१०० एकरावरील सोयाबीन उगवलेच नाही! सोलापूर जिल्ह्यातील बार्शीतील १२ शेतकऱ्यांच्या ‘कृषी’कडे तक्रारी; पावसाअभावी ८ तालुक्यांत पेरणी खोळंबली, १५ दिवसांनंतर दुबार पेरणीचे संकट

सोलापूर जिल्ह्यात जून महिन्यात ३५ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. मॉन्सूनच्या सुरवातीला बार्शी तालुक्यात थोडा पाऊस झाला होता, त्यावेळी शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरले. मात्र, १२ शेतकऱ्यांचे सुमारे १०० एकरावरील सोयाबीन उगवलेच नाही. त्यांनी आता कृषी विभागाकडे धाव घेतली असून त्याचे पंचनामे सुरू आहेत.
farmer waiting for rain
farmer waiting for rainesakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात जून महिन्यात ३५ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. मॉन्सूनच्या सुरवातीला बार्शी तालुक्यात थोडा पाऊस झाला होता, त्यावेळी शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरले. मात्र, १२ शेतकऱ्यांचे सुमारे १०० एकरावरील सोयाबीन उगवलेच नाही. त्यांनी आता कृषी विभागाकडे धाव घेतली असून त्याचे पंचनामे सुरू आहेत.

सोलापूर जिल्ह्यात जुलैपर्यंत १९८ मिलिमीटर सरासरी पाऊस अपेक्षित आहे, पण सध्या सरासरीच्या ५० टक्केसुद्धा पाऊस झाला नाही. मात्र, जूनमध्ये सुरवातीच्या काही नक्षत्रात पाऊस होईल, या आशेने शेतकऱ्यांनी सोयाबीन, उडीद, मका अशा पिकांची पेरणी केली. जिल्ह्यात पाऊस झालेला नसल्याने त्या पिकांनी आता माना टाकल्या आहेत. त्यातच सोयाबीनचे बियाणे बनावट निघाल्याच्या तक्रारी बार्शीतील शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे केल्या आहेत. त्या १२ शेतकऱ्यांनी आम्ही पेरलेले बियाणे उगवलेच नाही, असे म्हटले आहे.

तक्रार निवारण समितीत ‘महाबीज’चा प्रतिनिधी, पंचायत समितीची कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, कंपनीचा प्रतिनिधी, राहुरी कृषी विद्यापीठ किंवा कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी असतात. समितीच्या पंचनाम्यातून जमिनीतील ओलावा कमी असल्याने की बियाणेच बनावट होते, ही बाब समोर येणार आहे.

पंचनामा अहवालानंतर पुढील कार्यवाही

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील १२ शेतकऱ्यांनी त्यांनी पेरलेले सोयाबीन उगवले नाही, अशा तक्रारी केल्या आहेत. आता तक्रार निवारणी समितीच्या माध्यमातून त्याचे पंचनामे सुरू आहेत. त्या अहवालानंतर शेतकऱ्यांना ग्राहक मंचाकडे तक्रारी कराव्या लागतील.

- शुक्राचार्य भोसले, कृषी अधीक्षक, सोलापूर

१५ दिवसांनंतर दुबार पेरणीचे संकट

सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यात सर्वात कमी १० टक्केच क्षेत्रावर पेरणी झाली आहे. याशिवाय अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा, मोहोळ, माढा, सांगोला, पंढरपूर या तालुक्यात २० टक्क्यांपेक्षा कमी क्षेत्रावर पेरणी झाली आहे. बार्शीत सर्वाधिक ५० टक्के, करमाळा व माळशिरस तालुक्यात सरासरी ४० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात तीन लाख ३७ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी होते, पण यावर्षी १४ जुलैपर्यंत ९७ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. मात्र, पाऊस नसल्याने पेरलेल्या पिकांनी माना टाकल्या असून पुढील १५ दिवसांत पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट ओढावू शकते, अशी भीती कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com