गळित हंगामासाठी कारखानदार शोधू लागले हार्वेस्टरचा पर्याय 

प्रमोद बोडके
Wednesday, 1 July 2020

महाराष्ट्रात जवळपास 15 ते 20 लाख ऊस तोड कामगार आहेत. त्यातील पाच लाख कामगार हे बीड जिल्ह्यातील आहेत. यंदाच्या हंगामात 30 ते 35 टक्केच कामगार ऊस तोडीसाठी जाण्याचा अंदाज आहे. ऊसतोडीला गेल्यास कोरोनाची भिती आणि गावाकडेच राहिल्यास उपासमारीची भिती त्यांना सतावत आहे. जे कामगार ऊस तोडीसाठी जातील त्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी संबंधित साखर कारखान्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी. जे कामगार ऊसतोडीसाठी जाणार नाहीत अशा कामगारांना नोव्हेंबरनंतर मोफत धान्य द्यावे. 
- केशवराव आंधळे, माजी अध्यक्ष, लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ 

सोलापूर : राज्यात सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा म्हणून सोलापूरची ओळख आहे. कधी दुष्काळ, कधी घसरलेला साखरेचा दर या समस्या असलेल्या साखर कारखानदारांना यंदाच्या गळित हंगामात कोरोनाच्या रुपाने नवीनच संकट उभा राहिले आहे. मागील गळित हंगामात ऊस नव्हता. यंदाच्या गळित हंगामात ऊस आहे परंतु, ऊस तोडण्यासाठी मजूर येतील की नाही? याची धास्ती कायम आहे. ऊसतोड मजूरांसोबतच कारखानदारांनी ऊस तोडीसाठी हार्वेस्टरचा पर्याय निवडला आहे. 

जिल्ह्यातील 11 तालुक्‍यात 38 खासगी व सहकारी साखर कारखाने आहेत. त्यापैकी 30 ते 32 साखर कारखाने गळित हंगाम घेऊ शकतात. जिल्ह्यात सरासरी एक लाख 37 हजार हेक्‍टर ऊस क्षेत्र आहे. नोव्हेंबरमध्ये कारखान्याच्या गळित हंगामास सुरुवात होते. तत्पूर्वीचे तीन महिने साखर कारखान्यासाठी महत्वाचे मानले जातात. या कालावधीत ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणेचे करार आणि कारखान्यामधील दुरुस्तीची कामे केली जातात. सध्या कारखान्यातील दुरुस्तीच्या कामांनी वेग घेतला आहे. ऊस तोडणी वाहतुकीच्या कराराला मात्र फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. 

वाहनधारक व मुकादम यांच्याशी करार

कारखान्यांचा करार थेट ऊसतोड कामगारांसोबत होत नाही. कारखानदार हे वाहनधारक व मुकादम यांच्याशी करार करतात. कोरोनाच्या संकटामुळे यंदाच्या हंगामात किती मजूर उपलब्ध होतील? याबाबत साशंकता आहे. ज्या कारखान्यांकडे हार्वेस्टर आहेत, ज्या शेतकऱ्यांनी पट्टा पद्धतीने ऊस लागवड केली आहे. त्यांचे नुकसान कमी होण्याची शक्‍यता आहे. 
- धनंजय भोसले, अध्यक्ष, कंचेश्‍वर शुगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sugar Manufacturers are looking for alternatives to harvesters for the season