साखर उत्पादनात नोव्हेंबरअखेर दुपटीने वाढ; मात्र एकूण उत्पादनात घट होण्याची शक्‍यता 

Sugar production will double by the end of November but overall yields are likely to decline
Sugar production will double by the end of November but overall yields are likely to decline

माळीनगर (सोलापूर) : देशातील ऊस गाळप हंगाम यंदा लवकर सुरू झाल्याने गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी नोव्हेंबरअखेर साखर उत्पादनात दुपटीने वाढ झाली आहे. यंदा देशातील साखर उत्पादन नोव्हेंबरअखेर 42.9 लाख टन इतके झाले आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) याबाबतची आकडेवारी नुकतीच जाहीर केली आहे. दरम्यान, चालू हंगामात उसाचा रस व बी-हेवी मोलॅसिसपासून इथेनॉलच्या उत्पादनावर भर असल्याने देशातील साखर उत्पादनात 20 लाख टनांनी घट होईल, असे 'इस्मा'च्या वतीने सांगण्यात आले आहे. 

मागील हंगामात नोव्हेंबरअखेर देशात 20.72 लाख टन साखर उत्पादन झाले होते. यंदाचा हंगाम लवकर चालू झाल्याने साखर उत्पादनात वाढ झाल्याचे 'इस्मा'स्पष्ट केले आहे. देशातील यंदाचा साखर उत्पादनाचा प्रवाह 2018-19 च्या हंगामातील साखर उत्पादनाच्या कमी-अधिक प्रमाणात दिसून येत आहे. 2018-19 च्या हंगामात नोव्हेंबर 2018 अखेर 418 साखर कारखान्यात 40.69 लाख टन साखर उत्पादन झाले होते. 

उत्तर प्रदेशात गतवर्षीच्या नोव्हेंबरअखेरच्या 11.46 लाख टन साखर उत्पादनाच्या तुलनेत 12.65 लाख टन साखर उत्पादन यावर्षी झाले आहे. महाराष्ट्रात यंदा 15.72 लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गतवर्षी या कालावधीत महाराष्ट्रात 1.38 लाख टन साखर उत्पादन झाले होते. उसाची मुबलक उपलब्धता व गाळप हंगाम यंदा लवकर सुरू झाल्याने महाराष्ट्रातील साखर उत्पादन वाढले आहे. कर्नाटकमध्ये यंदा 11.11 लाख टन साखर तयार झाली आहे. गतवर्षी तेथे 5.62 लाख टन साखर उत्पादन झाले होते. 

साखर उत्पादन करणाऱ्या प्रमुख राज्यात ऑक्‍टोबर 2020पासून साखरेच्या किमतीत घसरण झाली असल्याकडे 'इस्मा'ने लक्ष वेधले आहे. उत्तरेकडील काही राज्यात साखरेच्या किमतीत वाढ अथवा स्थिर आहेत. महाराष्ट्र व कर्नाटक या प्रमुख राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून साखरेच्या किमतीत प्रतिक्विंटल 50 ते 100 रुपयांची घसरण झाली आहे. याठिकाणी साखरेच्या किमती तीन हजार 200 ते तीन हजार 250 रुपयांदरम्यान आहेत. दक्षिणेकडेल राज्यांमध्ये साखरेच्या किमती महाराष्ट्र व कर्नाटकप्रमाणेच आहेत. 

गाळप हंगामाच्या प्रारंभी देशात असलेला साखरेचा मुबलक साठ्यामुळे स्थानिक बाजारपेठेत असलेला दबाव, यंदाच्या हंगामात साखर उत्पादनात होणारी अपेक्षित वाढ, साखर निर्यातीस झालेला विलंब, साखरेच्या किमान आधारभूत किमतीत केंद्र सरकारने अद्यापही वाढ करण्याबाबत न घेतलेला निर्णय या गोष्टी साखरेच्या किंमतीतील घसरणीस कारणीभूत असल्याचे 'इस्मा'ने म्हटले आहे. 

संपादन : वैभव गाढवे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com