चंद्रभागेच्या तटी । धन्य पंढरी गोमटी।

राजाराम ल. कानतोडे, सोलापूर
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीत पंढरपूचे महत्व अनन्यसाधारण आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिर आणि पंढरपूरविषयी.....

आधी रचिली पंढरी । मग वैकुंठ नगरी ।
जेव्हा नव्हते चराचरा । तेव्हा होते पंढरपूर ।
जेव्हा नव्हती गोदागंगा । तेव्हा होती चंद्रभागा ।
चंद्रभागेच्या तटी । धन्य पंढरी गोमटी ।

संत नामदेवांनी वर्णन केलेल्या या गोमट्या पंढरीचे वेड केवळ मराठी माणसालाच आहे, असे नाही तर साता समुद्रापल्याड असणारा फ्रेंच अभ्यासक फादर डर्ली सुद्धा पांडुरंगाच्या दर्शनाने भारावून गेला होता. दक्षिणेची काशी समजल्या जाणाऱ्या पंढरी नगरीचा आणि पांडुरंगाच्या मंदिराचा त्याने अभ्यास केला. हे मंदिर पाचव्या शतकातील असावे, असे त्यांनी लिहून ठेवले आहे.

भागवत धर्माचे आद्यपीठ मानले जाणाऱ्या या तीर्थ क्षेत्राच्या कालनिश्‍चितीचे पुरातत्व आणि इतिहास संशोधकांनी प्रयत्न केले आहेत. काही संशोधक हे मंदिर श्रीमतदभागवत व महाभारतपूर्व कालीन आहे, असे मानतात. प्रसिद्ध पुरातत्व संशोधक डॉ. सॉंकलिया यांनी विठ्ठल मंदिरातील प्राचीन पाषाण सुमारे पाच हजार वर्षापूर्वीचा असावा, असे मत मांडले आहे. स्कंध पुराणांतर्गत "पंढरी महात्मय' नावाच्या प्राचीन ग्रंथातही पंढरपूरचे वर्णन आले आहे. आनंद रामायणात रामाने सीता शोधासाठी लंकेला जाताना या तीर्थक्षेत्राला भेट दिल्याचा प्रसंग आला आहे. पद्यपुराणातही या क्षेत्राचा उल्लेख आढळतो. विठ्ठल मंदिरात सापडलेल्या शिलालेखांचे इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी ऐतिहासिक दृष्टीकोनातून वाचन केले. या शिलालेखाचा काल शके 1195 श्रीमुखनाम संवत्सर असा आहे.

पंढरीची ख्याती संत ज्ञानेश्‍वर आणि संत नामदेव यांच्या काळात वाढली. विठ्ठलभक्तीचा प्रसार संतांनी केला. पंढरीची वारी सुरू केली. भक्तीसंप्रदाय वाढला. महाराष्ट्रवर बाराव्या व तेराव्या शतकात परकीय हल्ले झाले. देवगिरीचे राज्य संपले. औरंगाजेबाने महाराष्ट्रावर स्वारी केली त्यावेळी त्याने विठ्ठलमूर्ती फोडून टाकण्याचा प्रयत्न केला, असे सांगतात. त्यावेळी विठूच्या भक्तांनी मुर्ती जवळच असणाऱ्या गादेगावातील पाटलाच्या विहिरीत लपविली होती, असे सांगितले जाते. विठ्ठलाची मूर्ती माढ्याला हलविल्याची नोंदही वि. का. राजवाडे यांनी ग्रंथमालेत केली आहे.
सावळ्या विठ्ठलाची उपासना भक्त विविध नावांनी करतात. पंढरीनाथ, पांडुरंग, पंढरीराया, विठाई, विठोबा, विठुमाऊली विठ्ठल गुरुराव आदी नावे भक्तांनी त्याला दिली आहेत. कानडी शिलालेखातही विठ्ठलाचे नाव आढळून आले आहे. पंढरपुरातील दगडी विठेवर उभी असलेली विठ्ठलाचे मूर्ती साडेतीनफूट उंच आहे. विठेखाली उलटे कमळ आहे. विठ्ठलाच्या मूर्तीच्या पायाला 1973 पर्यंत मिठी घालून दर्शन घेता येत होते. आता केवळ चरणावर मस्तक ठेवून दर्शन घेता येते.

विठ्ठलाचे आजचे दिसणारे मंदिर यादव काळात लहान होते. तेराव्या शतकानंतर विठ्ठल भक्तीच्या प्रसाराबरोबर मंदिराचा विस्तार होत गेला. पुराव्यांअभावी या मंदिराच्या रचनेच्या निश्‍चित कालखंड संशोधकांना सांगता येत नाही. हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी चारही दिशांना दरवाजे आहेत. पूर्व बाजूस तीन दरवाजे आहेत. पहिला जो मुख्य दरवाजा आहे, त्याला महाद्वार अथवा नामदेवाचा दरवाजा असे म्हणतात. विठ्ठलाचा लाडका भक्त संत नामदेव याने आपल्या 14 कुटुंबियांसमवेत 1350 मध्ये येथेच समाधी घेतली. या पायरीच्या पुढेच संत चोखामेळा यांची समाधी आहे. मंदिराच्या पश्‍चिम बाजूस एकाच मुख्य दरवाजा आहे. याला पश्‍चिमद्वार असे म्हणतात. मंदिराच्या उत्तर बाजूस तीन दरवाजे आहेत. मंदिरास एकूण नऊ दरवाजे आहेत.

गर्भागारातील विठ्ठलमूर्तीचे व्यासपीठ तीन फूट उंचीचे आहे. चार खांबावर आधारलेल्या या व्यासपीठास चांदीचे नक्षीदार आवरण आहे. विठ्ठलाची सावळी मूर्ती साडेतीन फूट उंचीची असून तिथे हात कटीवर आहेत. मूर्तीच्या मस्तकाव शिवलिंग आहे. मूर्तीची झीज होऊ नये म्हणून शासनाने वज्रलेप केला आहे. गर्भागारावरील 48 फूट उंचीचे शिखर साधे असले तरी आकर्षक आहे. शिखरावर आठ गोपुरे आहेत.
विठ्ठलाचे दर्शन घेऊन दक्षिणेकडील दरवाजाने बाहेर पडताच अंबाबाई, उजव्या सोंडेचा गणपती आहे. पुढे संत कान्होपात्राचे समाधी स्थान आहे. कान्होपात्रा नायिक होती. तिने विठ्ठलभक्ती केली व विठ्ठलाने तिला आपलेसे केले, अशी आख्यायिका आहे. श्री रुक्‍मिणी मंदिर गाभाऱ्यात चौथऱ्यावर रुक्‍मिणी मातेची मूर्ती आहे.

पंढरपुरात वर्षभर जरी गर्दी असली तरी चैत्र, आषाढी, कार्तिकी आणि माघी या प्रमुख यात्रा आहेत. त्यावेळी महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून वारकरी येतात. पंढरपूरला रेल्वेने यायचे म्हटंले तर कुर्डुवाडी अथवा मिरज या जंक्‍शन स्थानकावरून येता येते. महत्त्वाच्या धार्मिक स्थानांना व शहरांना जाण्यासाठी येथून खासगी बससेवा व वाहनेही मिळू शकतात. यात्रेच्या वेळी अहोरात्र एसटीची सेवा सुरू असते. पंढरपुरात निवासासाठी अनेक लॉज आहेत. भाविकांमध्ये निवासासाठी या ठिकाणाचे अनेक मठ प्रिय आहेत. पंढरपुरात वारकरी मठात अथवा धर्मशाळेत बहुसंख्येने निवास करतात. सावळ्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी विविध भागातून इथे येतात, अन्‌ समाधानी होऊन परतात.

Web Title: spiritual history of kartiki ekadashi, viththal