
फळांचा राजा येणार वर्षातून दोनदा!
राजापूर (जि. रत्नागिरी) - तालुक्यातील जानशी येथील आंबा बागायतदार प्रशांत पटवर्धन यांनी वडील रामचंद्र शंकर पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या बागेमध्ये ‘एटीएम’ (एनी टाईम मँगो) या हापूसच्या नव्या प्रजातीच्या झाडाची लागवड केली आहे. कातळ भागामध्ये माती टाकून विकसित केलेल्या बागेमध्ये सुमारे अडीच वर्षांच्या या झाडाला उन्हाळा आणि पावसाळा अशी वर्षातून दोनवेळा फळधारणा होते. वेगळी अन् नावीन्यपूर्ण काहीतरी लागवड करण्याच्या उद्देशाने त्यांनी अनोख्या एटीएम हापूस झाडाची तालुक्यातील बहुधा पहिली लागवड केली आहे.
जांभ्या दगडाच्या कातळावर सुमारे नऊशे ट्रक्टर माती टाकून त्यांनी ही बाग फुलवली आहे. ते नवनवीन प्रयोग करत आहेत. या बागेमध्ये त्यांनी दोनशेहून अधिक झाडांची लागवड केलीय. त्यांनी जास्तीत जास्त परागीकरण होण्याला फायदेशीर ठरणारी केसर, आम्रपाली, पायरी आदी रोपांची लागवड केली आहे. त्याच्या जोडीने हापूसची संकरित प्रजाती म्हणून ओळखली जात असलेल्या ‘एटीएम’ या प्रजातीचे उद्देशाने झाड लावले आहे. वैशिष्ट्यपूर्ण असलेले ‘एटीएम’ हे झाड एका खासगी नर्सरीमधून विकत घेतले असून, लागवडीनंतरच्या तिसऱ्या महिन्यामध्ये त्याला मोहोर आल्याचे पटवर्धन सांगतात. दिवाळीनंतर मोहोर येऊन फळधारणा झाली असून ती फेब्रुवारीमध्ये संपली. तर साधारणतः एप्रिल महिन्यात पुन्हा फुलोरा येऊन जुलैदरम्यान आंबा तयार होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या झाडाला वर्षातून तिसऱ्यांदा फुलोरा येण्याची शक्यता असून, त्याबाबतचे निरीक्षण सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एटीएम आंब्याची वैशिष्ट्ये
परागीकरणाला फायदेशीर ठरणाऱ्या झाडांची लागवड
अडीच वर्षांचे झाड तीन फुटांचे
उंची किती वाढणार
याबाबत उत्सुकता
हापूसची संकरित प्रजाती
फेब्रुवारी आणि जुलैमध्ये
आंबा
फुलोऱ्यात स्त्रीकेसरचे
प्रमाण जास्त
चव ‘रायवळ’सारखी