
भारतमातेच्या चरणी सेवा अपर्ण करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काम करतो - मुनगंटीवार
भाजप-मनसे युती RSS च्या पुढाकाराने होणार? मुनगंटीवारांनी केलं स्पष्ट
सध्या राज्यात मिशिदीवरील भोंग उतरवण्याचा विषय चांगलाचं गाजला आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी यासाठी आक्रमक भूमिका घेतली असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, राज ठाकरेंच हिंदुत्व प्रेम अचानक कसं काय इतकं समोर येत आहे, असा सवालही केला जात आहे. अशा काही घडामोडींमुळे मनसे आणि भाजपाच्या युतीच्या चर्चेलाही रंग चढला आहे. मनसे आणि भाजपा युती होणार का या चर्चेला आता सुधीर मुनंगटीवार यांनी पूर्णविराम दिला आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कधीही यूतीच्या संदर्भात कोणतीही चर्चा करत नाही. देशहितासाठी स्वयंसेवक घडवण्याचं काम आरएसएस करत असतं. भारतमातेच्या चरणी सेवा अपर्ण करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काम करतो, असं म्हणत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक सघांच्या भूमिकेचं कौतुक केलं आहे.
यावेळी भाजप-मनसे युती होणार यात आरएसएस संघाचा हात असणार का? यावर ते म्हणाले, खुर्ची, राजकीय सत्ता या साऱ्या बाबी संघासमोर गौण आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि मनसेच्या युतीसंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कधी पुढाकार घेणे किंवा मध्यस्थी म्हणून काम करणार नाही. यासंदर्भामध्ये कोणताही भाव व्यक्त करणार नाही. भारतीय जनता पार्टी आणि मनसेची युती व्हावी असा कोणताही प्रस्ताव याक्षणी तरी नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
पुढे ते म्हणाले, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार जो २०१९ मध्ये २८ नोव्हेंबरला सत्तेच्या मोहात खंडित झाला होता तोच विचार त्याचा वारसा चालवत राज ठाकरेंनी पुढे नेण्याचा संकल्प केला आहे. आमची युती शिवसेनेच्या तत्कालीन देशभक्तीच्या विचाराशी होती. आता शिवसेनेचा विचार सोनिया गांधी आणि काँग्रेसला मदत करण्याचा विचार असल्याने संदर्भामध्ये भाजप-शिवसेना युती होणं शक्य नाही. पण या मनसेने राष्ट्रभक्तीची, देशहिताची, हिंदुत्वाची भूमिका घेतल्याने राजकीय वर्तुळात मनसे भाजप युती होणार असल्याची चर्चा रंगली आहे. सध्या तरी याविषयी कोणतही चिंतन, मंथन, चर्चा आणि तर्कही नाही, असं सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून राज्यात सुरु असणाऱ्या घडामोडींकडे पाहिले असता राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघाले आहे. भाजपा आणि मनसे युती होणार आहे, असा अंदाज सत्ताधारी गटातील नेत्यांकडून व्यक्त केला आहे. मात्र भारतीय जनता पार्टी आणि मनसेची युती व्हावी असा कोणताही प्रस्ताव याक्षणी तरी नाही, असं स्पष्ट मत मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं आहे.