कोरोनामुळे रोडावलेली प्रवासीसंख्या वाढण्यासाठी "एसटी'ने कसली कंबर ! 1 ते 15 डिसेंबर "विशेष स्वच्छता अभियान'

st-bus
st-bus

अक्कलकोट (सोलापूर) : सद्य:स्थितीत कोव्हिड-19 विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बसस्थानक, आगार व राज्य परिवहन बसची नियमितपणे स्वच्छता तसेच निर्जंतुकीकरण करणे अत्यंत आवश्‍यक आहे. यासाठी राज्य परिवहन महामंडळाने खास परिपत्रक काढून विशेष मोहीम सुरू केली आहे, ज्याद्वारे एसटी आता खास सोयीसुविधा देऊन प्रवासी सेवा अधिक चांगले होईल यासाठी दक्षता घेतली जात आहे. तथापि याबाबतीत विभागांकडून आवश्‍यक दक्षता घेतली जात नाही. त्यामुळे प्रवासी वर्गाकडून नाराजी व्यक्त करण्यात येते. या अनुषंगाने बसस्थानक तसेच आगार व त्याचा परिसर स्वच्छतेबाबत विशेष दक्षता घेण्याच्या उद्देशाने 1 ते 15 डिसेंबर या कालावधीत "स्वच्छता अभियान - 2020' अशी खास मोहीम राबविण्यात येणार आहे. 

राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवाशांसाठी बसस्थानकांवर नियंत्रण कक्ष, हिरकणी कक्ष, प्रवासी प्रतीक्षालये, प्रवासी प्रसाधनगृहे व विविध वाणिज्य आस्थापना आदी सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. बसस्थानके, आगार व गाड्या स्वच्छ असणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. महामंडळाची जनमानसातील प्रतिमा उंचावण्याच्या दृष्टिकोनातून स्वच्छ बसस्थानके, स्वच्छ पिण्याचे पाणी, प्रवासी प्रसाधनगृहे, उपहारगृहे आदी स्वच्छ असणे नितांत गरजेचे आहे. यासाठी "स्वच्छता अभियान - 2020' खास मोहीम राबविण्याबाबत सूचना देण्यात येत आहेत. यासाठी वेगवेगळे विभाग करून त्याची कामे करून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आगरांकडून प्रयत्न केले जाणार आहेत. 

बसस्थानक व प्रतीक्षालय स्वछतेबाबत 

  • प्रवासी प्रतीक्षालयाची प्रत्येक दोन तासांनी स्वच्छता व साफसफाई करण्यात यावी 
  • प्रवासी प्रतीक्षालयाचे दररोज सॅनिटायझेशन करण्यात यावे, दिवसातून किमान दोन वेळा बसस्थानकावर पोचा मारण्यात यावा 
  • आठवड्यातून किमान एक दिवस पूर्ण प्रतीक्षालय व बसस्थानक लादीसह वॉशिंग पावडरच्या सहाय्याने धुवून घ्यावे 
  • प्रवासी आसनांची तपासणी करून काही दुरुस्ती असल्यास तत्काळ पूर्तता करण्यात यावी 
  • बसस्थानकावरील आसन व्यवस्था सुस्थितीत असेल याची सतत दक्षता घ्यावी 
  • बसस्थानकावरील दिवे व पंखे सुस्थितीत स्वच्छ असल्याची खात्री करण्यात यावी. नसल्यास त्वरित दुरुस्ती करण्यात यावी 
  • महामंडळाची प्रतिष्ठित सेवा असलेल्या शिवनेरी वाहतुकीसाठी संबंधित स्थानकांवर या सेवेच्या प्रवाशांकरिता वेगळे प्रतीक्षालय उपलब्ध केले असल्यास त्या ठिकाणच्या स्वच्छतेबाबत संबंधित स्थानक प्रमुख व आगार व्यवस्थापकांनी नियमित लक्ष ठेवावे 
  • बसस्थानकावर पुरेशा प्रमाणात डस्टबिन (कचरापेटी) उपलब्ध करून देण्यात याव्यात 
  • डस्टबिनमधील जमा झालेला कचरा नियमितपणे काढून घेण्यात यावा 

वाहनतळ असल्यास त्याची घ्यावयाची काळजी 

  • वाहनतळाचा परिसर दररोज किमान दोन वेळा स्वच्छ करण्यात यावा 
  • वाहनतळावर खासगी वाहने विनाकारण उभी राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी 
  • ग्रामीण भागामध्ये राज्य परिवहन वाहन तळाच्या भागात परिसरातील व्यक्ती नैसर्गिक विधीसाठी वापर करतात, असा प्रकार निर्दशनास आल्यास तत्काळ अटकाव करण्यात यावा 
  • वाहनतळ तसेच बसस्थानकावर पडलेल्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, कागद, इतर कचरा आदी तत्काळ उचलावा 

पिण्याच्या पाण्याच्या टाकीची घ्यावयाची काळजी 

  • प्रवाशांकरिता पिण्याचे पाणी स्वच्छ व शुद्ध उपलब्ध करून द्यावे 
  • पाण्याच्या टाकीच्या नळांची गळती असल्यास तातडीने दुरुस्ती करावी 
  • नळांच्या तोट्या सुस्थितीत असल्याची खात्री करावी 
  • पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळचा परिसर नेहमी स्वच्छ राहील याची दक्षता घ्यावी 
  • बसस्थानकावरील पिण्याच्या पाण्याची टाकी निर्धारित कालावधीत स्वच्छ करावी 
  • टाकी स्वच्छ केल्याची तारीख ठळकपणे प्रसिद्ध करावी 
  • मार्गावरील प्रत्येक बस स्वच्छ व सुस्थितीत राहील याची नेहमी दक्षता घ्यावी 

बसस्थानकावरील फलाट स्वछतेबाबत 

  • बसस्थानकावरील फलाटांची नियमितपणे स्वच्छता करावी 
  • फलाटांवर पुरेशा प्रमाणात डस्टबिन ठेवाव्यात 
  • बसस्थानकावरून सुटणाऱ्या सर्व बस नियोजत फलाटांवरूनच सोडाव्यात 
  • प्रत्येक फलाटासमोर त्या फलाटावरून सुटणाऱ्या फेऱ्यांसंबंधित गावांची नावे ठळकपणे प्रदर्शित करावीत 
  • "इश्‍यू अँड स्टॉर्ट' पद्धतीचा अवलंब करूनच बस मार्गस्थ कराव्यात 

प्रसाधनगृह स्वच्छतेची घ्यावयाची काळजी 

  • बसस्थानक व आगारातील प्रसाधनगृहांचे रंगकाम, दुरुस्ती, कडीकोयंडे, दरवाजे, फरशी, भिंती, जळमटे काढणे, ड्रेनेज, पंखे, लाईटस्‌ व फिनेलचा वापर आदी बाबी सुस्थितीत करण्यासाठी शौचालय व्यवस्थापकाकडे परिपूर्तता करण्यासाठी पाठपुरावा करावा 
  • प्रसाधनगृहाचे व्यवस्थापन महामंडळाकडे असेल तर विभागीय अभियंता यांच्याकडून दुरुस्ती व पूर्तता करून घ्यावी 
  • केअर टेकर यांची नियुक्ती करावी 
  • प्रसाधनगृहातील भांडी सुस्थितीत आहे काय, खेळती हवा आहे काय, पुरेसा पाणीपुरवठा आहे काय, भोवतालची जागा स्वच्छ आहे किंवा कसे याबाबत तपासणी करून पूर्तता करून घ्यावी 
  • प्रसाधनगृहांमध्ये दुर्गंधी होणार नाही याबाबत नेहमी दक्षता घ्यावी 
  • प्रसाधनगृह वापराचे दर ठळक अक्षरात फलक प्रदर्शित करण्यात यावा 

चालक व वाहक विश्रांतीगृहाबाबत घ्यावयाची काळजी 

  • आगारातील चालक व वाहक विश्रांतीगृहाची नियमितपणे स्वच्छता करावी 
  • चालक व वाहक विश्रांतीगृहातील प्रसाधनगृहांची नियमितपणे स्वच्छता करावी 
  • विश्रांतीगृहात पिण्याचे पाणी स्वच्छ व शुद्ध उपलब्ध करून द्यावे 
  • विश्रांतीगृहातील विद्युत दिवे, पंखे सुस्थितीत असल्याबाबत तपासणी करून आवश्‍यक ती दुरुस्ती तातडीने करून घ्यावी 
  • विश्रांतीगृहाचे वेळोवेळी सॅनिटायझेशन करावे 
  • बसस्थानकावरील आरक्षण केंद्र हे नेहमी कार्यरत व स्वच्छ राहील याची दक्षता घ्यावी 
  • प्रवाशांच्या सोयीसाठी क्‍युरेलिंगची व्यवस्था करावी 

उपहारगृहांच्या स्वच्छतेबाबत घ्यावयाची काळजी 

  • बसस्थानकावरील उपहारगृहाची नियमितपणे स्वच्छता व सॅनिटायझेशन करण्याबाबत संबंधित उपहारगृह चालकास सूचना द्याव्यात 
  • उपहारगृहात पुरेसा पाणीसाठा आहे किंवा कसे, पुरेसा प्रकाश, खेळती हवा व विजेचे दिवे आहेत किंवा कसे याबाबत वेळोवेळी तपासणी करावी 
  • ड्रेनेज व गटार स्वच्छ व पुरेशी आहेत काय, ती तुंबलेली आहेत काय, उपहारगृहाच्या स्वयंपाकगृहाची स्वच्छता व बेसिनची स्वच्छता आदींबाबत तपासणी करावी काही त्रुटी असल्यास पूर्तता करण्याबाबत परवानाधारकास सूचना द्याव्यात. तसेच स्वच्छतेबाबत दक्षता न घेतल्यास उपहारगृह परवानाधारकांवर दंडात्मक कारवाई करावी 

बसस्थानक व आगार परिसर स्वछतेबाबत 

  • बसस्थानक व आगार व त्यांचा परिसर अधिकाधिक स्वच्छ होण्याच्या दृष्टिकोनातून कचराकुंडी, ड्रेनेजलाइन, वापरात नसलेल्या जागांबाबत जागरूक राहून योग्य ती दुरुस्ती, साफसफाई व भरपूर प्रकाश योजना करावी 
  • परिसरातील झुडपे काढून घ्यावीत, जेणेकरून बसस्थानकावर अस्वच्छता राहणार नाही 
  • बसस्थानकाचा सर्व परिसर स्वच्छ असल्याचे प्रवाशांना प्रथमदर्शनीच दिसेल याची दक्षता घ्यावी 
  • बसस्थानक व आगार, कार्यालये, कोपरे, पॅसेज, प्लॅटफॉर्म हे स्वच्छ धुवून घेऊन स्वच्छता अधिक परिणामकारक दिसण्याकरिता छोट्या झाडांच्या कुंड्या जागोजागी ठेवून बसस्थानक सुशोभित करावे 
  • बसस्थानकावरील व आगारातील विनावापर, रिक्त जागांवर जास्तीत जास्त वृक्षारोपण करून सुशोभिकरण करण्यात यावे 

यावरून असे दिसते, की महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने आता कोरोना काळात कमी झालेली प्रवासी संख्या वाढविण्याच्या दृष्टीने व उत्पन्न वाढीसाठी आता कंबर कसली असून, त्याची अंमलबजावणी जर प्रत्येक आगार स्तरावर तंतोतंत झाल्यास पुन्हा गतवैभव येण्यास वेळ लागणार नाही. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com