प्रगल्भ समाजाच्या निर्मितीसाठी... 

Lokmanya tilak
Lokmanya tilak

आपल्या देशात झपाट्यानं बदल होत आहेत. काहींना लोक आनंदानं स्वीकारतात, तर काहींना विरोध दर्शवतात. सुधारणांबाबत, बदलांबाबत टिळकांचं म्हणणं एकच होतं, की लोकांना बरोबर घेऊन सुधारणा करा. तुम्हाला वाटतं म्हणून सुधारणा करू नका, त्या बळजबरीनं लोकांवर लादू नका. समाज म्हणून लोकांना प्रगल्भ होऊ द्या. लोक प्रगल्भ झाल्यास सुधारणा लादाव्या लागणार नाहीत, त्या आपोआप त्यांच्या आयुष्याचा भाग बनतील. त्यामुळं त्यांनी संपूर्ण समाजाला एकत्र घेऊन जाण्याची भूमिका तेव्हाही घेतली होती आणि आजही त्यांची तिच भूमिका असती. 

१ ऑगस्ट १९२० हा दिवस म्हणजे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी. आज याला शंभर वर्ष झाली आहेत. मी ‘लोकमान्य : एक युगपुरुष’ या सिनेमात लोकमान्य टिळकांची भूमिका साकारताना टिळकांबद्दल फार वाचन केलं नाही. त्यावेळी माझ्या वाचनात आलेल्या गोष्टी म्हणजे सदानंद मोरे यांचं ‘लोकमान्य ते महात्मा’, ‘दुर्दम्य’ आणि न. चि. केळकरांचं टिळकांच्या अनुभवावरचं एक पुस्तक. मात्र, आमचा दिग्दर्शक ओम राऊत यानं मला सांगितलं, की तू काही वाचू नकोस आणि त्याचा अभ्यास लक्षात घेता मीही वाचणं थांबवलं. कारण मलाही ती भूमिका दिग्दर्शकाला हवी त्या प्रमाणं करायची होती. 

आजची सामाजिक परिस्थिती पाहता टिळक आपल्यात नाहीत, हे फार बरं आहे! आज आपल्या देशात कोणीही उठतं आणि काहीही अभ्यास नसताना, एखाद्या विषयाबाबत संपूर्ण माहिती नसताना सोशल मीडियावर व्यक्त होत असतं. अर्थातच, या सगळ्या गोष्टीकडं टिळकांनी अजिबात लक्ष दिलं नसतं आणि ते त्यांचं काम करत राहिले असते. ज्या काळामध्ये कोणत्याही पद्धतीची स्वातंत्र्याची चळवळ उभी राहत नव्हती, तेव्हा गणिती पद्धतीनं चळवळीला मोठं करीत, देशाला गुलामगिरीची जाणीव करून देत ब्रिटिशांविरुद्ध एकत्र आणण्याचं सगळ्यात मोठं काम टिळकांनी केलं. 

भाषा आणि शिक्षणाबद्दल... 
भाषेबद्दल बोलायचं झाल्यास, टिळकांची भाषेबद्दलची मतं इतक्या टोकाची नव्हती. त्यांना मराठी, संस्कृत आणि इंग्रजी भाषा उत्तम येत होत्या. त्यांचं हिंदी भाषेवर तितकं प्रभुत्व नव्हतं आणि म्हणूनच नंतरच्या काळात त्यांनी हिंदी शिकायची नाही, असंही ठरवलं होतं. तुरुंगात असताना ते फ्रेंच आणि जर्मन भाषाही शिकले. त्यामुळं भाषेबद्दल त्यांची टोकाची मतं होती असं माझ्या ऐकण्यात आणि वाचनात आलेलं नाही. याउलट ज्ञानासाठी आपल्याला येत असलेल्या भाषेत ज्ञानप्राप्ती करावी याबाबतीत ते नक्कीच आग्रही होते. ज्ञानावर त्यांचा विश्वास होता. त्यामुळं ज्ञान कुठल्या भाषेत मिळतंय याबाबतीत त्यांची तितकी टोकदार मतं नव्हती. टिळकांचं म्हणणंच हे होतं की, आपल्या शिक्षणाचा, आपल्या ज्ञानाचा उपयोग हा आपल्या देशाला व्हायला पाहिजे, बाहेरच्या देशाला नाही. त्यामुळंच त्यांनी देशात राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा सुरू केल्या. त्यांनी आयुष्यभर या गोष्टीचा प्रसार केला. त्यासाठी त्यांनी स्वराज्य, स्वदेशी आणि राष्ट्रीय शिक्षण या गोष्टी आपल्या कार्यातून दाखवून देण्यासाठी त्यांची एकत्रित सांगड घातली. ते नुसता प्रसार करून थांबले नाहीत, तर त्यांनी शाळा काढल्या, कॉलेजेस सुरू केली. फक्त शिक्षण क्षेत्रासाठी काम करून ते थांबले नाहीत, तर त्यांनी कारखाने उभे केले. त्यामुळं आपल्या देशात अनेक लोकांना रोजगार मिळाला. या सर्व अंगांनी आपलं राष्ट्र कसं असावं, हे त्यांनी त्यांच्या कार्यातून दाखवून दिलं. एकाच गोष्टीसाठी ते आडून राहिले नाहीत. त्यांचा अर्थशास्त्राचा अभ्यास खूप सखोल होता. म्हणजे नुसतं स्वातंत्र्य मिळणं नाही, तर स्वातंत्र्य मिळाल्यावर आपल्या देशाला आणखी समृद्ध होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लागतील या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास आणि चिंतन त्यांच्या चरित्रातून दिसतं. त्याकाळी एवढं सखोल चिंतन कुठल्याच नेत्याचं नव्हतं. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

समाज आणि बदल 
आपल्या देशात झपाट्यानं बदल होत आहेत. काहींना लोक आनंदानं स्वीकारतात, तर काहींना विरोध दर्शवतात. सुधारणांबाबत, बदलांबाबत टिळकांचं म्हणणं एकच होतं, की लोकांना बरोबर घेऊन सुधारणा करा. तुम्हाला वाटतं म्हणून सुधारणा करू नका. लोकांनाही तुमच्यात सामील करून घ्या. सुधारणा करताना लोकांना विश्वासात घ्या. तुम्ही केलेल्या सुधारणा लोकांना पटल्यासच त्या त्यांच्या अंगवळणी पडतील. त्याकाळी सुद्धा कोणत्याही सुधारणेला त्यांचा विरोध नव्हता. त्यांचं म्हणणं इतकंच होतं, कोणत्याही सुधारणा तुम्ही बळजबरीनं लोकांवर लादू नका. समाज म्हणून लोकांना प्रगल्भ होऊ द्या. लोक प्रगल्भ झाल्यास सुधारणा लादाव्या लागणार नाहीत, त्या आपोआप त्यांच्या आयुष्याचा भाग बनतील. त्यामुळं त्यांनी संपूर्ण समाजाला एकत्र घेऊन जाण्याची भूमिका तेव्हा घेतली होती आणि आजही त्यांची तिच भूमिका असती. दोन वेगळ्या विचारांची माणसं म्हटल्यावर मतभेद होतातच. आजच्या काळात समाजामध्ये, लोकांमध्ये मतभेद होण्याचं मुख्य कारण, हल्ली लोक व्यक्त होतात ते सोशल मीडियावर आणि तेही कशाचाही अभ्यास न करता. मतभेद तेव्हाच्या काळीही होतेच. टिळक, आगरकर, न्यायमूर्ती रानडे यांच्यातही मतभेद होते, परंतु ते दोन तुल्यबळ माणसांमधले, दोन ज्ञानी लोकांमधले मतभेद होते. हल्ली बऱ्याचदा आपण व्यक्त होणं टाळतो, कारण आपल्याला वाद नको असतो. टिळकांनी तेव्हाही आपली मतं निर्भीड आणि ठामपणे मांडली. आजच्या काळात टिळक असते, तर नक्कीच त्यांनी आपली मतं, आपले विचार निर्भीडपणे, स्पष्ट शब्दांत मांडली असती. 

टिळक लोकांचा विचार करणारे, आपल्या देशाच्या प्रगतीसाठी झटणारे, आपल्या विचारातून, आपल्या कृतीतून लोकांना समाज म्हणून प्रगल्भ बनवणारे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करून सर्व लोकांना सोबत घेऊन आपल्या देशासाठी, देशातल्या लोकांच्या भल्यासाठी आपलं कार्य अव्याहतपणे सुरू ठेवणारे व्यक्तिमत्व होते आणि आजही त्यांनी हेच केलं असतं. त्यांचे विचार पावलोपावली आपल्याला मार्गदर्शन करत असतात, प्रेरणा देत असतात आणि यापुढंही देत राहतील. 

(शब्दांकन - राजश्री वैद्य)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com