esakal | विद्यापीठात अहिल्यादेवींचा पुतळा शासकीय निधीतून... आमदार रोहित पवारांच्या मागणीची मंत्री सामंत यांनी घेतली दखल 
sakal

बोलून बातमी शोधा

rohit pawar

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा भव्य पुतळा त्यांच्याच नावाने असलेल्या सोलापूर विद्यापीठाच्या प्रांगणात उभा राहतोय, ही समाधान वाटणारी गोष्ट आहे. अहिल्यादेवी यांचा पुतळा सर्वांनाच प्रेरणा देईल. त्यांनी समाजाला जो विचार दिला आहे त्याचे आपल्याला सतत स्मरण होईल. विद्यापीठात शिकणाऱ्या भावी पिढीला आपल्या ध्येय आणि सामाजिक बांधिलकीची आठवण होईल. त्यांनी केलेल्या पराक्रमाचा सगळ्यांना अभिमान वाटत राहील. 
- रोहित पवार, आमदार 

विद्यापीठात अहिल्यादेवींचा पुतळा शासकीय निधीतून... आमदार रोहित पवारांच्या मागणीची मंत्री सामंत यांनी घेतली दखल 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या प्रांगणात अहिल्यादेवी होळकर यांचा भव्य पुतळा उभा करण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली होती. राज्यातील इतर विद्यापीठांत महापुरुषांचे पुतळे शासकीय निधीतून झाले आहेत मग अहिल्यादेवी यांच्या पुतळ्यासाठी लोकवर्गणी कशाला, असा सवाल उपस्थित करत अहिल्यादेवींचा पुतळा देखील शासनाच्या निधीतून उभा करावा, अशी मागणी आमदार पवार यांनी केली होती. या मागणीची दखल उच्च शिक्षणमंत्री सामंत यांनी घेतली आहे. 

मंत्री सामंत यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक घेतली. या बैठकीला कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, आमदार रोहित पवार, अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज अक्षय शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख, उपाध्यक्ष सूरज चव्हाण सहभागी झाले होते. राज्य सरकारच्या वतीने पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा आजच्या बैठकीत करण्यात आली.

राजमाता अहिल्याबाई होळकर विद्यापीठात लोकवर्गणी काढून पुतळा उभा करण्याबाबत कुलगुरू मृणालिनी फडणीस यांनी समिती स्थापन केली होती. मात्र महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांत महापुरुषांचे पुतळे शासकीय निधीतून झाले आहेत, मग अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा शासकीय निधीतून व्हावा, अशी मागणी होत होती. विद्यापीठात अहिल्यादेवी होळकर अध्यासन उभा करावे, अध्यासनाचे काम लवकरच मार्गी लावण्याबाबतही मंत्री ग्वाही दिली.