
विद्यार्थ्यांनी तयार केली ‘ई-बायसिकल’ ; आठ रुपयात धावते ७१ किलोमीटर
नागपूर : पेट्रोलच्या किमतीत दिवसागणिक वाढ होत आहे. त्यामुळे भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय त्याला समोर येत आहे. बाजारात अनेक इलेक्ट्रिक वाहने आली आहेत. मात्र, किमती खूप असल्याने ती खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एनआयटी) विद्यार्थ्याने चक्क ८ रुपयांत ७१ किलोमीटर धावणारी ‘ई-बायसिकल’ तयार केली. त्यातून २५ ते २८ किलोमीटर वेगाने जाता येणे शक्य होते.
नागपुरात पेट्रोलने शंभरी पार केली असून येत्या काही दिवसांत त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्याचे दिसून येत आहे. शिवाय पेट्रोल आणि डिझेलमुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत असल्याने त्यापासून पर्यावरणाला वाचविण्यासाठी पेट्रोल व इंधनावर चालणाऱ्या वाहनांचा वापर कमी करावा लागणार आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टिने आता ‘इकोफ्रेंडली’ वस्तूंना अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामध्ये ई-बाईक वापरण्यावर नागरिक सर्वाधिक भर देत आहेत.
याच संकल्पनेचा विचार करून महाविद्यालयातील यांत्रिकी विभागाच्या अंतिम वर्षांच्या कार्तिक रेड्डीवार, कौस्तुभ टिचकुले, आकाश खादिकर, सचिन बोकडे, सोनाली धांडे, पूजा तिरपुडे, सोनल बडोदे, दिव्यांशु ठाकरे या विद्यार्थ्यांनी बॅटरी, चार्जर आणि मोटरचा उपयोग करीत ही ई-बायसिकल तयार केली आहे. यासाठी त्यांना विभागाचे प्रमुख डॉ. मांडवगडे आणि प्रा. आर.डी. खोरगडे यांचे मार्गदर्शन लाभले. ही ई-बायसिकल २५ ते २८ किमी ताशी वेगाने चालवता येते. ७१ किलोमीटरसाठी केवळ १ युनिट वीज वापर होतो. १ युनिट चार्जिंगसाठी अंदाजे ८ ते ९ रुपयाचा खर्च येतो. विशेष म्हणजे ही सायकल ८० ते ९० किलो वजनापर्यंत सहजरित्या २५ कि.मी. प्रतितास या वेगाने चालू शकते.
पर्यावरणाच्या दृष्टीने तयार करण्यात आलेली ‘ई-बायसिकल’ ही आजच्या परिस्थितीत अतिशय उपयुक्त ठरणारी आहे. शिवाय तिचा खर्चही कमी असल्याने ती सर्वसामान्यांना परवडणारी आहे.
- डॉ. अमोल देशमुख, प्राचार्य,नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
Web Title: Students Create E Bicycles Runs 71 Kms In Eight Rupees Nagpur Institute Of Technology
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..