Praniti Shinde: सोलापूरमध्ये भाजपचा पराभव का झाला? प्रणिती शिंदेंच्या माईंडगेमपुढे भाजपची सपशेल हार!

Ram Satpute allegation against Sushil Kumar Shinde संपूर्ण निवडणूक आपल्या अजेंड्याभोवती फिरवणाऱ्या काँग्रेसच्या खेळीपुढे भाजपला हार मानावी लागली. आमदार प्रणिती शिंदेंनी स्थानिक मुद्यांवर बोला म्हणत राम सातपुतेंना त्याचे उत्तर देण्यातच गुंतवले. ही खेळी न समजलेल्या राम सातपुतेंचा पराभव करीत प्रणिती शिंदेनी वडील सुशीलकुमार शिंदेंच्या मागील दोन पराभवाचा वचपा काढण्यात यश मिळविले.
Ram Satpute allegation against Sushil Kumar Shinde
Ram Satpute allegation against Sushil Kumar Shindeesakal

सोलापूर : संपूर्ण निवडणूक आपल्या अजेंड्याभोवती फिरवणाऱ्या काँग्रेसच्या खेळीपुढे भाजपला हार मानावी लागली. आमदार प्रणिती शिंदेंनी स्थानिक मुद्यांवर बोला म्हणत राम सातपुतेंना त्याचे उत्तर देण्यातच गुंतवले. ही खेळी न समजलेल्या राम सातपुतेंचा पराभव करीत प्रणिती शिंदेनी वडील सुशीलकुमार शिंदेंच्या मागील दोन पराभवाचा वचपा काढण्यात यश मिळविले. त्यांच्या विजयामुळे काँग्रेसच्या अपयशाच्या मालिकेतील हॅट्‌ट्रिक रोखली गेली. मतदारसंघात महायुतीचे पाच आमदार असतानाही भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना पराभवाच्या नामुष्कीला सामोरे जावे लागले.

काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांची उमेदवारी सहा महिन्यांपूर्वीच जाहीर झाल्याने त्यांना प्रचारासाठी वेळ मिळाला. तर या उलट भाजपच्या सातपुते यांची उमेदवारी ऐनवेळी जाहीर झाली. आमदार यांचे सोलापूर शहरातील विविध भागात भावी खासदार असे फलकही गेल्या सहा महिन्यांपासून लागत होते. मतदासंघात सहापैकी पाच आमदार महायुतीचे असल्याने आपले यश निश्‍चित असल्याच्या अतिआत्मविश्‍वाने भाजपचा घात केला. मागील दोन्ही खासदार निष्क्रिय असल्याचा फटकाही भाजपच्या उमेदवारास या निवडणुकीत बसला. तर गेल्यावेळी तब्बल एक लाख ७० हजारांवर मते मिळविणाऱ्या ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या सारखा तिसरा उमेदवार यंदा निवडणूक रिंगणात नव्हता हे काँग्रेसच्या फायद्याचे ठरले.

यंदा वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी जाहीर झालेल्या राहुल गायकवाड यांनाच काँग्रेसमध्ये आणण्यात शिंदेंना यश मिळाले. या खेळीमुळे मतांच्या विभागणीचा फटका काँग्रेसला बसला नाही. भाजपचे दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख, मंगळवेढा-पंढरपूरचे समाधान आवताडे तसेच मोहोळचे राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार यशवंत माने या फळीचा प्रभाव या निवडणुकीत दिसला नाही. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, शहर उत्तरचे विजयकुमार देशमुख यांच्या केवळ दोन मतदारसंघातूनच मताधिक्य मिळाले आहे. पण, अक्कलकोटमधून अपेक्षित यश मिळू शकले नाही.

तसेच ३० हजार घरकुलांच्या रे नगरच्या उभारणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सहकार्याबद्दल तोंडभरून कौतुक करणाऱ्या कॉ. आडम मास्तरांनी आमदार शिंदेंना पाठिंबा दिला. तर भाजप व मोदींनी केलेल्या राम मंदिर उभारणी, काश्मीरमध्ये लागू केलेल्या ३७० कलमाकडे दुर्लक्ष करत मतदान केल्याचे दिसत आहे. यावेळी कोणतीच लाट नसल्याने ही निवडणूक अगदीच वेगळी होती. पंतप्रधान मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या मातब्बर नेत्यांच्या सोलापुरात सभा होऊनही मतदारांनी त्यांच्या बाजूंनी कौल दिला नाही. प्रचाराचा सूर मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यावर होती. आ. प्रणिती शिंदे यांच्या विजयाने काँग्रेसच्या पराभवाची व भाजपच्या विजयाची हॅटट्रीक रोखली गेली.

श्‍वास रोखून धरणाऱ्या फेऱ्या

सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) सकाळी मतमोजणीस सुरवात झाली. तब्बल अकरा फेऱ्यांपर्यंत प्रत्येक फेरीला श्‍वास रोखून धरण्याचा कल जाहीर होत होता. कधी आमदार शिंदे तर कधी आमदार सातपुते पुढे जात होते. दोघांमधील काट्याची टक्कर श्‍वास रोखून धरावयाला लावत होती. प्रत्येक फेरीत मताधिक्य कमी-अधिक होत असल्याचे दिसत होते. पण, त्यानंतर घेतलेला लीड राम सातपुतेंना तोडता आला नाही.

मतदारांची नाराजी

राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना व राष्ट्रवादी फोडून सरकार बनविण्यात महायुतीला यश आले खरे. पण या अभद्र महायुतीचा मतदारांनी स्वीकार केला नसल्याचे या निकालावरून दिसते. मागील दोन खासदारांची निष्क्रियता, मराठा आरक्षणाचा मुद्दा, बेरोजगारी, शेतकरी, व्यापाऱ्यांची नाराजी, स्थानिक व परका उमेदवार या मुद्द्यांवर या निवडणुकीचा कल बदललेला दिसला.

काँग्रेसचा प्रचाराचा फंडा

 • स्थानिक व परका उमेदवार असा लेटर बॉम्ब

 • सोलापूरची लेक असल्याचा भावनिक मुद्दा

 • चारित्र्यहननाचा मुद्दा

 • विकासाच्या मुद्द्यावर बोलण्याचा आग्रह

 • संविधान बचावचा प्रखर प्रचार

 • तिसऱ्या प्रबळ उमेदवाराचा अभाव

 • मराठा आरक्षणाचा मुद्दा फायद्याचा

 • दुसऱ्या फळीतील नेत्यांवर भिस्त

 • सिद्धेश्‍वर कारखान्याच्या चिमणीचा मुद्दा

 • विमानतळाचा प्रलंबित प्रश्‍न

-----------------------------------------------------------------------------

 • भाजपचे प्लस पॉइंट -

 • महायुतीच्या पाच आमदारांवर मदार

 • पहिल्या फळीतील नेत्यांची कुमक

 • सोशल मीडियाचा प्रभावी वापर

 • हिंदुत्वाचा मुद्दा

 • मोदींच्या विकासाचे स्वप्न

 • ४८ हजार कोटींच्या महामार्गाचे जाळे

 • आक्रमक, विकासात्मक चेहऱ्याचा उमेदवार

सोलापूर लोकसभा

 • प्रणिती शिंदे ः ६,२०,२२५

 • राम सातपुते ः ५,४६,०२८

 • मताधिक्य ः ७४,१९७

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com