बालकांसाठी काम करणाऱ्या संस्थेकडे आल्यात धक्कादायक तक्रारी; वाचून तुम्हालाही बसेल धक्का

सुस्मिता वडतिले
Saturday, 8 August 2020

कॅकट्‌स फाऊंडेशन हे बाल लैंगिक अत्याचारासंदर्भात काम करत आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून लैंगिक अत्याचाराबद्दल त्यांच्याकडे अनेक धक्कादायक तक्रारी आल्या आहेत.

पुणे : कोरोना व्हायरसने जगभर हातपाय पसले आहेत. देशात त्याला रोखण्यासाठी सुमारे चार महिन्यापासून लॉकडाऊन सुरु आहे. त्यात शिथीलता आणली असली तरी शाळा व महाविद्यालये अद्याप बंद आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. याचा फटका सर्वच घटकांना बसत आहे. यातून आणखी एक धक्कादायक वास्तव कॅकट्‌स फाऊंडेशनच्या समोर आले आहे.

कॅकट्‌स फाऊंडेशन हे बाल लैंगिक अत्याचारासंदर्भात काम करत आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून लैंगिक अत्याचाराबद्दल त्यांच्याकडे अनेक धक्कादायक तक्रारी आल्या आहेत. बाल लैंगिक अत्याचाराबद्दल अजूनही मनमोकळेपणाने बोलले जात नाही. कारण लैंगिक शोषण झाल्यास त्याविषयी कसे बोलावे याची भिती मनात असते. न बोलण्याने याचे प्रमाण कमी न होता दिवसेंदिवस वाढत चाललेले असल्याचे समोर येत आहे.

बाल लैंगिक अत्याचार करणाऱ्यांमध्ये बहुतांश व्यक्ती परिचयातील नातेवाइक, ओळखीचे, शेजारी यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. सध्या सामाजिक परिस्थिती व आपण ज्या समाजात जगत आहोत, वाढत आहोत आणि वावरत आहोत त्याच समाजाचे हे अत्यंत भयानक रूप आहे. अशा अनेक घटना आपल्या आजूबाजूला रोजच घडत असतात. पण अनेकजण आपला लैंगिक छळ झाला आहे. त्याबद्दल कुणालाही सांगितलेले जात नाही. 

कोरोना व्हायरसमुळे शाळा व महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे लहान मुलांपासून मोठी तरुणाई घरात बसून- बसून कंटाळून गेली आहेत. अनेकजण फक्त दिवसरात्र हातात मोबाईलचा वापर करत आहे. यात अश्‍लिल व्हिडीओ पाहण्याचे प्रमाण वाढल्याचा बातम्या आपण या आधी ऐकल्या आहेत. तसेच लॉकडाउनमध्ये स्पर्श न करताही लैंगिक शोषणचे प्रमाण वाढले असल्याचे धक्कादायक प्रकार वाढले आहे.

यात पालकांचे या मुलांकडे लक्ष नसल्याचे समोर आले आहे. पालकांना असे वाटते की, आपला मुलगा आपल्या डोळ्यांसमोर आहे. मग तो व्यवस्थितच आहे. परंतु तो मुळात करतोय काय? यांबाबत विचारपूस पालक करत नाहीत. यामुळे अशा घटना घडत आहेत. मुलांना ‘बॅड टच गुड टच’ याची जाणीव करून देणे गरजेचे आहे.

कॅकट्‌स फाऊंडेशनच्या नूसरत खान पहाडे म्हणाल्या, बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर येण्याचे प्रमाण वाढले आहे. बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना या आपल्या जवळच्या नातेवाइकांकडूनच होत असतात. अत्याचार हा अतिशय गंभीर विषय आहे. लॉकडाउनमध्ये पालकांनो मुलांकडे दुर्लक्ष करू नका. मुले- मुली आणि पालकांमध्ये असलेल्या असंवादामुळे अशा समस्या उद्भवत आहेत. सायंकाळी सहानंतर मुलांच्या हातात फोन देऊ नका. मुले वयात आल्यावर शरीराबद्दल माहिती देणे हे पालकांचे कर्तव्य आहे. लैंगिक अत्याचाराबाबत जनजागृती आवश्यक आहे. बाल लैंगिक अत्याचार याविषयी अनेक सामाजिक संस्था काम करत आहेत. बाल लैंगिक अत्याचाराच्या विरुद्ध भारतामध्ये पोक्सो कायदा आहे. या कायद्यांची माहिती अनेकापर्यंत पोहचली नाही.

खान म्हणाल्या लॉकडाऊन दरम्यान आमच्याकडे अनेक तक्रारी आल्या त्यात मोबाईलचा अतिवापर वाढला असल्याचे सांगण्यात आले. आलेल्या काही तक्रारी सांगताना त्या म्हणाल्या, सहा वर्षाचे मूल आईकडे पोर्नोग्राफी म्हणजे काय याबाबत विचारपूस करत आहे. सर्व बहीण भाऊ एकत्र येऊन खेळ खेळताना एक अट घालून एका मुलाला ड्रेस लेस करून त्याचा व्हिडिओ बनून व्हायरल केला आहे. भाऊ व बहीण एकमेकांना गुप्तांग दाखवत असल्याची एक तक्रार आली होती. वडील मद्य घेऊन मुलींना स्पर्श करतात अश्लील शब्द वापरून काहीही बडबड करत होते. याबरोबर एक महिला अंघोळ करताना तिला तिचे दीर पाहत असल्याची एक तक्रार आली होती, अशा अनेक तक्रारी लॉकडाऊन दरम्यान आल्याचे त्यांनी सांगितले.

मुलामुलींना द्यावेत लैंगिक शोषणासंदर्भात माहिती... 

बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना या जवळच्या माणसांकडूनच घडत असतात. परंतु आपले पालक या गोष्टींवर विश्‍वास ठेवत नाहीत. या घटना थांबवायच्या असतील तर मुलांशी संवाद साधला पाहिजे आणि त्यांच्यावर संस्कार केले पाहिजे. तसेच मुलींना बाहेर पडताना रिक्षा, बसचा प्रवास करताना अशा प्रसंगांना नेहमीच सामोरे जावे लागते. हिंसाचार थांबवायचा आणि संपवायचा असेल तर प्रत्येक मुलामुलीला लैंगिक शोषणासंदर्भात माहिती पटवून दिली पाहिजे.

नेहमीच पालकांनी मुलांना वेळ देणे महत्त्वाचे...

बाल लैंगिक अत्याचाराची माहिती परिवारासोबत संवाद नसल्याने होत नाही. मुले सोशल मीडियामुळे अर्धवट माहिती घेऊन अशा घटनांच्या आहारी जात आहेत. त्यामुळे अशी विकृती वाढत चालली आहे. मुले मनातील प्रश्‍न पालकांसमोर मांडत नाहीत. त्यांना बोलते केले पाहिजे. यामुळे आईवडिलांनी मुलांसोबत बोलणे, त्यांना वेळ देणे, प्रत्येक गोष्टींबद्दल पटवून देणे हे सर्व खूप महत्त्वाचे आहे. अशा घटना घडू नयेत. यासाठी आईवडिलांनी मुलांवर चांगले संस्कार केले पाहिजेत. मुलांना प्रत्येक गोष्टीची माहिती करून दिली पाहिजे. तसेच टीव्ही, मोबाईल ही साधने देखील या अत्याचारास बळी पडण्याचे मोठे कारण आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The story of Complaints from parents to the Cactus Foundation regarding children