
तात्या लांडगे
सोलापूर : मागील तीन वर्षांत सोलापूर शहरात नव्या १९ मिरवणुकांची भर पडली आहे. वर्षातील किमान १८७ दिवस सार्वजनिक मिरवणुका निघतात. यातील जवळजवळ सर्वच मिरवणुकांत डीजे लावले जात आहेत. डीजेच्या गोंगाटामुळे अनेकांच्या कानाचा पडदा फाटून कायमचा बहिरेपणा आला. काही तरुणांची हृदयगती थांबली.
तरीही मंडळांचे पदाधिकाऱ्यांचे डोळे उघडायला तयार नाहीत. पोलिसांची अवस्था इतकी केविलवाणी झाली आहे की त्यांचा काही जरब म्हणून राहिलाच नाही. कोणी पोलिसांशी हुज्जत घातलीच तर तेवढ्यापुरती कारवाई करण्याचे सोपस्कार ते पार पडतात, अशी स्थिती झाली आहे. मिरवणुकांमध्ये ‘एक टॉप एक बेस’ला परवानगी आहे, पण प्रत्यक्षात मोठ्या आवाजाचा ‘डीजे’च लावला जातो. याशिवाय ‘व्हीआयपीं’चे दौरे, कार्यक्रमांमध्येही ‘डीजे’ दिसतो. आवाजाच्या मर्यादेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असतानाही त्याचे पालन केले जात नाही.
कायदा अन् शिक्षा नावालाच
ध्वनी प्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) नियम २००० हा महत्वाचा कायदा आहे. रहिवासी, शांतता आणि औद्योगिक भागांसाठी आवाजाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार रहिवासी भागात दिवसा ५५ डेसिबल आणि रात्री ४५ डेसिबल, तर शांतता क्षेत्रात (सायलेन्स झोन) दिवसा ५० आणि रात्री ४० डेसिबल आवाजाची मर्यादा बंधनकारक आहे. औद्योगिक क्षेत्रात दिवसा ७५ आणि रात्री ७० डेसिबलपर्यंत आवाज असावा असा नियम आहे. मात्र, सोलापूर शहरातील कोणत्याच मिरवणुकांमध्ये ही मर्यादा पाळली जात नाही.
बोलाचाच भात बोलाचीच कढी
मिरवणुकांपूर्वी पोलिस आयुक्तालयात प्रत्येकवेळी शांतता कमिटी व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होते आणि त्याठिकाणी सर्वांनाच शिस्तीचे धडे दिले जातात. परवानगी घेताना सर्वांना अटी मान्य असतात, पण प्रत्यक्षात मिरवणुकीत तेच पदाधिकारी पोलिसांशीच हुज्जत घालतात. अनेकदा पोलिस ‘डीजे’चा आवाज मोजतात, पण पुढे तो आवाज दाबला जातो. त्यामुळे ‘मिरवणूक म्हटलं की डीजे’ हे समिकरण सोलापूर शहरात तयार झाले आहे.
दरवर्षी ‘डीजे’वर ५० कोटींची उधळण
सोलापूर शहरात दरवर्षी सण-उत्सव, महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी निमित्ताने व अलिकडे छोट्या-मोठ्या कार्यक्रमासह विवाह, वाढदिवसाला देखील ‘डीजे’ लावण्यात येतो. राज्यात सर्वाधिक सण-उत्सव साजरा करणारे शहर म्हणून पोलिस आयुक्तालयाकडे त्याची नोंद देखील आहे. दरवर्षी सोलापुरातील मिरवणुकांमधील ‘डीजे’वर अंदाजे ५० कोटींचा खर्च होतो, असे विविध मंडळांचे पदाधिकारी सांगतात.
... तर डीजे जागेवरच होईल जप्त
मिरवणुकांमध्ये एक बेस व एक टॉपला परवानगी असून मंडळांनी लावलेल्या ‘डीजे’चा आवाज मर्यादेत असणे बंधनकारक आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेशदेखील आहेत. मोठ्या आवाजाचे खूप दुष्परिणाम आहेत. त्यामुळे प्रत्येक मंडळांनी लावलेल्या ‘डीजे’चा आवाज मोजून संबंधितांवर निश्चितपणे कारवाई केली जाते. पण, यापुढे त्या मंडळांनी लावलेले डीजे जागेवरच जप्त केले जातील.
- विजय कबाडे, पोलिस उपायुक्त, सोलापूर शहर
‘डीजे’ ठरतोय मृत्यूदूत ...
१) चार वर्षांपूर्वी सरस्वती चौकात मिरवणूक पहायला गेलेली ५२ वर्षीय व्यक्ती घरी आल्यावर हदयविकाराच्या झटक्याने मरण पावली.
२) ‘डीजे’चा आवाज कमी करा म्हणून सांगायला गेलेल्या देगाव परिसरातील राजू यादगिरीकर यांना कायमचा बहिरेपणा आला आहे.
३) तीन दिवसांपूर्वी मिरवणुकीत सहभागी झालेल्या अभिषेक संगप्पा बिराजदार (वय २७) याचा हदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.