दैनंदिन जीवनातून हद्दपार होत असताना मुरुडचा अडकित्ता सातासमुद्रापार... 

सुस्मिता वडतिले
Wednesday, 29 July 2020

पूर्वी अडकित्तांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात असे. त्यामुळे अडकित्ता कारागीरांची महिन्याला २० हजारा रुपयांपर्यंत उलाढाल होत होती. परंतु आता पान आणि सुपारीची जागा मावा, गुटखा यांनी घेतली. त्यामुळे अडकित्ते नाहीसे झाले आहेत. त्यामुळे हल्ली अडकित्ता वापरण्याचं प्रमाण कमी झाले आहे. मोठ्या अडकित्त्यांची मागणी तर पूर्णपणे ठप्प झालेली आहे. त्यात कोरोना व्हायरसमुळे त्याची विक्रीही मंदावली आहे.

पुणे : आपल्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या अनेक वस्तूंचा प्रभाव जबरदस्त असतो. त्यातीलच एक वस्तू जी पूर्वीच्या लोकांना हवीशी वाटणारी आणि आता सध्याच्या पिढीला कदाचित माहिती नसलेली वस्तू म्हणजे अडकीत्ता. महाराष्ट्रात जसे शहरीकरण झाले तसे अडकित्ता ग्रामीण भागापुरताच मर्यादित राहिला आणि सध्या समाज जीवनातून तो हद्दपार होत आहे.

पूर्वी अडकित्तांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात असे. त्यामुळे अडकित्ता कारागीरांची महिन्याला २० हजारा रुपयांपर्यंत उलाढाल होत होती. परंतु आता पान आणि सुपारीची जागा मावा, गुटखा यांनी घेतली. त्यामुळे अडकित्ते नाहीसे झाले आहेत. त्यामुळे हल्ली अडकित्ता वापरण्याचं प्रमाण कमी झाले आहे. मोठ्या अडकित्त्यांची मागणी तर पूर्णपणे ठप्प झालेली आहे. त्यात कोरोना व्हायरसमुळे त्याची विक्रीही मंदावली आहे.

लातूर जिल्ह्यातील मुरुड गावात अडकित्ते तयार करून विकले जातात. मुरूडचे हे अडकित्ते सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात जास्त प्रमाणात विकले जातात. याशिवाय गुजरात आणि रशिया येथेही या गावातील अडकित्ता प्रसिध्द आहे. मुरुड गावातूनच तयार केलेले अडकित्ते अनेक भागांमध्ये जातात. पूर्वी लातूर जिल्ह्यातील कानडी बोरगाव, मौजे तांदुळजा आणि उदगिरे या गावातील हे अडकित्ते बनवले जात असायचे पण आता फक्त हे कारागीर एकाच गावात रहायला आल्यामुळे मुरुड गावात अडकित्ते बनवले जात आहे. पानाबरोबर अडकित्तासुद्धा रांगड्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देतो आणि हे रांगडेपण महाराष्ट्राच्या ग्रामीण समाज जीवनाचे प्रमुख वैशिष्ट्य. एखाद्या गावातील कर्तबगार प्रभावशाली व्यक्तीची ओळख त्याच्या अडकीत्त्याने सुपारी कापण्याच्या विशिष्ट शैलीतून दिसून येते.

अडकित्ता हे खरंतर एक सुपारी कापणारं शस्त्र आहे. विळीप्रमाणेच अडकित्याची धार मानवी मुल्यांना साधणारी आहे. जसे विळी स्वंयपाक घरात असते तसे अडकित्ता शेतकरी आणि ग्रामीण भागात जास्त प्रमाणात वापरात असतो. पान आणि सुपारीने ज्याप्रमाणे कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि अनेक शृंगार रसाच्या रचनांमध्ये स्थान मिळवले, तीच किमया अडकित्त्याने सुद्धा केली आहे. या रसिकपणाचा एक महत्वाचा घटक म्हणून अडकित्त्यास सुद्धा पान, सुपारी, कात आणि चुण्याबरोबर शृंगारिक रचनांमध्ये स्थान मिळवले आहे.

हल्ली जसा प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल असतो, तसाच पूर्वी अडकित्ता ही अनेकांकडे पाहावयास मिळत. म्हणजे गरिबातला गरीब शेतकरी व्यक्तीसुद्धा स्वतः चा स्वतंत्र असा अडकित्ता बाळगून ठेवत असत, शिवाय अडकित्ता त्यास शेतातील विविध कामाच्या वेळी अनेक प्रकारे उपयोगी पडतो आहे.

मुरूड येथील अडकित्ता कारागीर प्रशांत आणेराव म्हणाले, आमची अडकित्ता बनवण्याचा व्यवसाय करणारी ही सध्या चौथी पिढी सुरु आहे. आम्हाला आवड आणि गरज असल्यामुळे काहीतरी कष्ट करायचे म्हणून आजही अडकित्ता तयार करत आहोत. आमचे अडकित्ते हे अनेक भागात विक्रीस गेलेले आहेत. परंतु सध्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे अडकित्ता हद्दपार झाले असून आता सुपारी फोडण्यासाठी मशीन आलेल्या आहेत. आधुनिक युगामुळे लघु उद्योगावर मोठा परिणाम झाला आहे. त्यात सध्या कोरोनामुळे आमचा व्यवसाय पूर्ण बंद पडला आहे. त्यामुळे सध्या शेतावरच काम करत आहे. पुढची पिढी हा व्यवसाय करेल कि नाही याची शाश्वती देऊ शकत नाही.  

अडकित्त्या बनवण्यास लागतात हि साधनं...

ग्रॅन्डर व्हिल, होल पाडण्यासाठी ड्रिल मशीन, गरम पाण्यासाठी कोळशाची भट्टी, हातोडा, ऐरण, डिझाईन काढण्यासाठी कानस ही साधनं अडकित्त्या बनवण्यासाठी लागतात.

असे बनवलं जातं अडकित्ता...

अडकित्त्याची दोन पाती असतात. वरचे धारदार तर खालचे सुपारी ठेवण्यासाठी असतो. वरच्या पातीचे काम खूप महत्त्वाचे असते. प्रथम त्या-त्या आकाराच्या लोखंडाचे तुकडे घेऊन त्यांना तापवून हातोड्याने त्याला प्राथमिक आकार दिला जातो. दोन्ही पात्यांना कानसीने घासून त्याला आकार दिला जातो. त्यानंतर दोन्ही पात्यांना छिद्रे पाडली जाते. वरच्या पात्याला योग्य तापमानात दगडी कोळशात तापवून कडक केले जाते. या अडकित्त्याला पाणी पाजवणे म्हणतात. पाण्यात पात्याची धार बुडवली जाते, यालाच पाणी पाजल्याशिवाय त्याला कडकपणा येत नाही. ही पद्धत खूप कठीण आहे, कारण योग्य पद्धतीने पाणी न पाजवल्यास धारदार अडकित्ता तयार होत नाही किंवा धार कायम राहत नाही. त्यानंतर हेंबरी पावडर सरसाने चिटकवून ते वाळल्यानंतर या फिरत्या चाकावर अडकित्ता घासला जातो, त्यानंतर अडकित्ता तयार होतो.

असं लिहिलं आहे अडकित्त्यावर...

मुरूडच्या अडकित्त्यावर 'के. बी. मुरूड' असे लिहिलेले आहे. याचा अर्थ 'कानडी बोरगाव' असा आहे. या अडकित्त्यावर कारागिरांनी स्वतःचे नाव न घालता लातूर जिल्ह्यातील कानडी बोरगाव या गावाचे नाव टाकले आहे. हे या गावाचे खास वैशिष्ट्य आहे.  

म्हणून अडकित्त्यांवर त्रिकोणाचे चित्र काढतात...

पूर्वापारपासून आजही काही खेडेगावांमध्ये कुटुंब नियोजनाचे प्रबोधन नाही. त्यात याच ग्रामीण भागात अडकीत्त्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. हीच संधी ओळखून कारागीर हे अडकीत्ता बनवताना त्याच्यावर त्रिकोण काढून ग्रामीण भागात कुटुंबनियोजनाचे महत्त्व पटवून देण्याचे काम करत आहे.

अडकीत्यांच्या किंमती...

३० रुपयांपासून ते दोन हजार रुपयापर्यंतच्या अडकीत्यांच्या किंमती आहेत. 

अडकीत्यांच्या ऊंची...

अडकीत्यांच्या ऊंची ही तीन इंचापासून ते अठरा इंचापर्यंत असते, त्यानुसार कारागीर अडकित्ते बनवून देतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The story of Adkitta in Murud village in Latur district