक्षणाला पैसे पाहिजेत म्हणून म्हणा किंवा आई-बापाला सहाय्य म्हणून म्हणा, आजही स्वतःच्या अंगावर आसूड ओढत फिरतो, हा समाजाच्या अंगावर ओढला जात असलेलाच आसूड आहे, नाही का?

Web Title: Shriram Pachindre Blog on Kadaklaxmi