सोलापुरात सापडतात रोज नवे 30 टक्के कोरोनाबाधित

प्रमोद बोडके
Friday, 10 July 2020

  • या उपाययोजना राहिल्या कागदावरच 
  • रॅपिड अँटीजेन टेस्ट 
  • इन्स्टट्युन्शल क्वारंटाईनचे प्रमाण वाढविणे 
  • आयसोलेशेन बेडची संख्या वाढविणे 

सोलापूर : गृहमंत्री आले, आरोग्यमंत्री आले, विधानसभेचे विरोधी पक्षनेतेही आले. सोलापुरात कोरोना आटोक्‍यात येणार कधी? हा एप्रिलपासून पडलेला प्रश्‍न आजही कायम आहे. सोलापुरात कोरोनाबाधितांचे आणि मृतांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. 1 ते 8 जुलै या कालावधीत सोलापूर महापालिका हद्दीत सरासरी 30 टक्‍क्‍यांच्या वेगाने कोरोनाचा फैलाव होऊ लागला आहे. गेल्या आठ दिवसात 2167 कोरोना चाचण्या झाल्या. त्यातून 659 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. एकूण तपासणीच्या तुलनेत सरासरी 30 टक्के नवीन कोरोनाबाधित आढळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी कोरोना चाचण्यांमध्ये चांगला पायंडा पाडला होता. कोरोना चाचणीचा एकही अहवाल प्रलंबित ठेवला जात नव्हता. 2 जुलैपासून मात्र सोलापूर महापालिका हद्दीतील कोरोना चाचणीचे अहवाल प्रलंबित राहू लागले आहेत. संशयित कोरोनाबाधित वाढल्याने अहवाल प्रलंबित राहू लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

1 ते 8 जुलै या कालावधीत नव्याने आढळलेल्या 659 कोरोनाबाधितांपैकी 37 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्‍यात येणार कसा? हा प्रश्‍न कायम असतानाच आता शहराशेजारी असलेल्या अक्कलकोट, दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्‍यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या तालुक्‍यांमधील वाड्या वस्त्यांवर कोरोनाचा संसर्ग पोचल्याने सोलापूर व परिसरातील कोरोना हद्दपार करण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज निर्माण झाली आहे. 

महापलिका हद्दीतील कोरोनाची वाटचाल 
ता.          तपासणी           बाधित             मृत्यू 
1 जुलै      180                 43                 5 
2 जुलै      193                 71                 6 
3 जुलै      342                102                2 
4 जुलै      349                 83                 4 
5 जुलै      339                 106               4 
6 जुलै      261                 126               6 
7 जुलै      271                 38                 5 
8 जुलै      232                 90                 5 
एकूण      2167               659               37


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Solapur, 30 per cent new corona is found every day