पुण्याच्या पावसावर सोलापूरच्या "उजनी'ची मदार 

संतोष सिरसट 
Monday, 3 August 2020

उजनी धरणातील पाणीसाठ्याची स्थिती 
एकूण पाणीसाठा ः 70.33 टीएमसी (मागील वर्षी-81.35 टीएमसी) 
उपयुक्त पाणीसाठा ः 6.66 टीएमसी (मागील वर्षी-17.68 टीएमसी) 
उपयुक्त पाणीसाठा ः 12.44 टक्के (मागील वर्षी-33.01 टक्के) 
दौंड येथून धरणात येणारे पाणी ः 2470 क्‍सुसेक 
(सोमवार सकाळी सहाची स्थिती) 

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात असलेले उजनी धरण भरण्यासाठी पुणे जिल्ह्यात मोठा पाऊस पडणे अपेक्षित असते. पुण्याच्या पावसावरच उजनी धरणाची मदार आहे. यंदा उजनी धरण परिसरातच चांगला पाऊस झाल्याने धरणाची पाणी पातळी वजामधून अधिक झाली आहे. मात्र, पुणे जिल्ह्यात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाऊस असल्याने त्याठिकाणाहून उजनीत पाणी आलेले नाही. त्यामुळेच मागील वर्षीच्या तुलनेत यंदा धरणातील पाणीसाठा कमीच असल्याचे दिसून येते. 

उजनी धरणाकडे सोलापूरसह पुणे, नगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचेही लक्ष लागलेले असते. धरण कधी एकदा शंभर टक्के भरते याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असतात. एकदा धरण भरले म्हणजे वर्षभराची पाण्याची भ्रांत संपून जाते. धरण भरल्यानंतर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद दिसू लागतो. त्यामुळे धरण कधी भरणार याकडे त्यांचे लक्ष लागलेले असते. 
पुण्यातील भामा-आसखेड, पवना, टेमघर, पानशेत, खडकवासला या धरणाचा पाणीसाठा अद्यापही 30-40 टक्‍यांच्या आसपासच आहे. पुणे जिल्ह्यात पाऊस पडल्याशिवाय ही धरणे भरणार नाहीत व पुणे जिल्ह्यातील धरणे भरल्याशिवाय उजनीत पाणी येणार नाही हे समीकरण सरळ आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी पुणे जिल्ह्यात पाऊस पडावा म्हणून देव पाण्यात घालत आहेत. मागील वर्षी या काळात पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला होता. त्या पावसाच्या जोरावरच उजनी धरणाचा पाणीसाठा आजअखेर जवळपास 33 टक्के इतका झाला होता. त्यावेळी सोलापूर जिल्ह्यात सुरवातीच्या काळात पाऊसच झाला नव्हता. तरीही पुण्याच्या पावसावर धरण शंभर टक्के भरले होते. पण, यंदा ती स्थिती राहिली नसल्याचे दिसू लागले आहे. 

 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solapur ujani dam depend on pune rain