सोलापूर महापालिका घेणार लिपिकांची परीक्षा, दुसऱ्या संधीतही नापास झाल्यास पदावनत, प्रारंभिक वेतन श्रेणी 

प्रमोद बोडके
Thursday, 6 August 2020

परीक्षेला 17 ऑगस्टपासून सुरवात होणार असून या परीक्षेचे वेळापत्रक व ठिकाण लवकरच कळविले जाईल. अनुत्तीर्ण होणाऱ्यांना सुधारणा करण्यासाठी आणखीन एक संधी दिली जाणार आहे. दुसऱ्या संधीतही अनुत्तीर्ण झाल्यास कर्मचाऱ्यावर पदावनत/प्रारंभिक वेतनावर आणण्याची कारवाई केली जाणार आहे. पदावनत केलेल्या जागेवर नवीन परंतु हुशार कर्मचाऱ्याला (टंकलेखन व संगणकीय कामकाज येणाऱ्या) कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली जाईल. 
- पी. शिवशंकर, आयुक्त, महापालिका 

सोलापूर : कोरोनाच्या संकटाचा सामना करणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांना आता आणखी दुसऱ्या एका परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. कागदोपत्री संगणक साक्षर असलेल्या आणि टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण असलेल्या कर्मचाऱ्यांना महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी जोरदार झटका दिला आहे. त्या कर्मचाऱ्यांचे संगणकिय व टंकलेखनाचे ज्ञान तपासण्यासाठी महापालिकेत लिपिक संवर्गात कार्यरत असलेल्या व या पदावरून पदोन्नती घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या संगणकिय व टंकलेखनाच्या ज्ञानाची परीक्षा 17 ऑगस्टपासझून घेतली जाणार आहे. 

महापालिकेत कार्यरत असलेल्या कनिष्ठ श्रेणी लिपिक, वरिष्ठ लिपिक, वरिष्ठ मुख्य लेखणीक व कार्यालय अधीक्षक यांना मराठी, इंग्रजी टंकलेखन व संगणक कामकाजाचे ज्ञान असणे आवश्‍यक आहे. सध्या कार्यरत असलेल्या लिपिक संवर्गातील बहुतांश कर्मचाऱ्यांना टंकलेखन व संगणकावरील कामकाज येत नसल्याचे महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे कार्यरत लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांची 17 ऑगस्ट पासून टंकलेखनओ व संगणकिय ज्ञानाची परीक्षा (एमएस-सीआयटीच्या धर्तीवर) घेण्याचा निर्णय महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी घेतला आहे. 

पदोन्नती घेतलेला कर्मचारी जर टंकलेखन व संगणकीय परीक्षेत अनुत्तीर्ण झाला तर त्या कर्मचाऱ्याला पदावनत करण्यात येणार आहे. कनिष्ठ लिपिक जर अनुत्तीर्ण झाला तर त्यास वेतन श्रेणीतील प्रारंभिक वेतनावर आणण्यात येणार आहे. लिपिक संवर्गातील ज्या कर्मचाऱ्यांचे वय 1 ऑगस्टला पन्नास वर्षे पूर्ण झाले आहे अशा कर्मचाऱ्यांना केवळ संगणकावर मराठी टंकलेखन परीक्षा द्यावी लागणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे वय 1 ऑगस्ट रोजी 50 वर्षांपेक्षा कमी आहे अशा कर्मचाऱ्यांसाठी टंकलेखन कामकाज व संगणकीय ज्ञानाची परीक्षा द्यावी लागणार आहे.

महाराष्ट्र


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur Municipal Corporation to conduct clerks' examination, demotion if failed in second chance, initial pay grade