
SSC Board Exam : "कमी मुलं जन्माला घालतात"; बोर्डाच्या अध्यक्षांनी दिली विद्यार्थी कमी होण्याची कारणं
दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये यंदा मोठी घट झाल्याची माहिती बोर्डाने दिली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ६१००० विद्यार्थी कमी झाल्याचे बोर्डाने सांगितलं आहे. राज्यात यंदा एकूण १५,७७,२५६ विद्यार्थी १०वी ची परीक्षा देणार आहेत.
इतर बोर्डाच्या शाळेची संख्या वाढली असल्याने तसेच लोकसंख्या वाढीमुळे पालकांमध्ये एकच मूल जन्माला घालण्याची भूमिका असल्याने विद्यार्थ्यांची संख्या घटली, असा दावा बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.
राज्यातील १०वी ची परीक्षा २ मार्च पासून २५ पर्यंत ९ विभागीय मंडळात पार पडेल. एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येत ८,४४,११६ मुलं तर ७,३३,०६७ मुलींचा समावेश आहे. राज्यातील २३,००० माध्यमिक शाळांमध्ये १०वीच्या परीक्षा होणार आहेत.
सोशल मीडियावर होणाऱ्या व्हायरल प्रश्न पत्रिका तसेच व्हायरल होणाऱ्या सूचना यांना बळी पडू नये, अशी सूचना बोर्डाकडून विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे.
प्रश्न पत्रिका केंद्र संचालक यांच्याकडे पाठवताना जी पी एस तसेच चित्रीकरण होणार असल्याचंही बोर्डाकडून सांगण्यात आलं. तर विद्यार्थ्यांना पेपर लिहिताना शेवटचे १० मिनिटं वाढवून देणार असल्याचंही बोर्डाने सांगितलं.
गेल्या पाच वर्षातली विद्यार्थ्यांची संख्या
मार्च १९ - १६ लाख ९९ हजार ४६५
मार्च २० - १७ लाख ६५ हजार ८२९
मार्च २१ - १६ लाख ५८ हजार ६१४
मार्च २२ - १६ लाख ३८ हजार ९६४
मार्च २३ - १५ लाख ७७ हजार २५५