डंख कोरोनाचा : साहब कोरोना बकवास है, पैसे निकालने का नया धंदा है 

corona
corona

सोलापूर : पत्रकार साहब आपको क्‍या लगता है सचमुच में कोरोना है. मी दोन मिनिटे शांतच झालो. प्रशासन, डॉक्‍टर गेल्या पाच महिन्यांपासूनच एकाच विषयावर काम करत आहेत, कोरोनासाठी संपूर्ण देश, देशातील व्यवहार बंद ठेवले. अनेकांचा मृत्यू होतोय म्हटल्यावर मी म्हणालो हो आहेच की कोरोना. नही साहब कोरोना, बिरोना कुछ नही...ये सब बकवास है, पैसा निकालने का नया धंदा है अस म्हणत ते त्यांची बाजू मला समजावून सांगत होते. मीही क्षणभर विचार केला, आपण ज्यांना फोन करतोय त्यांनी कोरोना खूप जवळून अनुभवलाय, त्यांच्या कुटुंबातील हक्काचा माणूस त्यांनी गमावलाय. त्यांचे ऐकून घेत असतानाच मध्येच मी म्हणालो तुम्ही असं कसं काय बोलता, त्यावर ते म्हणाले, साहब मेरी तीस साल की औरत आठ दिन अस्पातलमे थी, मैने ऊसको खाना खिलाया, उसके पास रोज गया, ओ कोरोनाकी वजह से अल्ला को प्यारी होगई, फिर मुझे कोरोना क्‍यू नही हुआ! 

विचाराची आणि डोळ्यांची झापड उघडणारी ही वाक्‍ये आहेत जोडभावी पेठेतील 35 वर्षीय यासीन कामतीकर यांची. अवघ्या 30-31 वर्षांची पत्नी रिझवानाला त्यांनी कोरोनाच्या संकटात गमावल्यानंतर त्यांना कोरोना बकवास वाटू लागला आहे. कोरोनाला यासीन यांच्या परिवाराने खूप जवळून अनुभवले आहे. आलेले दुख: सांगायचे कोणाला? आणि हे दुख: सांगून गेलेला आपला माणूस परत येणार आहे का? अस्साच प्रश्‍न त्यांच्यासमोर पडला होता. मी म्हणालो, कोरोनाचा डंख किती खोलवर आहे, कोरोनामध्ये पैसाही जातोय आणि माणूसही गमवावा लागतोय. तरी देखील लोक आज रस्त्यावर बिनधास्त फिरत आहेत, मास्क वापरत नाहीत. गर्दीत जातात, अनलॉक झाला म्हणजे कोरोना गेला...असाच काहीसा अनेकांचा समज झाला आहे. तुमच्या कुटुंबावर कोरोनाने आणलेली वाईट वेळ वाचून एक जरी माणूस जागृत झाला तरीही त्यातून एक कुटुंब वाचेल असे सांगताच यासीन कामतीकर यांनी भरभरून बोलायला सुरवात केली. 

साध्या खोकल्याचा त्रास रिझवाना यांना सुरू झाला. नेहमीप्रमाणेच खोकला असेल म्हणून सुरवातीला त्याकडे दुर्लक्ष केले. झोपल्यानंतर खोकला अधिकच येऊ लागला. सोलापुरातील लहान-लहान दोन दवाखान्यांमध्ये यासीन यांनी त्यांच्या पत्नीला उपचारासाठी नेले. तुमचा आजार किरकोळ असल्याचे सांगितले. शेवटी यासीन यांनी त्यांच्या पत्नीला सोलापुरातील मोठ्या रुग्णालयात 29 जूनला ऍडमिट केले. मृत्यू होण्याच्या काही तासांपर्यंत रिझवाना या व्यवस्थित बोलत होत्या. घरी असलेल्या दोन मुलांबद्दल आणि मुलीबद्दल आवर्जून चौकशी करत होत्या. आपली पत्नी बरी होईल, कोरोनातून बाहेर येईल अशीच आशा यासीन यांना होती. पत्नीला जेवणासाठी घरचा डबा असावा म्हणून यासीन रोज दवाखान्यात जात. तुमचा पेशंट बरा होईल असा विश्‍वास डॉक्‍टरही देत होते. 6 जुलैला रात्री 8 नंतर रिझवाना यांची तब्येत अचानक खालावली आणि बाराच्या दरम्यान त्यातच त्यांचा मृत्यू झाला. डॉक्‍टर जे सांगत होते त्याच्या अगदी उलटच घडल्याने यासीन यांच्या पायाखालची जमीनच क्षणभरासाठी सरकली. 

मृत्यू होण्याच्या काही तास अगोदर रिझवाना यांना डाळिंबाचा ज्यूस प्यावा वाटला म्हणून यासीन 6 जुलैला बायकोसाठी डाळिंबाचा ज्यूस घेऊन गेले. आता त्यांना ज्यूस देऊ नका म्हणून डॉक्‍टरांनी सांगितले. बायकोने यासीन यांच्याकडे ज्युसबद्दल आवर्जून विचारले. डॉक्‍टरांनी सांगितल्यामुळे ते त्यांच्या बायकोशी खोटं बोलले. ज्यूस आणून बराच वेळ झाल्याने तो आता खराब झालाय. हा ज्यूस टाकून देतो, तुझ्यासाठी दुसरा फ्रेश ज्यूस घेऊन येतो असे उत्तर यासीन यांनी त्यांच्या पत्नीला दिले. हाय अल्ला, आप ऐसा क्‍यू करते हो, पैसा क्‍या हराम का आता है क्‍या, आप ज्यूस मत फेकके दोन, लाओ मै पी लेती हु असे म्हणत रिझवाना यांनी यासीन यांनाच सुनावले. कोरोनाशी लढणाऱ्या रिझवानाला एवढं सगळं आठवतंय, मग तिचा अवघ्या सहा तासांमध्ये मृत्यू कसा होऊ शकतो? या प्रश्‍नाचे उत्तर आजही यासीन यांना मिळाले नाही, म्हणून यासीन यांना कोरोना बकवास वाटत आहे. ते त्यांच्या पत्नीबद्दल आणि कोरोनाबद्दल फक्त सांगतच राहिले, साहब प्लीज दो मिनीट मेरी बात सुनलो म्हणतं म्हणतं त्यांच्या पत्नीने कोरोनाच्या लढाईत केलेला संघर्ष, कोरोना येण्यापूर्वीच्या हसत्या खेळत्या कुटुंबातील आठवणींना माझ्यासमोर मोकळी वाट करून दिली. 

दहावी पास झालेल्या साकिब आणि नववीत असलेला शाहिद आणि एका मुलीच्या आईला हिरावून घेऊन कोरोनाने त्या लेकरांना पोरकं केलं आहे. कोरोनाने फक्त आठच दिवसात कामतीकर कुटुंबाची वाताहत केली. या कुटुंबाची वाताहत करण्यास कोरोना जेवढा जबाबदार आहे तेवढेच जबाबदार सोलापुरातील प्रशासन, रुग्णालये आणि डॉक्‍टर असल्याचीही रुखरुख यासीन यांना वाटत आहे.

डॉक्‍टरांनी सांगितली ती औषधे आणून दिली. डॉक्‍टर सांगतील तसा उपचार केला तरीही कामतीकर परिवाराला माणूस गमवावा लागला. अवघ्या सात ते आठ दिवसांच्या उपचारासाठी अव्वाच्या सव्वा खर्च रुग्णालयाने लावला. जवळपास साडेचार लाख रुपयांचा खर्च करूनही कोरोनाच्या लढाईत रिझवाना यांना जीव गमवावा लागला आहे. पत्र्याच्या दुकानात सेल्समनची नोकरी करणाऱ्या यासीन यांना हा खर्च न पेलवणारा आहे. खरंच कोरोना किती भयानक आहे याचा प्रत्यय घरातील पन्नाशीच्या आतील आणि कमवणारी माणसं गमावलेल्या कुटुंबांकडे पाहिल्यानंतर येतो. कोणाच्याही ध्यान्यी मनी नसलेला कोरोना बघता बघता आपल्या जिल्ह्यात, तालुक्‍यात, गावात आणि गल्लीत आला. अनपेक्षितपणे आलेला कोरोना आपल्यातील माणसं तर नेतोच पण पैशाने अनेकांची वाताहत करतोय. कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन केला. लॉकडाऊनमुळे कोरोना कमी झाला की नाही? हा संशोधनाचा विषय आहे परंतु लॉकडाऊनमुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले. अनेकांची रोजीरोटी कोरोनाने हिरावली हे भीषण वास्तव आहे. कोरोनाने समाज जीवनावर काय काय आणि कसा कसा डंख मारलाय याची अनेक उदाहरणे आता पुढे येऊ लागली आहेत. 

रिझवाना यांना नाही वाचवू शकली महागडी इंजेक्‍शनही 
कोरोनावर सध्या कोणतेही औषध नाही, लस नाही तरी देखील अनेक जण कोरोनावर मात करत आहेत. औषध आणि लस नसताना कोरोना बरा कसा होतो? असाच प्रश्‍न अनेकांना पडला आहे. रिझवाना कामतीकर या अवघ्या 30-31 वर्षांच्या, त्यांना इतर कोणताही त्रास नव्हता. रिझवाना यांचा कोरोना सहजपणे बरा व्हायला हवा होता. उपचार करणारा दवाखाना औषधांची आणि इंजेक्‍शनची यादी सांगतच गेला, आता पैसा महत्वाचा नाही. माणूस वाचला पाहिजे, पैसे काय केंव्हाही मिळविता येतील म्हणून यासिन कोरोनाच्या लढाईत बायकोला वाचविण्यासाठी लढतच राहिले. यासीन यांनी बायकोचे दागिने व आजपर्यंत केलेली बचत दवाखान्याच्या खर्चासाठी मोडली. तरीही पैशांची गरज पूर्ण होत नसल्याने नातेवाइकांकडून उसनवारी करून पैशांची तजवीज केली. पैसा कितीही जाऊ द्या पण माणूस वाचला पाहिजे म्हणून यासीन यांनी रिझवाना यांच्यासाठी 5 हजार 300 रुपये किमतीची तब्बल सात इंजेक्‍शन आणली तरी देखील फरक नाही पडला. त्यानंतर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांनी रिझवाना यांच्यासाठी 40 हजार रुपयांचे दोन इंजेक्‍शन आणायला सांगितले. रिझवाना यांच्या उपचारासाठी महागडी इंजेक्‍शन आणून देखील काहीच उपयोग झाला नाही. कोरोनाचा डंख बसलेल्या रिझवाना या अवघ्या 30-31 वर्षाच्या होत्या. त्यांच्यासाठी एवढे महाग इंजेक्‍शन वापरूनही त्यांना वाचविण्यात यश आले नाही हे अनाकलनीय आहे दुर्दैवीच आहे. 

साकिबचे दहावीचे गुण बघायचे राहूनच गेले 
यासीन आणि रिझवाना यांची मुले साकिब आणि शाहीद अतिशय हुशार आहेत. त्यातील साकिब यावर्षी दहावी पास झाला तर शाहीद नववीमध्ये गेला आहे. साकिब मोठा मुलगा असल्याने आई रिझवानाचे त्याच्यावर बारीक लक्ष असायचे. आपल्या मुलाने दहावीत चांगले मार्क घ्यावेत म्हणून रिझवाना साकिबला वारंवार अभ्यासाबद्दल सांगत होत्या, साकिब दसवी मे तुम 70% ही मार्क लेना. आईने पाहिलेले स्वप्न साकिबच्या मनावर बिंबले होते. त्याने वर्षभर अभ्यास केला आणि आपल्या आईचे स्वप्न पूर्ण केले. दहावीमध्ये त्याला 70 टक्के मार्क मिळाले आहेत. आईने पाहिलेले स्वप्नं साकिबने पूर्ण केले परंतु पूर्ण झालेले स्वप्न पाहण्यासाठी रिझवाना मात्र सध्या हयात नाहीत. दहावीचा निकाल लागण्यापूर्वीच व साकिबला मिळालेले मार्क पाहण्यापूर्वीच रिझवाना यांचा कोरोनाने बळी घेतला. कोरोनाने आईवर मारलेला डंख बालवयातील साकिबच्या मनावरही बसला आहे. कोरोनाने साकिब अन्‌ शाहीदची आई हिरावून घेतली. पत्नीला वाचविण्यासाठी दवाखान्यात उपचारावर झालेला जवळपास चार लाखांचा झालेला खर्च आणि उत्पन्नाचा मार्ग असलेली सेल्समनची खासगी नोकरी यासीन यांच्यासाठी आष्युयातील कठीण काळाची परीक्षा आहे. पत्नी गेली, पैसे गेले, आता जगून तरी काय उपयोग असा विचार करणारे यासीन आता फक्त साकिब आणि शाहीद व एकुलत्या एक मुलीसाठी कोरोना विरुद्धच्या संर्घाविरुध्द लढण्यासाठी उठून उभा राहिले आहेत. कोरोनाने मारलेला डंख आयुष्याची वाईट आठवण देऊन गेला आहे. परंतु आलेल्या संकटावर मात करून मुलांचे भवितव्यासाठी यासीन पुन्हा एकदा जनमानसात रुळण्याचा प्रयत्न करत आहेत. खासगी नोकरी करणाऱ्या यासीन यांना दवाखान्यासाठी झालेला खर्च, मुलांच्या शिक्षण व पालन पोषणावर होणारा खर्च न पेलवणारा आहे. या दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी आणि कोरोना विरुद्धची लढाई लढण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालेल्या यासीन व कामतीकर कुटुंबाला आता आर्थिक मदतीची आवश्‍यकता आहे. समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांनीच आता पुढाकार घेण्याची आवश्‍यकता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com