esakal | केवळ चार दिवसांत  60 हजार रुग्णतपासणी 
sakal

बोलून बातमी शोधा

केवळ चार दिवसांत  60 हजार रुग्णतपासणी 

राज्यात आरोग्य विभागामार्फत घेण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून 16 जिल्ह्यांमध्ये केवळ चार दिवसांत सुमारे 60 हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली.

केवळ चार दिवसांत  60 हजार रुग्णतपासणी 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई - राज्यात आरोग्य विभागामार्फत घेण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून 16 जिल्ह्यांमध्ये केवळ चार दिवसांत सुमारे 60 हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली, तर सुमारे दोन हजार शस्त्रक्रिया करण्यात आल्या. गरजू व गरीब रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आल्याने त्यांना या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून दिलासा देण्यात आला आहे. सुमारे एक हजारहून अधिक शासकीय, खासगी डॉक्‍टर आणि विशेषज्ज्ञांनी सहभाग घेऊन रुग्णांची तपासणी व शस्त्रक्रिया केल्या. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक 9100 रुग्णांची तपासणी करतानाच गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 325 शस्त्रक्रिया करण्यात आल्या. 

"संकल्प निरोगी महाराष्ट्राचा' हे ब्रीद घेऊन राज्यातील पालघर, ठाणे, रायगड, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, अमरावती, यवतमाळ, नाशिक, नंदुरबार, जळगाव, धुळे, पुणे आणि अहमदनगर या 16 जिल्ह्यांमध्ये 26 ते 29 ऑगस्टदरम्यान महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये आरोग्यतपासणी, मोफत चाचण्या, मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून दात, कान, नाक, घसा, त्वचा या विशेषज्ज्ञांनी रुग्णांची तपासणी करतानाच एमबीबीएस, बीएएमएस, आयुर्वेदिक, होमिओपॅथी, युनानी अशा सुमारे हजारहून अधिक डॉक्‍टरांनी महाशिबिरात तपासणी केली. 

जिल्हा व रुग्णतपासणी 
अमरावती : 5 हजार 
नांदेड : 4 हजार 
धुळे : 1600 
नागपूर : 2200 
नंदुरबार : 1500 
पालघर : 4 हजार 
यवतमाळ : 4100 
जळगाव : 950 
गडचिरोली : 3800 
चंद्रपूर : 2700 
ठाणे : 5540 
गोंदिया : 4220 
रायगड : 7325 
पुणे : 1600 
नगर : 2100 
नाशिक : 9100 

loading image
go to top