विद्यार्थ्यांनो प्रवेशाची चिंता नको ‘हे’ वाचाच! जात पडताळणी प्रमाणपत्र एका दिवसात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

students took admission in the second round of XI
विद्यार्थ्यांनो प्रवेशाची चिंता नको ‘हे’ वाचाच! जात पडताळणी प्रमाणपत्र एका दिवसात

विद्यार्थ्यांनो प्रवेशाची चिंता नको ‘हे’ वाचाच! जात पडताळणी प्रमाणपत्र एका दिवसात

सोलापूर : अभियांत्रिकी, मेडिकलसह इतर विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया आता सुरू झाली आहे. पण, काही विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी लागणाऱ्या जात पडताळणी प्रमाणपत्राची चिंता लागली आहे. या पार्श्वभूमीवर सोलापुरातील जात पडताळणी समितीने दोन-चार दिवसांत प्रवेश घ्यावा लागणाऱ्या विद्यार्थ्यांना एका दिवसात प्रमाणपत्र देण्यासाठी पुढाकार घेतला आहे; जेणेकरून जात पडताळणीअभावी त्यांचा प्रवेश रखडणार किंवा रद्द होणार नाही.

शासनाच्या १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीतील ‘सेवा पंधरवडा’अंतर्गत जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये जाऊन अकरावी, बारावीतील मुलांना जात पडताळणी प्रमाणपत्र काढण्याची प्रक्रिया, आवश्यकता व कागदपत्रांची माहिती दिली जात आहे. दरम्यान, गावातील किंवा तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या संगणक केंद्रावरून बहुतेक विद्यार्थी जात पडताळणीसाठी अर्ज करतात. पण, त्यावेळी ते स्वत:ऐवजी संगणक केंद्रचालकाचा मोबाईल व ई-मेल टाकतात. त्यामुळे प्रस्तावातील त्रुटी कळविल्यानंतरही संबंधित विद्यार्थ्याला त्याची माहिती होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वत:चा मोबाईल क्रमांक व ई-मेल अर्जासोबत जोडल्यास निश्चितपणे अर्जातील त्रुटींची पूर्तता होऊन वेळेत पडताळणी प्रमाणपत्र मिळेल, असेही जात पडताळणी समितीचे सदस्य सचिव सचिन खवले यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. पडताळणी समितीकडे आलेल्या प्रस्तावांची पडताळणी झाल्यानंतर अचूक प्रस्ताव असलेल्यांना तीन महिन्यांपर्यंत वाट पाहावी लागत नाही. त्यांना जास्तीत जास्त एका महिन्यात प्रमाणपत्र ऑनलाइन वितरीत केले जाते, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांनो, ‘या’ बाबी लक्षात ठेवा

 • https://bartievalidity.maharashtra.gov.in वर करावा ऑनलाइन अर्ज

 • कॉम्प्युटर सेंटरवरून अर्ज करताना अर्जासोबत द्यावा अचूक मोबाईल अन्‌ ई-मेल

 • ऑनलाइन अर्ज केल्यानंतर जात पडताळणी समितीला आणून द्यावीत सर्व कागदपत्रे

 • अर्ज दाखल करताना जोडलेल्या पुराव्यावर नातेसंबंध, पान नंबर लिहावे. सर्व कागदपत्रे साक्षांकित करा

 • सीईटी, नेट उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी परीक्षेचे हॉल तिकीट किंवा स्कोअर कार्ड दिले तरी चालेल

 • जात पडताळणी प्रस्तावात त्रुटी असल्यास १५ दिवसांत द्यावीत आवश्यक कागदपत्रे

जात पडताळणीसाठी लागतात ‘ही’ कागदपत्रे

 • महाविद्यालयाचे पत्र, चालू वर्षीचे बोनाफाइड, ऑनलाइन अर्ज भरलेली प्रिंट

 • फॉर्म ‘१५-ए’वर महाविद्यालयाच्या प्राचार्यांची स्वाक्षरी व शिक्का

 • शपथपत्र नमुना नं. १७ व शपथपत्र नमुना नं. ३ (वंशावळ)

 • अर्जदाराचा जातीचा व शाळा सोडल्याचा दाखला झेरॉक्स

 • अर्जदाराच्या वडील, चुलता, आत्या, आजोबा, चुलत आजोबांचा जातीचा, शाळा सोडल्याचा किंवा जन्म दाखला

 • महसुली पुरावे (जुने सातबारा उतारे, टॅक्स पावती, खरेदीखत, सहा-ड, फेरफार उतारा, गहाणखत, मालमत्तापत्रक)

गरजूंना तत्काळ प्रमाणपत्र

कोणत्याही विद्यार्थ्याचा प्रवेश जात पडताळणी प्रमाणपत्राविना थांबणार नाही, यादृष्टीने आम्ही खबरदारी घेत आहोत. ज्यांचा प्रवेश आज-उद्यावर आहे, त्यांच्या प्रस्तावांची तत्काळ पडताळणी करून त्या विद्यार्थ्यांना एक-दोन दिवसांत प्रमाणपत्र दिले जात आहे.

- सचिन खवले, सदस्य सचिव, जात पडताळणी समिती, सोलापूर