सोलापूरसह शेजारच्या गावांमध्ये गुरुवारपासून कडक लॉकडाऊन 

प्रमोद बोडके
Saturday, 11 July 2020

मेडिकल आणि दुधाच्या निर्णयाकडे लक्ष 
16 जुलैपासून होणाऱ्या कडक लॉकडाऊनमध्ये दूध विक्री आणि मेडिकलबाबत उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. याबाबत काय निर्णय होतो? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मोठ्या हॉस्पिटल शेजारी असलेल्या मेडिकल दुकानांनाच कडक लॉकडाऊनमध्ये दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी अशीही मागणी पुढे येऊ लागली आहे. 

सोलापूर : सोलापूर शहर व पसिरात वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अखेर आज लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. 16 ते 26 जुलै या कालावधीत सोलापूर महापालिका हद्दीसह शेजारच्या ज्या गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे अशा गावांमध्ये कडक लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. 16 जुलैपासून होणाऱ्या लॉकडाऊनची सविस्तर नियमावली, लॉकडाऊन कालावधीत काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार? याबाबतचा सविस्तर आदेश येत्या एक ते दोन दिवसांमध्ये घेतला जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले. 

उद्या (रविवार, ता. 12) सोलापुरात कोरोनाचा पहिला रुग्ण व कोरोनाचा पहिला बळी जाऊन तीन महिने पूर्ण होत आहेत. अवघ्या तीन महिन्यांमध्ये सोलापुरातील कोरोना हाताबाहेर गेला आहे. शुक्रवारच्या अहवालानुसार शहर व जिल्ह्यात 3 हजार 685 कोरोनाबाधित असून 328 जणांचा मृत्यू झाला आहे. अनलॉक केल्यापासून कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असल्याने सोलापुरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊन घ्यावा असा प्रस्ताव महापालिका व शहर पोलिसांनी तयार केला होता.

पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी लॉकडाऊनबाबतचा निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ आणि पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्यावर जबाबदारी सोपविली होती. या सर्व प्रमुख अधिकाऱ्यांनी आज त्यांच्या-त्यांच्या विभागांची स्वतंत्र बैठक घेतली. त्यानंतर सात रस्ता येथील नियोजन भवनातही सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची आणि महापालिकेच्या गटनेत्यांची बैठक झाली. या बैठकीत लॉकडाऊनबाबत आज दिवसभर चर्चा झाली.

या चर्चेअंती लॉकडाऊनच्या तारखा आज जाहीर करण्यात आल्या आहेत. सोलापूर शेजारी असलेल्या उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ तालुक्‍यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या शिवाय बार्शी तालुक्‍यातही कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. 16 जुलैपासून होणाऱ्या कडक लॉकडाऊनमध्ये सोलापूर शेजारील कोणत्या गावांचा समावेश होणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Strict lockdown in neighboring villages including Solapur from Thursday