सोलापूर : ‘दुष्काळी’ अशी ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्याने फळबागा, प्रक्रिया उद्योग आणि निर्यातीच्या बळावर समृद्धीकडे दमदार वाटचाल सुरू केली आहे. साखर, केळी, डाळिंब, द्राक्ष या पिकांच्या माध्यमातून सोलापूरने देशासह जागतिक पातळीवर वर्चस्व निर्माण केले आहे. सध्या जिल्ह्यात सुमारे १ लाख ३५ हजार हेक्टरवर फळबागा तर २ लाख हेक्टरवर उसाचे क्षेत्र असून, या माध्यमातून दरवर्षी हजारो कोटींची उलाढाल होत आहे. तसेच सोलापूरच्या टेक्सटाइल उद्योगानेही जागतिक पातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. जिल्ह्यातील निर्यातीमध्ये कृषी उत्पादनांच्या खालोखाल टेक्सटाइलचा वाटा आहे. एकूण निर्यातीपैकी १६ टक्के निर्यात ही टेक्सटाइल उत्पादनांची आहे. महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या या प्रगतीचा घेतलेला आढावा.
केळी उत्पादनात राज्यात आघाडी
केळी उत्पादनात सोलापूरने मक्तेदारी मोडीत काढत राज्यात अव्वल स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे, जिल्हा केवळ उत्पादनापुरता मर्यादित न राहता केळी निर्यातीचे ‘ग्लोबल हब’ म्हणून उदयास आला आहे. ठिबक सिंचन, टिश्यू कल्चर रोपे आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानामुळे उत्पादनक्षमता वाढली असून अनेक शेतकरी प्रतिहेक्टर ३० ते ३५ टनांपर्यंत उत्पादन घेत आहेत. सध्या सुमारे ३६ हजार हेक्टरवर केळीची लागवड असून जिल्हा निर्यात क्षेत्रातही पुढे आला आहे. अनेक शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या (एफपीओ) माध्यमातून थेट निर्यातदार म्हणून पुढे येत आहेत. कोल्ड स्टोरेज, पॅकिंग हाऊस आणि लॉजिस्टिक्स सुविधांमुळे केळी निर्यातीला चालना मिळत आहे. राज्याच्या एकूण केळी निर्यातीत सुमारे ६५ टक्के वाटा सोलापूरचा असून या पिकातून दरवर्षी ८०० ते १,००० कोटींची उलाढाल होते.
साखर उद्योग : सोलापूरचा आर्थिक कणा
जिल्ह्यातील साखर उद्योग हा स्थानिक अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. राज्यातील सर्वात मोठ्या साखर कारखानदारी म्हणून सोलापूरची ओळख आहे. वाढत्या सिंचनामुळे ऊस लागवड वाढली असून जिल्ह्यात सुमारे ४३ हून अधिक साखर कारखाने कार्यरत आहेत. जिल्ह्याची एकूण गाळप क्षमता अंदाजे २ लाख टन प्रतिदिन आहे. साखर उत्पादनासोबतच बगॅसवर आधारित वीजनिर्मिती आणि मोलॅसेसपासून इथेनॉल निर्मितीमुळे उद्योग अधिक सक्षम झाला आहे. या क्षेत्रातून थेट व अप्रत्यक्ष मिळून सुमारे १ ते १.५ लाख लोकांना रोजगार मिळत आहे. हा उद्योग शेतकरी, वाहतूक, कामगार आणि ऊर्जा क्षेत्राशी जोडलेला आहे. दरातील चढ-उतार आणि पाण्याच्या समस्यांसारखी आव्हाने असली तरी जिल्ह्यातील साखर उद्योगाची एकूण उलाढाल सुमारे १० हजार कोटींच्या घरात असून, हा उद्योग जिल्ह्याच्या विकासाचा प्रमुख आधार आहे.
डाळिंबातून ‘गोड’ कमाई
डाळिंबाने जिल्ह्यात कृषी क्रांती घडवून आणली आहे. जिल्ह्यात सुमारे ३७ हजार हेक्टरवर डाळिंबाची लागवड असून गुणवत्तापूर्ण उत्पादनामुळे सोलापूरने जागतिक बाजारपेठेत ठसा उमटवला आहे. आकर्षक रंग, चांगला आकार आणि उत्कृष्ट चवीमुळे येथील डाळिंबाला युरोप तसेच आखाती देशांत मोठी मागणी आहे. देशांतर्गत विक्रीबरोबरच निर्यातीमुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळत असून, यामधून दरवर्षी सुमारे ३ हजार कोटींची उलाढाल होते.
बेदाण्यामुळे द्राक्षबागांना नवे बळ
द्राक्ष व बेदाणा उत्पादनातही सोलापूरने वेगळी ओळख निर्माण केली आहे. द्राक्षांची गोडी आणि दर्जेदार बेदाण्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. एकेकाळी बेदाणा बाजारपेठेत सांगली-तासगावचे वर्चस्व असताना आता सोलापूर आणि पंढरपूर बाजार समित्या प्रमुख केंद्र म्हणून पुढे आल्या आहेत. पूर्वी केवळ ताज्या द्राक्ष विक्रीवर भर असताना आता बेदाणा निर्मितीमुळे द्राक्षशेतीला नवे बळ मिळाले आहे. जिल्ह्यात द्राक्ष लागवड सुमारे २५ हजार हेक्टरपर्यंत पोहोचली असून द्राक्ष विक्री आणि बेदाणा उत्पादनातून दरवर्षी सुमारे ५ हजार कोटींची उलाढाल होते.
सोलापूरच्या टेक्सटाइलची ओळख जागतिक पातळीवर
मागील काही वर्षांत सोलापूरच्या वस्त्रोद्योग निर्यातीमध्ये सकारात्मक बदल झाले आहेत. देशांतर्गत बाजारपेठेत येथील फॅन्सी व युनिफॉर्म उत्पादने वेगळी ओळख निर्माण करत आहेत. युनिफॉर्म व गारमेंट प्रकारच्या उत्पादनांची निर्यात चांगल्या प्रमाणात होत आहे. कृषी उत्पादनांच्या खालोखाल टेक्सटाइल निर्यातीचा वाटा आहे. एकूण निर्यातीपैकी १६ टक्के निर्यात ही टेक्सटाइल उत्पादनांची आहे. सोलापूरचे युनिफॉर्म सध्या यूएई, दुबई, युगांडा, कतार, इस्रायल, केनिया, बहारिन, सौदी, युके, टांझानिया, यूएसए व घाना या देशांत निर्यात होतात. टेरी टॉवेलची उत्पादने युरोप आणि यूएसएमध्ये पूर्वीपासून मागणीत आहेत. युनिफॉर्मच्या संदर्भात केवळ शालेय गणवेश एवढ्यापुरता उद्देश न ठेवता कॉर्पोरेट ते आर्मी गणवेशापर्यंत सर्व प्रकारची उत्पादने तयार करण्याची तयारी सोलापूरच्या वस्त्रोद्योग क्षेत्राने केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.