सोलापुरात 15 दिवसांचा कडक लॉकडाऊन करा, माजी पालकमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

प्रमोद बोडके
Friday, 3 July 2020

शेळगी परिसरात जनता कर्फ्यूची तयारी 
जोडभावी पेठ पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भागात अलीकडच्या दिवसात कोरोना बाधिताच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. कोरोनाची वाढत चाललेली साखळी तोडण्यासाठी अनुषंगाने जोडभावी पेठ पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात संचारबंदी लागू करण्यासाठी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली शेळगीतील शिवदासमय मंगल कार्यालयात आज बैठक झाली. सहाय्यक पोलिस आयुक्त कमलाकर ताकवले यांचीही या वेळी प्रमुख उपस्थिती होती. बैठकीस नगरसेवक अविनाश पाटील, प्रा. नारायण बनसोडे, बाजार समितीचे संचालक बसवराज इटकळे, माजी नगरसेवक चंद्रकांत रमणशेट्टी, संजय कणके, ज्ञानेश्वर कारभारी, जोडभावी पेठ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवशंकर बोंदर, सहाय्यक पोलिस निरीक्षक करणकोट, महापालिकेच्या स्वाती आव्हाड यांच्यासह व्यापारी, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. कोरोनाचा वाढत चाललेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनता कर्फ्युची नितांत आवश्‍यकता आहे. शहरात जरी संचारबंदी लागू झाली नाही तरी आपण स्व:ता हून जोडभावी पेठ पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भागात जनता कर्फ्युचे पालन करून कोरोनाची साखळी तोडण्याचा निर्णय या बैठकीत झाला आहे. 

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या व मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही संख्या कमी करण्यासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यात किमान पंधरा दिवसांची कडक संचारबंदी/लॉकडाऊन जाहीर करावा अशी मागणी सोलापूरचे माजी पालकमंत्री तथा भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे व सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना पाठविले आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन स्तरावरून कडक उपाययोजना होणे आवश्‍यक आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांकडून आणि अधिकाऱ्यांकडून संचारबंदीचे पालन केले जात नाही. सर्रास सर्वच बाजारपेठेत गर्दी बघायला मिळत आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे. प्रतिबंधित क्षेत्रातूनही नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत. या सर्व गोष्टींचा विचार केला असता सोलापूर शहरात वाढत चाललेल्या रुग्णसंख्येवर आळा बसणार तरी कसा? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सोलापूर शहर कोरोना मुक्त करायचे असेल तर शहर आणि जिल्ह्यात लॉकडाऊन/कडक संचार बंदीची अंमलबजावणी करावी. आरोग्य विभागामार्फत थर्मल स्कॅनिंगद्वारे प्रत्येक घरोघरी जाऊन रुग्णांची तपासणी करावी. जेणेकरून कोरोना व सारी आजार असलेल्या रुग्णांचे वेळीच निदान होऊन त्यांच्यावर उपचार करता येतील. या अगोदर सोलापूर शहरात एकही रुग्ण नसताना लॉकडाऊन आणि संचारबंदीची अंमलबजावणी होत होती. परंतु सद्यःस्थितीत रुग्ण संख्या वाढत असताना संचारबंदी व लॉकडाऊनची आवश्‍यकता असताना ती केली जात नाही. त्यामुळे सोलापूर शहरातील तमाम नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा मुद्दाही भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी उपस्थित केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Strict lockdown of 15 days in Solapur, demand of former Guardian Minister to the Chief Minister