ST Workers Strike | पगारवाढीचे गाजर नको; संपकरी विलिनीकरणावर ठाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ST Bus

ST Workers Strike | पगारवाढीचे गाजर नको; संपकरी विलिनीकरणावर ठाम

पुणे : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, हीच आमची मुख्य मागणी आहे. त्यामुळे राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढीचे गाजर दाखवू नये, सरकारच्या कोणत्याही भूलथापांना बळी न पडता संप सुरुच राहील, अशी भूमिका पुण्यातील स्वारगेट आणि वाकडेवाडी (शिवाजीनगर) येथील संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी बुधवारी (ता. २४) स्पष्ट केली.

‘‘ज्यांचे निलंबन करण्यात आले, त्या कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेतली. तसेच त्यांच्या पगारामध्ये घसघशीत वाढ करण्यात आली आहे,’’ अशी घोषणा बुधवारी परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली. तसेच गुरुवार (ता.२५) पासून कामावर हजार होण्याचे आवाहन एसटी कर्मचाऱ्यांना परब यांनी केले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा संप मिटेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. कर्मचाऱ्यांनी या घोषणेकडे केवळ सरकारने पुढे टाकलेले एक सकारात्मक पाऊल म्हणून पहिले असून त्याचे स्वागत केले आहे. मात्र या घोषणेला बळी पडणार नसून आमची मुख्य मागणी एसटी महामंडळाचे विलीनीकरण करणे हीच आहे, पगारवाढ करणे आणि निलंबनाची कारवाई मागे घेणे म्हणजे एसटी संपात फूट पाडण्याचा डाव आहे, घोषणा करायचीच असेल तर विलीनीकरणाची करा, तरच संप मिटेल, असे एसटी कर्मचाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा: पुणे-मुंबई रेल्वेसेवा १ डिसेंबरपासून; अशा धावणार गाड्या

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी शहरासह जिल्ह्यात गेल्या १७ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. शहरातील स्वारगेट, पुणे स्टेशन, वाकडेवाडी (शिवाजी नगर) आदी आगारांसह जिल्ह्यातील १३ डेपोतील कर्मचारी सोमवार (ता. ८) पासून पुकारलेल्या संपात एसटी कामगार सहभागी झाले आहेत.

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांची एकजूट आहे. कोणत्याही कर्मचाऱ्याला पगारवाढ नको आहे. विलीनीकरण हीच मुख्य मागणी आहे. निलंबन करून आमच्या जिवाशी सरकार खेळले आहे. परिवहन मंत्र्यांनी उगाच तोंडाला पाने पुसू नयेत.

-मनोज कोंढरे, एसटी कर्मचारी.

एसी कामगारांनी आतापर्यंत चार ते पाचवेळा संप पुकारला होता. त्यावेळी एकदाही पगारवाढ दिली नाही. आता सर्व कर्मचारी मागणीवर ठाम आहेत, म्हणून सरकार पगारवाढीचे गाजर दाखवत आहे. आम्हाला काहीच नको. फक्त एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण हवे आहे.

- संजय मुंढे, एसटी कर्मचारी.

loading image
go to top