सिंगल फेजवर डल्ला! सोलापूर जिल्ह्यातील ३०० गावे दररोज चार तास अंधारात; ४७४ फीडरवर सायंकाळी ६ ते रात्री १० पर्यंत भारनियमन, वाचा...

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात ‘महावितरण’चे १५०२ फीडर असून त्यावरून ११ लाख ३९ हजार ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. मागील सहा-सात वर्षांपासून ‘लोडशेडिंग’ बंद झाले होते. शेतीसाठी दिवसा आठ तास वीज दिली जाते. मात्र, आता अनेक शेतकरी रात्रीच्या वेळी सिंगल फेज लाइनला कृषीपंप जोडत आहेत.
electricity supply

electricity supply 

sakal

Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात ‘महावितरण’चे १५०२ फीडर असून त्यावरून ११ लाख ३९ हजार ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. मागील सहा-सात वर्षांपासून ‘लोडशेडिंग’ बंद झाले होते. शेतीसाठी दिवसा आठ तास वीज दिली जाते. मात्र, आता अनेक शेतकरी रात्रीच्या वेळी सिंगल फेज लाइनला कृषीपंप जोडत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ४७४ फीडरवरील (२५ एमपीआरपेक्षा जास्त लोड) वीजपुरवठा सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत बंद ठेवावा लागत आहे. याचा फटका सुमारे ३०० गावांना बसत आहे.

राज्य सरकारने एप्रिल २०२४ मध्ये ‘मुख्यमंत्री बळिराजा मोफत वीज योजने’अंतर्गत शेतकऱ्यांना साडेसात अश्वशक्तीपर्यंत (एचपी) मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला. ही योजना मार्च २०२९ पर्यंत लागू असून सोलापूरसह राज्यातील ४४ लाखांवर शेतकऱ्यांना याचा लाभ होत आहे. शेतकऱ्यांना रात्रीच्या अंधारात जीव धोक्यात घालून पाणी द्यावे लागू नये, यासाठी दिवसा आठ तास वीज दिली जात आहे. तसेच ९० टक्के सवलतीत सौरपंप देणारी ‘मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना’ देखील सुरू आहे. असे असूनही, शेतकरी सिंगल फेजवर कृषीपंप जोडत असल्याने घरगुती फीडरवरील भार वाढत आहे.

जिल्ह्यात ६७१ फीडरवर शेती व घरगुती ग्राहकांची एकत्रित वीज जोडणी आहे. त्यातील ४७४ फीडरवरून थ्री-फेज व सिंगल फेज असा दोन्ही पुरवठा होतो. थ्री-फेजमधून दिवसा आठ तास वीज दिली जाते आणि सायंकाळी ६ नंतर त्याच लाइनवरून घरगुती वापरासाठी सिंगल फेज पुरवठा केला जातो. मात्र, त्यावरही कृषीपंप जोडले जात असल्याचे निदर्शनास आल्याने, ३०० हून अधिक गावांत सध्या चार तासांचे भारनियमन केले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सिंगल फेजवर कृषीपंप जोडू नये

सोलापूर जिल्ह्यातील काही फीडरवर शेती व घरगुती अशी दोन्ही कनेक्शन आहेत. घरगुती ग्राहकांसाठीच्या १६ तासांच्या वीजपुरवठ्याचा वापर केवळ घरगुती कारणांसाठीच व्हावा. शेतीसाठी दिलेल्या दिवसाच्या आठ तासांतच पंपांचा वापर करावा. सिंगल फेजवर कोणीही कृषीपंप जोडू नये; भार वाढल्यास फीडर आपोआप बंद पडतो, याची सर्वांनी खबरदारी घ्यावी.

- सुनील माने, अधीक्षक अभियंता, महावितरण, सोलापूर

‘महावितरण’ची ग्रामीणमधील स्थिती

  • एकूण फीडर : १,५०२

  • शेती-घरगुती एकत्रित फीडर : ६७१

  • ‘एसडीपी’ फीडर : ४७४

  • भारनियमनाची अंदाजे गावे : ३००

शहरात दुरुस्तीसाठी वीज बंद, तरीही अडथळे...

शहरात दर बुधवारी देखभाल-दुरुस्तीसाठी वीजपुरवठा काही काळ बंद ठेवला जातो. मात्र, सध्या वाढत्या उन्हामुळे विजेची मागणी प्रचंड वाढली आहे. परिणामी, आठवड्यातील इतर दिवशीही वीज खंडित होत असून त्याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर होत आहे. ज्या फीडरवर लोड जास्त वाढतो, त्या भागातील वीजपुरवठा खबरदारी म्हणून २५-३० मिनिटे बंद ठेवला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com