१० दिवस उत्तरप्रदेशात मुक्काम केला, पण पोलिसांनी चोरट्यांना शोधलेच! सोलापुरातील ‘या’ साखर कारखान्यातून नेली होती १७.५० लाखांची साखर, वाचा...

अक्कलकोट तालुक्यातील तडवळ येथील ओंकार शुगर फॅक्टरीतून २३ फेब्रुवारी रोजी साडेसतरा लाखांची साखर पळवून नेणाऱ्या चौघांना अक्कलकोट दक्षिण पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले. १० दिवसांच्या मेहनतीनंंतर पोलिसांच्या पथकाने चौघांनाही कानपूरमधून ताब्यात घेतले.
solapur crime

solapur crime

solapur

Updated on

सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील तडवळ येथील ओंकार शुगर फॅक्टरीतून २३ फेब्रुवारी रोजी साडेसतरा लाखांची साखर पळवून नेणाऱ्या चौघांना अक्कलकोट दक्षिण पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले. १० दिवसांच्या मेहनतीनंंतर पोलिसांच्या पथकाने चौघांनाही कानपूरमधून ताब्यात घेतले. संशयित आरोपी उत्तरप्रदेशातील बाराबंकी परिसरातील सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ट्रान्सपोर्ट व्यावसायिक हडमानाराम भाखरराम बिश्नोई (वय ४०, रा. होसपेट, जि. विजयनगर, कर्नाटक) यांनी अक्कलकोट दक्षिण पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यावरून अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. संशयित आरोपी झांशीवरून कोल्हापूरला गहू घेऊन आला होता. त्यासाठी गाडीची सर्व कागदपत्रे खरी दाखविली. पण, जाताना मोठा हात मारायचा म्हणून ‘ब्लॅक ब ट्रान्सपोर्ट’ ॲपवरून फिर्यादीचा मोबाईल क्रमांक मिळविला. कोल्हापूरचे भाडे करून कानपूरला जातोय, उत्तरप्रदेशातील काही भाडे आहे का? अशी फिर्यादीस विचारणा केली. त्यावेळी समोरील व्यक्तीने पाठविलेली गाडीची कागदपत्रे पाहून त्यांना ओंकार शुगर फॅक्टरीतील साखर बाराबंकी येथील बिस्किट कंपनीला द्यायची असल्याचे सांगितले. पण, संशयित आरोपीने फसवणुकीच्या उद्देशाने गाडीची सर्व कागदपत्रे, नंबरप्लेट बनावट तयार केला होता.

त्याने कारखान्यातून साखर उचलली आणि महाराष्ट्रात असेपर्यंत फिर्यादीशी संपर्क ठेवला. त्यानंतर त्याने मोबाईल बंद केले. संशयिताने कोणताही पुरावा मागे ठेवला नव्हता, तरीपण अक्कलकोट दक्षिण पोलिसांनी उत्तरप्रदेश पोलिसांच्या मदतीने संशयितांना शोधून काढले. आकाश अशोक कुशवाह, अभिषेक श्रवन पांडे, उपेंद्रसिंग रविंद्रसिंग भदोरीया व अरविंदकुमार भगवानदास गुप्ता अशी संशयितांची नावे आहेत.

मोबाईल चोर सापडला अन्‌ पोलिस संशयितापर्यंत पोचले

पोलिसांनी जेरबंद केलेल्यांमधील आकाश कुशवाह हा मोबाईल चोर आहे. अभिषेक पांडे हा उपेंद्रसिंग भदोरीया याला सीमकार्ड पुरवत होता. भदोरीया पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी आहे. भदोरीयाकडून साखर विकत घेणारा अरविंदकुमार गुप्ता याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. भदोरीया हा उत्तरप्रदेशातून भाडे घेऊन येताना गाडीची कागदपत्रे खरी दाखवायचा आणि जाताना गाडीची कागदपत्रे बनावट तयार करायचा. अशा गुन्ह्यासाठी भदोरीया आकाशकडून चोरीचे मोबाईल घ्यायचा. त्या चोरीच्या मोबाईलवरून समोरील व्यक्तींशी संपर्क ठेवायचा. उत्तरप्रेदशच्या हद्दीत गेल्यावर सीमकार्ड बंद करून ठेवायचा. दुसऱ्या गुन्ह्यात दुसरेच सीमकार्ड वापरत होता. पोलिसांनी एक महिन्यानंंतर तपासाला सुरवात केली. आपली चोरी पचल्याचे समजून चोरटेही बेफिकीर राहिले. पोलिसांनी यात पहिल्यांदा मोबाईल चोर पकडला. त्याच्याकडे तपास करून बाकीच्यांचा शोध घेतला. संशयितांकडून पोलिसांनी साखरेची ५० किलोची ८३३ पोती व गुन्ह्यातील वाहन जप्त केले.

‘या’ पथकाची धडाकेबाज कारवाई

पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, पोलिस उपअधीक्षक विलास यामावार, पोलिस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत बंधे, पोलिस हवालदार सुभाष दासरे, जगदीश राठोड, सिंकदर मुल्ला, गजानन शिंदे, मळसिद्ध कोळी यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली. सायबर सेलचे पोलिस उपनिरीक्षक अमित करपे, पोलिस शिपाई नबीलाल मियावाले, रतन जाधव, राहुल सोनकर यांनीही मदत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com