esakal | शिवसेनेला जबरी धक्का; सुभाष साबणेंना भाजपकडून उमेदवारी
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेला जबरी धक्का; सुभाष साबणेंना भाजपकडून उमेदवारी

शिवसेनेला जबरी धक्का; सुभाष साबणेंना भाजपकडून उमेदवारी

sakal_logo
By
नामदेव कुंभार

bypolls in Deglur Assembly in Maharashtra : नांदेडमधील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी भाजपने शिवसेनेच्या सुभाष साबणे यांना उमेदवारी दिली आहे. सुभाष साबणे यांनी आज शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला. सुभाष साबणे हे माजी आमदार असून त्यांनी या मतदारसंघातून रावसाहेब अंतापूरकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनांनंतर ही जागा रिक्त झाली होती. कोरोनामुळे त्यांचे निधन झाले होते. रावसाहेब यांचा मुलगा जितेश अंतपुरकर याला काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. देगलूर विधानसभेसाठी 30 ऑक्टोबरला पोटनिवडणूक होणार आहे. तर 3 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड दौऱ्यावर असताना सुभाष साबणे यांच्याशी चर्चा केली. यावेळी सुभाष साबणे यांनी काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केला. ते म्हणाले की, 'अशोक चव्हाण यांच्यामुळे नांदेडमध्ये शिवसेना संपुष्टात येत आहे. ज्या शिवसेनेत 1984 पासून राहिलो ती शिवसेना सोडण्याची वेळ नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यामुळे आली. शिवसेनेसोबत नाराजी नाही, पण नांदेडमध्ये शिवसेना संपविण्याचे काम अशोक चव्हाण करत आहेत. शिवसेना आणि भाजप यांचे नाते हे माय-मावशीचे नाते आहे. '

२००९ मध्ये देगलूर बिलोली हा राखीव विधानसभा मतदारसंघ झाला. २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर हे आमदार झाले होते. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेचे सुभाष साबणे आमदार झाले. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा कॉँग्रेसचे अंतापूरकर आमदार झाले. २००९ आणि २०१९ च्या निवडणुकीत अंतापूरकर यांनी साबणे यांचा तर २०१४ च्या निवडणुकीत साबणे यांनी अंतापूरकर यांचा पराभव केला होता. आमदार अंतापूरकर यांना कोरोनाचा संसर्ग दुसऱ्या लाटेत मार्च मध्ये झाला होता. त्यानंतर त्यांना मुंबईला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना ता. नऊ एप्रिलला त्यांचे निधन झाले होते. त्यामुळे या रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणुक होत आहे.

loading image
go to top