अजितदादांनी बैठक घेताच अधिकाऱ्यांनी सकाळी आठ वाजताच गाठले विमानतळ 

प्रमोद बोडके
Wednesday, 16 September 2020

वर्षानुवर्षे रखडलेला विषय अजितदादांच्या बैठकीनंतर तत्काळ मार्गी लागण्यास सुरुवात झाली असून अधिकारी आपल्या फौजफाट्यासह, लवाजम्यासह सकाळी सकाळी चिखल तुडवत बोरामणी-तांदळवाडीच्या माळरानावर आज पोहोचले. 
बोरामणी विमानतळासाठी नव्याने संपादित करण्यात येणाऱ्या 29 हेक्‍टर जमिनीतील झाडे, फळबागा, पिके यांची मोजणी व मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण केली. विमानतळ व्यवस्थापक सज्जन निचळ यांच्यासोबत जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने हे देखील स्वतः यावेळी हजर होते.

सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रशासनावरील पकड व कामाचा वकूब संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. याच पकडीचा आणि वकूबाचा नमुना आज बोरामणी विमानतळ पसिरातील नागरिकांनी घेतला. गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः लक्ष घातले आहे. 

या विमानतळासाठी आवश्‍यक असलेला निधी, विमानतळाच्या भूसंपादनासाठी व वन जमिनीच्या निर्वनीकरणासाठी आवश्‍यक असलेल्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी (ता. 15) मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिल्या होत्या. मंगळवारी दुपारी बैठक झाल्यानंतर अवघ्या 24 तासांच्या आतच सोलापूर जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आज सकाळी 8 वाजताच बोरामणी विमानतळ गाठले. अजितदादांच्या बैठकीचे गांभीर्य ओळखून 24 तासांच्या आत कृषी, जलसंधारण, महसूल, सार्वजनिक बांधकाम व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बोरामणी विमानतळाकडे धाव घेतली.

विमानतळाच्या हद्दीत देणाऱ्या 33.72 हेक्‍टर वन जमिनीचे निर्वनीकरण आवश्‍यक आहे. वन विभागाला देण्यात येणाऱ्या पर्यायी जमिनीची पाहणी व ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी वन विभागाच्या अधिकारी सुवर्णा झोळ यादेखील त्यांच्या कर्मचाऱ्यांसह उपस्थित होत्या. नव्याने संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीतील विहिर, बोअरची पाहणी करण्यासाठी जलसंधारण विभागाचे अधिकारी, या 29 हेक्‍टरमध्ये येणाऱ्या इमारती व इतर बांधकामांची पाहणी व मुल्यांकन प्रक्रिया करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

आज सकाळपासूनच बोरामणी विमानतळ हद्दीतील जमिनीची पाहणी केलेल्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागाशी संबंधित असलेले सर्व दस्ताऐवज, अहवाल जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना आज रात्री सादर केले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कार्यतत्परता व प्रशासनातील वचक याचा नमुना बोरामणी परिसरातील नागरिकांना बघायला मिळाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: As soon as Ajit Pawar held the meeting, the officials reached the airport at 8 in the morning