esakal | बळीराजासाठी लालपरी जाणार बांधावर ! दुसऱ्या टप्प्यात आंतरराज्य सेवा
sakal

बोलून बातमी शोधा

0st_bus_web_2.jpg

दुसऱ्या टप्प्यात आंतरराज्य सेवा
कोरोनामुळे राज्यात लॉकडाउन असल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची प्रवासी सेवा वाहतूक पूर्णपणे बंदच होती. या काळात महामंडळाला दररोज 22 कोटी रुपयांच्या उत्पन्नाचा फटका सोसावा लागला. आता वाहतूक सुरु होऊनही कोरोनाच्या भितीने नागरिक घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे उत्पन्नाच्या तुलनेत खर्चच अधिक, अशी स्थिती महामंडळाची झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर आता शेतकऱ्यांसह उद्योजकांचा माल महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात पोहचविण्याची सोय महामंडळाने उपलब्ध करुन दिली आहे. या नव्या उपक्रमाचा प्रतिसाद पाहून पुढील टप्प्यात आंतरराज्य सेवा सुरु केली जाईल, अशी माहिती परिवहन मंत्री ऍड. परब यांनी "सकाळ'ला दिली.

बळीराजासाठी लालपरी जाणार बांधावर ! दुसऱ्या टप्प्यात आंतरराज्य सेवा

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : एक लाखांहून अधिक कर्मचारी, साडेसतरा हजार बसचा पसारा सांभाळणारी लालपरी कोरोनाच्या संकटामुळे खासगी वाहतुकीशी स्पर्धा करण्यात मागे पडली आहे. त्यामुळे परिवहन मंत्री ऍड. अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली किसान रेल्वेच्या धर्तीवर राज्य परिवहन महामंडळाने "मालपरी' सुरु केली आहे. कडधान्यासह सर्वच शेतमाल वाहतुकीसाठी लालपरी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाठविली जाणार आहे. सद्यस्थितीत 800 प्रवासी गाड्यांचे रुपांतर माल वाहतूक गाड्यांमध्ये झाले आहे. आणखी एक हजार गाड्यांचे रुपांतर मालवाहू गाड्यांमध्ये करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे.

गावोगावी वाढलेली वैयक्‍तिक खासगी वाहने आणि तालुक्‍याच्या ठिकाणी वाढलेल्या खासगी प्रवासी वाहतुकीमुळे लालपरी अडचणीत सापडली. त्यामुळे अडचणीतील परिवहन महामंडळाला सावरण्यासाठी सरकारने दोन हजार कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी परिवहन मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. मात्र, कोरोना काळात राज्याची आर्थिक स्थिती बिकट झाल्याने महामंडळाची मागणी पूर्ण झाली नाही. दुसरीकडे प्रवासी वाहतूक सुरु झाल्यानंतर अपेक्षित असलेला प्रवाशांचा प्रतिसादही मिळाला नाही. त्यामुळे उत्पन्नाच्या तुलनेत खर्चच अधिक होऊ लागल्याने महामंडळाने मालवाहतूक योजना सुरु केली. आरटीओच्या माध्यमातून प्रवासी वाहतुकीच्या गाड्यांचे मालवाहतुकीत रुपांतर केले जात आहे. लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, नांदेड, बीड, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, नगर या जिल्ह्यांमधील बळीराजाचा शेतमाल मुंबई, पुण्यासह अन्य शहरांमध्ये पोच करण्याची सोय झाली आहे. बळीराजाचा शेतमाल आता शेतातून उचलला जाणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात आंतरराज्य सेवा
कोरोनामुळे राज्यात लॉकडाउन असल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची प्रवासी सेवा वाहतूक पूर्णपणे बंदच होती. या काळात महामंडळाला दररोज 22 कोटी रुपयांच्या उत्पन्नाचा फटका सोसावा लागला. आता वाहतूक सुरु होऊनही कोरोनाच्या भितीने नागरिक घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे उत्पन्नाच्या तुलनेत खर्चच अधिक, अशी स्थिती महामंडळाची झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर आता शेतकऱ्यांसह उद्योजकांचा माल महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात पोहचविण्याची सोय महामंडळाने उपलब्ध करुन दिली आहे. या नव्या उपक्रमाचा प्रतिसाद पाहून पुढील टप्प्यात आंतरराज्य सेवा सुरु केली जाईल, अशी माहिती परिवहन मंत्री ऍड. परब यांनी "सकाळ'ला दिली.

एसटी महामंडळाची स्थिती

  • एकूण एसटी
  • 17,100
  • सध्या मार्गावरील प्रवासी बस
  • 6,500
  • माल वाहतूक बस
  • 800
  • महामंडळाचे दररोजचे उत्पन्न
  • 3.70 कोटी
  • वाढीव मालवाहतूक बस
  • 1,000