सोलापूर जिल्ह्यातील 38 पैकी फक्त 24 कारखान्यांतच होणार गाळप

भारत नागणे : सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

- दुष्काळ व अतिपावसाचा परिणाम

- बदलत्या हवामानामुळे उस उत्पादनात घट

- गतवर्षिच्या तुलनेत यंदा निम्मेच उस उत्पादन

पंढरपूर  : राज्यात सर्वाधिक ऊस आणि साखर उत्पादन करणाऱ्या सोलापूर जिल्ह्याला 
यावर्षी दुष्काळ आणि महापुराचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे ऊस उत्पादन निम्म्यानेच घटले आहे. 
ऊस उत्पादन घटल्याने जिल्ह्यातील एकूण 38 साखर कारखान्यांपैकी फक्त 24 साखर कारखान्यांनी 
गाळप परवान्यासाठी अर्ज केले आहेत. यावर्षी जिल्ह्यात केवळ 80 ते 90 लाख टन इतकेच उसाचे गाळप होईल, 
असा अंदाज सोलापूर प्रादेशिक साखर सहसंचालकांनी व्यक्त केला आहे. 

उजनी आणि वीर, भाटघर धरणाच्या पाण्यामुळे सोलापूर जिल्ह्यात उसाचे पीक मोठ्या 
प्रमाणावर घेतले जाते. मागील काही वर्षांपासून जिल्ह्यात विक्रमी ऊस गाळप होते. 
त्यामुळे राज्यात सर्वाधिक ऊस आणि साखर उत्पादन करणारा जिल्हा म्हणून सोलापूरची 
ओळखी तयार झाली आहे. 

परंतु मागील दोन-तीन वर्षांपासून सततचा दुष्काळ आणि बदलत्या हवामानामुळे ऊस उत्पादनात 
कमालीची घट आली आहे. यावर्षीही सोलापूर जिल्ह्यात अखेरपर्यंत पाऊस नव्हता. त्यामुळे 
जिल्ह्यातील उसाचे पीक जळून गेले. तर अनेक शेतकऱ्यांनी चाऱ्यासाठी वापर केला. 
जिल्ह्यात दुष्काळ असताना राज्यात मात्र महापुराची स्थिती होती. भीमा नदीला दोन वेळा 
आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या ऊस पिकाचे नुकसान झाले. त्याचाही परिणाम ऊस उत्पादनावर झाला आहे. 

गेल्यावर्षी जिल्ह्यातील 31 साखर कारखान्यांनी एक कोटी 61 लाख 28 हजार 
524 टन उसाचे गाळप केले होते. तुलनेत यावर्षी जिल्ह्यात फक्त 80 ते 90 लाख 
टन इतकेच गाळप होईल. त्यामुळे जिल्ह्यातील साखर कारखान्यांना 70 ते 80 
लाख टनाचा फटका बसणार आहे. 

जिल्ह्यात दोन लाख हेक्‍टर ऊस उपलब्ध 
यावर्षीच्या हंगामासाठी जिल्ह्यात दोन लाख 167 हेक्‍टर क्षेत्रावरील ऊस पीक गाळपासाठी 
उपलब्ध आहे. दरम्यान, हेक्‍टरी ऊस उत्पादनात 50 टक्‍क्‍यांहून अधिक घट झाली आहे. 
गतवर्षीच्या तुलनेत निम्म्यानेच उसाचे गाळप होणार आहे. 

54 कोटींची एफआरपी अजूनही थकीत 
मागील वर्षीच्या हंगामातील सुमारे 54 कोटी रुपयांची एफआरपीची रक्कम अजूनही थकीत आहे. 
एफआरपीची पूर्ण रक्कम शेतकऱ्यांना दिल्याशिवाय साखर कारखान्यांना गाळप परवाना दिला नाही, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. 

सोलापूर जिल्ह्यात यावर्षी दोन लाख हेक्‍टर क्षेत्रावर उसाचे पीक आहे. गतवर्षीच्या तुलनेत 
यावर्षी 50 टक्‍क्‍यांनी उत्पादन घटणार आहे. आतापर्यंत 24 साखर कारखान्यांना गाळप परवाने दिले आहेत. 
- राजेंद्रकुमार दराडे, प्रादेशिक सह संचालक, सोलापूर 

आकडे बोलतात. 
उपलब्ध ऊस ः- 2 लाख 167 हेक्‍टर ऊस उपलब्ध 
उत्पादन ः- 80 ते 90 लाख टन 
थकीत एफआरपी ः- 54 कोटी 
गाळप परवाने 24 साखर कारखाने 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur area out of 38 Gallup in just 24 factories