लांबलेल्या मॉन्सूनचा फटका 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जुलै 2019

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा या कालावधीत जवळजवळ 30 टक्‍के इतक्‍या पेरण्या कमी झाल्या आहेत, त्यामुळे यंदा अन्नधान्याचे उत्पादन घटण्याची शक्‍यता आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत पन्नास लाख हेक्‍टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या

मुंबई - गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा या कालावधीत जवळजवळ 30 टक्‍के इतक्‍या पेरण्या कमी झाल्या आहेत, त्यामुळे यंदा अन्नधान्याचे उत्पादन घटण्याची शक्‍यता आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत पन्नास लाख हेक्‍टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. यंदा याच कालावधीत 35 लाख हेक्‍टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. राज्यात सरासरी एकूण पेरणी क्षेत्र एक कोटी 40 लाख हेक्‍टरच्या आसपास आहे. 

यंदा मॉन्सून लांबल्यामुळे पेरण्या लांबल्या आहेत. जूनच्या शेवटी आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्यात पावसाला सुरवात झाली. या दरम्यान पेरण्या झाल्या असल्या तरी गेल्यावर्षीच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. यामध्ये भात, खरीप ज्वारी, बाजरी, रागी, मका आदी पिकांच्या पेरण्या कमी झाल्या आहेत. एक लाख चार हजार 585 हेक्‍टर इतक्‍या क्षेत्रावर आतापर्यंत भात पेरणी झाली आहे, तर मक्‍याची एक लाख 97 हजार 404 हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तृणधान्याबरोबरच तूर, मूग, उडीद आदी कडधान्यांच्या पेरण्याही कमी झाल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत तूर 47 टक्‍के, मूग 51 टक्‍के, उडीद 59 टक्‍के इतक्‍या कमी पेरण्या झाल्या आहेत. कडधान्याप्रमाणेच तेलबियांचे पेरणी क्षेत्रही गेल्यावर्षीच्या तुलनेत कमीच आहे. भुईमूग, तीळ, कारळे, सूर्यफूल, सोयाबीन आदी तेलबियांचे पेरणी क्षेत्र कमी आहे. सोयाबीन 53 टक्‍के, सूर्यफूल 89 टक्‍के, तर भुईमूग 21 टक्‍के इतके कमी क्षेत्र पेरणीचे ठरले आहे. 

1 कोटी 40 लाख हेक्‍टर  - राज्यातील एकूण पेरणी क्षेत्र 
50 लाख हेक्‍टर  - गेल्या वर्षीचे पेरणी क्षेत्र 
35 लाख हेक्‍टर - यंदाचे पेरणी क्षेत्र 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sowing has reduced in maharashtra

टॅग्स