साखर उत्पादनात २७७ लाख क्विंटल घट

- कुंडलिक पाटील
शुक्रवार, 3 मार्च 2017

कुडित्रे - राज्यभरात यंदाचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. गतहंगामापेक्षा तब्बल २७७ लाख क्विंटलने साखरेचे उत्पादन घटले आहे. १३० कारखान्यांचा हंगाम समाप्त झाला असून, १५० कारखान्यांनी २६ फेब्रुवारीपर्यंत ४१० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. १२.१७ टक्के उतारा घेऊन कोल्हापूर विभाग राज्यात आघाडीवर आहे. यंदा साखरेला दर असल्याने दुसरा हप्ता मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

गतहंगामात १७७ कारखान्यांनी हंगाम घेऊन उसाची उपलब्धता असल्याने पूर्ण क्षमतेने गाळप घेत दैनंदिन पाच लाख ५१ हजार टन ऊस गाळप केले होते. या वेळी २० कारखाने उसाअभावी सुरू होऊ शकले नाहीत. परिणामी दैनंदिन पाच लाख टन गाळप झाले. गतवेळी २६ फेब्रुवारी अखेर ६२३ लाख टन ऊस गाळप झाले होते. यंदा ते ५० टक्‍क्‍यांनी घटून ३६६ लाख टन झाला. ६८७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा ४१० लाख क्विंटल झाले. राज्याचा सरासरी उतारा ११.०३ होता, तो यंदा वाढून ११.१९ टक्के झाला. आतापर्यंत फक्‍त ५९ कारखाने बंद झाले होते. यंदा १३० कारखान्यांचा हंगाम समाप्त झाला.

कोल्हापूर विभागात १४९ लाख टन उसाचे गाळप होऊन १८२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. १२.१७ टक्के साखर उतारा मिळाला. २७ कारखान्यांचा हंगाम संपला. पुणे विभागात १३८ लाख टन उसाचे गाळप होऊन १५२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. पुणे विभागात झपाट्याने ४५ कारखाने बंद झाले. तेथे ११.०४ टक्के उतारा राहिला. नगर जिल्ह्यात २८ लाख क्विंटल, औरंगाबादमध्ये १९ लाख क्विंटल, नांदेडला १० लाख क्विंटल, अमरावती २ लाख, नागपूरला ४ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. 

यंदा उसाचे क्षेत्र घटले व उत्पादनही घटले. यामुळे उसाच्या कांडीला सोन्याचा भाव मिळाला असता; मात्र मोदी सरकारने शेतीमालावर ५० टक्के नफा व उत्पादन खर्च देण्याचे आश्‍वासन सत्तेवर येण्यापूर्वी दिले. याउलट साखरेची निर्यादबंदी करून साखरेचा दर पाडला व एक रुपयाचीही एफआरपी वाढ केली नाही. त्यामुळे ऊस उत्पादकांचे कंबरडे मोडले. सध्या दराचा फुगवटा असून उचल नसल्याने व्याजाचा भुर्दंड बसत आहे. 

सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्‍वासने पाळली नाहीत. कारखान्यांनी दुसरा हप्ता चांगल्या रकमेचा द्यावा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बेस राजकारण आहे. ऊस दराचा प्रश्‍न हा त्यांचा पोट भरण्याचा व्यवसाय आहे. 
- संजय कोले, शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना.

Web Title: sugar production decrease