esakal | एसटीला गणपती पावला! जादा गाड्यांमुळे पावणे आठ कोटींचे उत्पन्न | ST Bus Corporation
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

एसटीला गणपती पावला! जादा गाड्यांमुळे पावणे आठ कोटींचे उत्पन्न

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त (Ganpati Festival) कोकणात सोडलेल्या जादा गाड्यांच्या वाहतुकीतून एसटी महामंडळाला (ST bus corporation) तब्बल सात कोटी ८२ लाख ३२ हजार रुपयांचे उत्पन्न (income) मिळाले. गणेशोत्सवात ५ ते २० सप्टेंबरदरम्यान ‘गणपती विशेष’ ३२९० बसेसद्वारे सुमारे तीन लाख ९६ हजार प्रवाशांनी (commuters) एसटीतून प्रवास केला, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब (Anil parab) यांनी दिली.

हेही वाचा: वसई-विरार शहरात गळती काही थांबेना; हजारो लिटर पाणी वाया

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी सुरक्षित प्रवास म्हणून एसटीवर दाखविलेल्या प्रेमामुळेच कोट्यवधीचे उत्पन्न मिळाले, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, गणेशोत्सवात प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची सेवा प्रदान करणाऱ्या चालक-वाहकांबरोबरच त्यांना साथ देणारे यांत्रिकी कर्मचारी, पर्यवेक्षक व अधिकारी यांचेही ॲड. परब यांनी कौतुक केले.

गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. ‍किंबहुना एसटी, गणपती व कोकणचा चाकरमानी यांचे एक अतूट नाते आहे. त्यामुळे दर वर्षी गणपती उत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. यंदा एसटी महामंडळाने चाकरमान्यांसाठी २२०० गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला होता; परंतु सुरक्षित प्रवास म्हणून चाकरमान्यांनी एसटीवर विश्वास दाखविल्याने अवघ्या काही दिवसांत जादा गणपती विशेष गाड्या फूल झाल्या होत्या. चाकरमान्यांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे एसटीला गणेशोत्सवादरम्यान सुमारे ३२९० गाड्या सोडाव्या लागल्या. ५ ते २० सप्टेंबरदरम्यान तब्बल ३२९० बसेसद्वारे ८२९९ फेऱ्या पार पडल्या. यामधून एसटीला सात कोटी ८२ लाख ३२ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले, असे ॲड. परब यांनी सांगितले.

"यंदा गणेशोत्सवादरम्यान कोणतेही विघ्न न येता जादा वाहतूक सुरळीत पार पडली. एसटी महामंडळाच्या नियोजनबद्ध सेवेमुळे भाविकांना मुंबई, ठाणे, पालघर व आसपासच्या परिसरातून थेट गावापर्यंत सुरक्षित पोहचविण्याचे अभिवचन एसटीने पूर्ण केले. भविष्यातही चाकरमान्यांच्या मदतीला एसटी नेहमीच तत्पर असेल."
- ॲड. अनिल परब, परिवहन मंत्र.

loading image
go to top